मुंबई : देशभरातील व्यापाऱ्यांची संघटना असलेल्या ‘कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स’ अर्थात ‘कॅट’ने देशात दिवसेंदिवस वाढत असलेले पेट्रोल आणि डिझेलचे दर, वस्तू व सेवा कर, ई-बिल या संदर्भात शुक्रवारी भारत बंदचे आवाहन केले आहे. तसेच, देशातील वाहतूक आणि मजूर संघटनांनी सुद्धा आज भारत बंदची (Bharat Bandh) हाक दिली आहे. या आंदोलनाला आता सुरुवात झाली आहे. दिल्लीच्या वेशीवर आंदोलन करणाऱ्या संयुक्त किसान मोर्चाने (SKM) शेतकऱ्यांना शांततापूर्ण मार्गाने या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
जीएसटी कायद्यातील अडचणीच्या व जाचक तरतुदी रद्द कराव्या, फूड सेफ्टी ॲक्टमधील तरतुदी व केंद्रीकृत अधिकार असलेली व्यवस्था रद्द करावी. तसेच टीसीएसच्या तरतुदी व्यापाऱ्यांना लागू करू नये. या मागण्यांसाठी आज भारतातील अनेक व्यापारी संघटनांनी एक दिवसीय राष्ट्रीय व्यापार व वाहतूक बंदची घोषणा केली आहे.
या बंदमध्ये लाखो व्यापारी व दुकानदार सहभागी होणार आहेत. या बंदमुळे किराणा व्यापार, माल वाहतूक, मसाले बाजार, भांडी बाजार, सौंदर्य प्रसाधने, मोबाइल व संगणक विक्री या सर्व क्षेत्रांवर परिणाम होणार आहे. मुंबईतील अनेक व्यापारी संघटनांनी या बंदला पाठिंबा दर्शविला आहे. तसेच, या बंदमध्ये महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीजदेखील सहभागी होणार असल्याची माहिती वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी दिली आहे.
देशातील वाहतूक क्षेत्रातील सर्वात मोठी संघटना ऑल इंडिया ट्रान्सपोर्टर्स वेलफेअर असोसिएशनने यापूर्वीच कॅटच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. तसेच देशभरात चक्का जामचा इशारा दिला आहे. याशिवाय अनेक राष्ट्रीय व्यापारी संघटनांनी व्यापाऱ्यांच्या या बंदला पाठिंबा दर्शवला आहे. विशेषत: ऑल इंडिया एफएमसीजी डिस्ट्रिब्यूटर्स फेडरेशन, फेडरेशन ऑफ अॅल्युमिनियम युटेन्सिलस मॅन्यूफॅक्चरर्स अँड ट्रेडर्स असोसिएशन, नॉर्थ इंडिया स्पाइसिस ट्रेडर्स असोसिएशन, अखिल भारतीय महिला उद्योजक संघटना, अखिल भारतीय संगणक डीलर असोसिएशन, ऑल इंडिया कॉस्मेटिक मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने या बंदला पाठिंबा दिला आहे.
महाराष्ट्रातील व्यापारी वाहतूकदारांनी या एक दिवसीय बंदमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. या बंद मध्ये महाराष्ट्रातील विविध वाहतूक व्यापारी संघटना ठिकठिकाणी दोन तासांचे धरणे आंदोलन, जीएसटी आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन, अशा प्रकारचे आंदोलन करणार असल्याची माहिती ललित गांधी यांनी दिली.
भारत बंदमुळे कोणत्या सेवा बंद राहणार?
– भारत बंदमध्ये देशातील 40 हजारापेक्षा जास्त व्यापारी संघटना सहभागी होणार आहेत. त्यामुळे बहुतांश बाजारपेठा बंद असतील.
– देशातील अनेक भागांमध्ये वाहतूक सेवा ठप्प होण्याची शक्यता आहे. AITWA ने वाहतूक कंपन्यांना सकाळी सहा ते रात्री आठ या वेळेत आपल्या गाड्या पार्क करण्याचे आवाहन केले आहे.
– बुकिंग आणि बिलासंदर्भातील व्यवहार ठप्प होण्याची शक्यता आहे.
– चार्टर्ड अकाऊंटस आणि टॅक्स अॅडव्होकेट संघटनांनीही भारत बंदचे समर्थन केले आहे. त्यामुळे या सेवांवर परिणाम होणार आहे.
– महिला उद्योगगट, फेरीवाले आणि अन्य लहान व्यापारीही या बंदमध्ये सहभागी होणार आहेत.
– जीएसटीमधील त्रुटींचा विरोध करण्यासाठी कोणताही व्यापारी आज पोर्टलवर लॉग इन करणार नाही.
कोणत्या सेवांवर परिणाम होणार नाही?
– भारत बंददरम्यान अत्यावश्यक सेवा, मेडिकल, दूध आणि भाजी-पाल्यांचा पुरवठा सुरळीत राहणार.
– बँकिंग सेवेवरही या बंदचा कोणता परिणाम होणार नाही.