अगदी भारत-इंग्लंड दरम्यानच्या तिसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात होईपर्यंत जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम म्हणून नावारूपास आलेल्या स्टेडियमला सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नावानं ओळखलं जात होतं. मात्र बुधवारी सामन्यापूर्वी झालेल्या उद्घाटन समारंभात या स्टेडियमला भारताचे विद्यमान पंतप्रधाननरेंद्र मोदी यांचं नावं देण्यात आलं. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी बुधवारी जगातील या सर्वात मोठ्या आणि अत्याधुनिक क्रिकेट स्टेडियमचे उद्घाटन केलं. दरम्यान, या स्टे़डियमला नरेंद्र मोदी स्टेडियम असं नाव देण्यात आल्यानं अनेकांनी टीकेची झोत उठवली होती. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीदेखील यावरून जोरदार टीका केली आहे.
“काय नेता मिळाला आहे या देशाला. लोकं यांना विसरून जातील याची यांना चिंता आहे. यांना लोकांवर भरवसा नाही की मृत्यूनंतर यांची आठवण कोणी ठेवेल की नाही. यासाठीच मृत्यूपूर्वी स्टेडियम आपल्या नावे करून घेतलं,” असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर बोचरी टीका केली. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून यावर टीका केली.
क्या नेता मिला है देश को। इनको चिंता है कहीं लोग इन्हें भूल न जाए। इन्हें लोगों पर भरोसा नही है कि गुजर जाने के बाद कोई इन्हे याद रखेगा या नही। इसीलिए मरने से पहले स्टेडियम अपने नाम पर करा लिया।#MoteraCricketStadium
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) February 24, 2021
हे शक्ती, आकांक्षेचे प्रतिनिधित्व
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री असताना या स्टेडियमची संकल्पना राबविली होती. त्यावेळी ते गुजरात क्रिकेट संघटनेचे अध्यक्षही होते. पर्यावरणाचा विकास म्हणून हे स्टेडियम योग्य उदाहरण आहे. हे स्टेडियम भारताच्या शक्ती आणि महत्त्वाकांक्षेचं प्रतिनिधित्व करतं. भारताला क्रिकेटचा गड म्हणून ओळखलं जातं आणि त्यासाठी जगातील सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियम भारतातच असायला हवं. या स्टेडियमच्या निमित्ताने भक्कम आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण करत अहमदाबादची जगामध्ये वेगळी ओळख निर्माण होईल असा विश्वास आहे,” असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद उद्घाटनावेळी म्हणाले.
‘…म्हणून स्टेडियमला मोदींचे नाव’
“हे स्टेडियम मोदी यांचं स्वप्न होतं. आम्ही या स्टेडियमला पंतप्रधानांचं नाव देण्याचं निश्चित केलं. या भव्य परिसरात भविष्यात राष्ट्रकुल क्रीडा, आशियाई क्रीडा आणि ऑलिम्पिक स्पर्धांचेही आयोजन करता येऊ शकेल. हे संपूर्ण क्रीडा संकुल पुढील सहा महिन्यामध्ये तयार होईल. यामुळे खेळाडूंना मोठी मदत मिळेल, याचा विश्वास आहे. आमचे अनेक खेळाडू मोठा संघर्ष करीत छोट्या शहरामधून येतात. त्यांना जीसीएनं प्रोत्साहन दिलं आहे,” असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले.