अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ने (NASA) मंगळावरील एक व्हिडीओ शेअर केला आहे. नासाच्या पर्सेव्हरन्स रोव्हरने हा व्हिडीओ मंगळ ग्रहावरुन पाठवला आहे. पर्सेव्हरन्स रोव्हर मंगळावर कसं उतरलं याची प्रत्येक सेकंदाची हालचाल या व्हिडीओत दिसत आहे. पर्सेव्हरन्स रोव्हर मंगळावरील लाल जमिनीवरचं लँडिंगचा क्षण नासाने सोशल मीडियावर शेअर केला आहे. पर्सेव्हरन्स रोव्हर सात महिन्यांनंतर 19 फेब्रुवारी रोजी मंगळावर यशस्वीरित्या लँड झालं आहे.
व्हिडिओमध्ये काय दिसत आहे? पर्सेव्हरन्स रोव्हरवर वेगवेगळे एकूण 25 कॅमेरे बसवण्यात आले आहेत. या सर्व कॅमेऱ्यांनी मंगळ ग्रहावरील विविध फोटो कैद केले आहेत. मंगळावरील भूभागाचा असा व्हिडीओ पहिल्यांदाच समोर आला आहे. व्हिडिओनुसार मंगळाच्या पृष्ठभाग ओबडधोबड आहे हे दिसून येत आहे. मंगळाच्या पृष्ठभागावर मोठमोठे खड्डे देखील दिसत आहेत.
व्हिडीओतील दृष्यांवर नजर टाकल्यास मंगळ ग्रहावर मोठं वाळवंट असल्याचं दिसतंय. पर्सेव्हरन्स रोव्हर जसजसं मंगळाच्या पृष्ठभागाजवळ जात होतं तसं जेटमधून निघणाऱ्या वाऱ्यामुळे पृष्ठभागावरील माती वेगाने उडण्यास सुरुवात झाली. मंगळाच्या पृष्ठभागापासून 20 मीटर उंचीवर असतानाचा हा व्हिडिओ आहे. पृष्ठभागाच्या जवळ पोहोचताच रोव्हरची आठ चाके उघडण्यास सुरुवात होते आणि काही सेकंदात रोव्हर मंगळाच्या पृष्ठभागावर उतरलं.
पर्सेव्हरन्स रोव्हर मंगळावर काय शोध घेणार? पृथ्वीप्रमाणेच मंगळावरही तीन अब्ज वर्षापूर्वी जीवसृष्टी असेल अशी शक्यता वर्तवण्यात येत असते. त्याचाच अभ्यास करण्यासाठी नासाने पर्सेव्हरन्स मार्स रोव्हर मंगळावर पाठवले आहे. हे रोव्हर मंगळावरील मातीचे सॅम्पल तसेच इतर अवशेष घेऊन पृथ्वीवर येणार आहे. हे अभियान दोन वर्षे चालणार असंही सांगण्यात येतंय.
नासाच्या इंजिनीअर्सनी पहिल्यांदा पर्सेव्हरन्स रोव्हरने पाठवलेला मंगळ ग्रहावरील आवाज ऐकला आहे. त्यानंतर त्यांनी सांगितले की हा 10 सेकंदाचा ऑडिओ मंगळावरील हवेच्या आवाजाचा आहे. पर्सिवियरेंस रोव्हरवरील मायक्रोफोनने हा आवाज कॅप्चर केला आणि आम्हाला पाठवला.