अकोला/ अमरावती : विभागातील कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम या जिल्ह्यांमध्ये शहरी व ग्रामीण भागात प्रतिबंधित क्षेत्र घोषित करून नियमाचे पालन करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त पियुष यांनी दिले आहेत.
या आदेशानुसार अमरावती विभागातील सर्व प्रकारची दुकाने दररोज सकाळी 9 ते 5 या दरम्यान सुरू राहणार आहे. तसेच सर्व प्रकारचे शासकीय व खाजगी कार्यालय 15 टक्के किंवा 15 व्यक्ती यापैकी जी संख्या जास्त असेल ती ग्राह्य धरून सुरू राहणार आहे. सर्व प्रकारची उपहारगृहे, हॉटेल्स प्रत्यक्ष सुरू ठेवता फक्त पार्सल सुविधा उपलब्ध राहणार आहे. तसेच लग्न समारंभ करता 25 व्यक्ती यांना परवानगी देण्यात आली असून नागरिकांनी जवळ असलेल्या बाजारपेठ दुकान याचा वापर करावा.
सर्व प्रकारचे शिक्षण कार्यालय, शाळा महाविद्यालय विद्यापीठ येथील शैक्षणिक कर्मचारी, संशोधन कर्मचारी, वैज्ञानिक यांना माहिती उत्तरपत्रिका तपासणी निकाल घोषित करणे याकरिता परवानगी देण्यात आली आहे. तर सर्व प्रकारचे शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक प्रशिक्षण केंद्रे, खाजगी शिकवणी वर्ग, कोचिंग क्लासेस बंद ठेवण्यात आली आहेत.मालवाहतूक, वाहतुकीसाठी कुठलेही प्रकारचे निर्बंध राहणार नाहीत. सर्व प्रकारची सार्वजनिक व खाजगी वाहतूक करताना चारचाकी गाड्यांमध्ये चालकाव्यतिरिक्त इतर तीन प्रवाशांना परवानगी राहणार आहे तर तीन चाकी गाडीत दोन प्रवासी, दुचाकीवर हेल्मेट व मास्क व दोन प्रवाशाना परवानगी आहे.
आंतर जिल्हा बस वाहतूक करताना बस मधील असलेले एकूण प्रवासी क्षमतेच्या 50 टक्के प्रवासी सोशल डिस्टंसिंग, निरजंतूंनीकरण करून वाहतुकीकरिता परवानगी देण्यात आली आहे. सर्व धार्मिक स्थळे ही एका वेळी दहा व्यक्ती पर्यंत मर्यादित स्वरूपात नागरिकांसाठी सुरु राहणार आहे. ठोक व भाजी मंडई सकाळी तीन ते सहा या कालावधीत सुरू राहणार आहेत.यामध्ये किरकोळ विक्रेते यांना प्रवेश असणार आहे.
तसेच अमरावती विभागातील ग्रामीण व शहरी भागांमध्ये संचारबंदीच्या कालावधीत सर्व प्रकारच्या सामाजिक, राजकीय, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक व इतर स्नेहसंमेलन या कालावधीत बंद राहणार आहेत. सिनेमागृह, व्यायाम शाळा, जलतरण तलाव, मनोरंजन, उद्यान बंद राहणार आहेत नियमाचे उल्लंघन करणाऱ्या विरोधात कारवाई करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त यांनी दिले आहेत.