अकोला – महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी सुरु असून अद्यापही जिल्ह्यातील २६१९ शेतकरी खातेदारांचे आधार प्रमाणिकरण होणे बाकी आहे, अशा शेतकऱ्यांनी आपल्या नजिकच्या आपले सरकार सेवा केंद्र येथे जाऊन आधार प्रमाणिकरण करुन घ्यावे,असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.
यासंदर्भात जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या कार्यालयातून प्राप्त माहितीनुसार, महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत दि. १ एप्रिल २०१५ ते दि.३१ मार्च २०१९ या कालावधीत कर्ज घेतलेल्या व दि.३० सप्टेंबर २०१९ पर्यंत व्याजासह दोन लाख रुपये थकित कर्जाची रक्कम शासनामार्फत शेतकऱ्याच्या कर्ज खात्यावर वर्ग करण्यात येते.
या अंमलबजावणी प्रक्रियेत यापूर्वी विशिष्ट क्रमांकासह कर्जखाति सहा याद्या आधार प्रमाणिकरणासाठी ऑनलाईन पोर्टलवर प्राप्त झाल्या आहेत. तसेच दि. १ जानेवारी २०२१ रोजी आणखी एक सातवी यादी प्राप्त झाली आहे. लाभार्थी शेतकऱ्यांची यादी बॅंकांच्या सुचना फलकावर लावण्यात आली आहे. अकोला जिल्ह्यात अद्याप पावेतो २६१९ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण शिल्लक आहे. त्यात अकोला तालुक्यातील ५७९, अकोट-३३१, बाळापुर-४४८, बार्शी टाकळी-१७२, मुर्तिजापूर-३४१, पातूर-३४२, तेल्हारा-४०६ या प्रमाणे एकुण २६१९ शेतकऱ्यांचे आधारप्रमाणिकरण बाकी आहे. तरी या सर्व शेतकऱ्यांनी आपल्या नजिकच्या सीएसी अथवा आपले सरकार सेवा केंद्र येथे जाऊन आपले आधार प्रमाणिकरण करुन घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांना आधारप्रमाणिकरणासाठी काही अडचण असल्यास आपल्या बॅंकेचे शाखाव्यवस्थापक, सेवा सहकारी संस्थेचे सचिव, तालुका उप/ सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालय, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अकोला यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था व्ही.डी. कहाळेकर आणि जिल्हा अग्रणी बॅंक व्यवस्थापक आलोक तेराणिया यांनी केले आहे.