तांदूळ, उकडलेले बटाटे किंवा फळांचे काप अशा घन पदार्थांची ओळख आपल्या लहान मुलांना करून देताना अनेकदा पालक संभ्रमात पडतात. आपल्या बाळाला हे घन पदार्थ कधी खायला द्यावे? कोणते खायला द्यावे आणि काय टाळावे? आपल्या बाळाला हे पदार्थ पचतील का, असे अनेक प्रश्न भेडसावू लागतात.
4 ते 6 महिन्यानंतरच्या बाळाला घनपदार्थांची ओळख करून देण्यास हरकत नाही. यावेळी आपल्या बाळाची पाचक प्रणाली घन पदार्थ पचवण्यासाठी विकसित झालेली आहे की नाही, हे ठरवता येते. प्रत्येक मूल भिन्न आहे. आपले मूल घनपदार्थ घेण्यास तयार आहे की नाही, हे जाणून घेणे आवश्यक असते. बहुतेक मुले सुमारे 6 महिन्यांच्या आसपास घनपदार्थ खाण्याची चिन्हे दर्शवतात.
आपल्या बाळाला भूक लागल्याची क्रिया म्हणजे बाळाकडे जेवणाचे ताट नेताच ते आपल्याकडे झुकते. हे ताट पाहून बाळाला आनंद होतो. आपल्या बाळाला खाण्यात रस नसतो तेव्हा मात्र ते चमचा दूर ढकलणे, तोंड बंद करणे आणि डोके फिरविणे अशी क्रिया दर्शवते. सुरुवातीला आपल्या बाळाला फक्त एक चमचाभर आहार देण्याचा प्रयत्न करा आणि नंतर हळूहळू आहार वाढवत जावा. पदार्थ योग्यरीत्या बारीक केलेले, पातळ केलेले, शिजवलेले आहेत का याची खात्री करा. शेंगदाणे, काजू, बदाम असे पदार्थांना देण्यास टाळावे. ते घशात अडकू शकतात.
येथे काही पदार्थ आहेत जे आपल्या बाळासाठी योग्य आहेत.
भाज्या : आपण बटाटा, गाजर किंवा मटारदेखील बाळाला देण्यास सुरू करू शकता. आपले बाळ या भाज्यांचे सेवन करण्यास टाळत असले, तरी त्यांना खाऊ घालण्याचा प्रयत्न करावा. बाळ खात नसल्यास लगेच प्रयत्न सोडू नका.
तृणधान्ये : लोह असलेली तृणधान्ये निवडणे योग्य ठरेल.
फळे : आपल्या मुलाला मॅश केलेले केळी किंवा सफरचंद, नासपती, पीच खाऊ घालण्याचा प्रयत्न करा; पण त्याचे लहान तुकडे करावेत.
आकाराने लहान जे आपल्या बाळाला मुठीत योग्य प्रकारे पकडता येतात असे पदार्थ, आपल्या मुलांना दिले जाऊ शकतात.
लोहयुक्त पदार्थ : अशक्तपणा येऊ नये याकरिता मनुका, शेंगदाणा, लोणी, पालक यांचा आहारात समावेश करावा.
बाळासाठी अन्न तयार करताना घ्यावयाची काळजी
1. पदार्थ गुळगुळीत होईपर्यंत पातळ करण्याचा प्रयत्न करा. आपल्या बाळाला अन्नाचे मोठे घास देऊ नका. पदार्थ मऊ होईपर्यंत शिजवा.
2. स्ट्रॉबेरी, द्राक्षे आणि टोमॅटोचे लहान तुकडे करणे आवश्यक आहे, ज्यामुळे ते घशात अडकणार नाहीत.
3. मासे शिजवण्यापूर्वी माशांची त्वचा आणि हाडे, काटे काढून घ्यावीत.
4. कच्ची फळे आणि भाज्या, पॉपकॉर्न, कच्चे अंडे, चिकनचे मोठे तुकडे, न शिजविलेला मनुका खाऊ घालण्यास टाळावा.
बाळाला खाण्याची अॅलर्जी असेल, तर ते अन्न देण्यास टाळावे. त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
डॉ. पीयूष रणखांब