अकोला – कोरोनाच्या संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशा परिस्थितीत प्रतिबंधक उपाययोजनांची अंमलबजावणी प्रशासनातर्फे सुरु आहे. तथापि यासंदर्भात आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्ति संस्थांविरुद्ध कारवाई करण्याबाबत जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आदेश निर्गमित केले असून त्यात करावयाच्या कारवाईचे स्वरुप व कारवाई करणाऱ्या यंत्रणा निर्धारित करण्यात आल्या आहेत.
या आदेशात म्हटल्यानुसार, कोविड-१९ साथ उद्रेक कालावधीमध्ये नागरिकांच्या सार्वजनिक हिताचे दृष्टीने सार्वजनिक ठिकाणी वावरणाऱ्या नागरीकांनी चेहऱ्यावर मास्क, रुमाल किंवा इतर तत्सम आवरणांचा वापर करणे अपेक्षित आहे. मात्र अशा साधनांचा वापर न करणाऱ्यां विरुद्ध तसेच विविध यात्रा / जत्रा , धार्मिक उत्सव, समारंभ/ लग्नसमारंभ/ वाढदिवस, महोत्सव, स्नेहसंमेलने, सामुहीक कार्यक्रम, सभा, बैठक इ. ठिकाणी संबंधित व्यवसायिक,मालक,आयोजक यांना सी.सी.टी.व्ही लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. अशा आयोजनांतही ५० व्यक्तींपेक्षा जास्त व्यक्ती आढळुन आल्यास त्यांच्याविरुद्धही कारवाई करण्याबाबत निर्देशित करण्यात आले आहे.
यासंदर्भात संबंधीत विभागांनी काटेकोरपणे अंमलबजावणी होण्यासाठी त्यांचे अधिनस्त अधिकारी / कर्मचारी यांच्या पथकाचे गठन करावे. तसेच दुकानदार, प्रतिष्ठाने, पेट्रोलपंप भाजीपाला, फळ विक्रेते यांचेकडून उपरोक्त आदेशाची अंमलबजावणी होत नसल्याचे आढळून आल्यास त्यांचेवर फौजदारी प्रक्रिया संहिता -१९७३ चे कलम १४४ व मुंबई पोलीस अधिनियम -१९५१ , कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व फैलाव रोखण्याचे अनुषंगाने निर्गमित केलेले आदेश तसेच भारतीय दंड सहिता – १८६० चे कलम १८८ नुसार गुन्हे दाखल करुन व दंड वसूल करावा. त्यासाठी खालील प्रमाणे आदेश भंगाचे स्वरुप, करावयाची कारवाई व संबंधित विभाग यांना निर्धारित करण्यात आले आहे.
अ.क्र. | स्वरुप | करावयाची कारवाई | कार्यवाही करणारे संबंधीत विभाग |
१ | चेहऱ्यावर मास्क न लावणे | दोनशे रुपये दंड
व्यवसायीक, दुकानदार, ग्राहक, व्यक्ती |
पोलीस विभाग, महानगरपालिका, उपविभागीय दंडाधिकारी, तालुका दंडाधिकारी नगर परिषद, नगर पंचायत.
(सर्व संबंधीत विभागांनी तपासणी करतांना कार्यक्रमस्थळी सी.सी.टी.व्ही. बसविण्यात आले आहे किंवा नाही याची सुध्दा तपासणी करुन नियमानुसार कार्यवाही करावी.)
|
२ | दुकानदार/ फळभाजीपाला विक्रते /सर्व जिवनावश्यक वस्तु विक्रेते/ आस्थापना , मालक, दुकानदार, चहाटपरी, पानटपरी, हॉकर्स, विक्रेता | एक हजार रुपये दंड
(आस्थापना , मालक, दुकानदार , विक्रेता) |
|
३ | धार्मिक स्वरुपाच्या यात्रा, उत्सव, समारंभ/ लग्नसमारंभ/वाढदिवस, महोत्सव, स्नेहसंमेलने, सामुहीक कार्यक्रम, सभा, बैठका इत्यादी ठिकाणी. | रु. दहा हजार रुपये दंड तसेच ५० व्यक्तींपेक्षा जास्त आढळल्यास, प्रती व्यक्ती रु. २००/- या प्रमाणे जी जास्त रक्कम असेल ती.
(आयोजक, जागेचे मालक/व्यवस्थापक, व्यक्ती) |
असे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज निर्गमित केले आहेत.