हिवरखेड (धीरज बजाज)- गत अनेक महिन्यांपासून कायमस्वरूपी पशुवैद्यकीय अधिकारी नसल्याने हिवरखेड येथील शेतकरी आणि पशुपालक त्रस्त झाले आहेत. कायमस्वरूपी पशुवैद्यकीय अधिकारी अभावी वेळेवर उपचार न होऊ शकल्याने अनेक गुरे ढोरे प्राणास मुकली असल्याचेही शेतकऱ्यांनी सांगितले. सोबतच खाजगी डॉक्टरांकडे वारेमाप खर्च करावा लागत असल्याने आधीच कर्जबाजारी असलेल्या पशुपालकांचा वेळ, श्रम, पैसा, वाया जात आहे सध्या हिवरखेड चा प्रभार अन्य गावातील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडे देण्यात आल्यामुळे ते येथे नियमित सेवा देण्यास असमर्थ ठरतात. म्हणून हिवरखेड आणि परिसरातील अनेक गावांच्या हद्दीतील हजारो पशुपालकांचा व्याप बघता तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड येथे तात्काळ कायमस्वरूपी आणि कर्तव्य तत्पर पशुवैद्यकीय अधिकारी नियुक्त करण्यात यावा. असे साकडे हिवरखेड येथील पशुपालकांनी निवासी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे यांना प्रत्यक्ष निवेदन देऊन घातले आहे. ज्यावर मा. जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्हा पशुसंवर्धन अधिकाऱ्यांना याविषयी तात्काळ पत्र निर्गमित करण्याचे आदेश देण्यात आले.
सदर निवेदनावर मनोज किसनराव कनपटे, विशाल मधुकर दांडगे, शेषराव नामदेव इंगळे, शिवाजी यशवंत मसुरकार, दीपक विश्वनाथ गावंडे (भिकाजी), प्रशांत राजाराम कसूरकार, गजानन वासुदेवराव भड, देवलाल सदाशिव चव्हाण, शौकत शहा, नुरोद्दीन नियाजोद्दीन, इत्यादींच्या स्वाक्षरी आहेत.
प्रतिक्रिया:-
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पत्रावर जिल्हा पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी निर्णय घेऊन तात्काळ कायमस्वरूपी व कर्तव्यतत्पर पशुवैद्यकीय अधिकारी नियुक्त करावे अशी पशुपालकांची मागणी आहे.
मनोज किसनराव कनपटे
पशुपालक हिवरखेड.