सातारा : पिंप्रद, ता.फलटण येथे दि. 10 फेब्रुवारी रोजी माहुली उर्फ मौली झबझब पवार हिचा खून तिच्याच कुटुंबियांनी केला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने (एलसीबी) घटनेचा पर्दाफाश केला. जमिनीच्या वादातून हा मर्डर झाला असून खून झाल्यानंतर कुटुंबियांनी पाल जाळून दुसर्यांवर खोटा आरोप केला होता.
अप्पर पोलिस अधीक्षक धीरज पाटील यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. अधिक माहिती देताना सांगितले की, चार दिवसांपूर्वी माहुली पवार या महिलेचा खून करुन पाल जाळून टाकल्याप्रकरणी तक्रारदार कल्पना अशोक पवार हिने सतिश भगत, राजू मोरे, कुमार मोरे, सुनील मोरे (सर्व रा.पिंप्रद ता.फलटण) यांच्याविरुध्द पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करुन संशयित चौघांना अटक केली व त्यांची पोलिस कोठडी घेतली. पोलिस तपास करत असताना तक्रारदार यांच्यासह त्यांच्या नातेवाईकांचा जबाब घेतल्यानंतर त्यामध्ये तफावत आली. तसेच चौकशीसाठी काही जणांना बोलावल्यानंतर त्यांनी पोलिसांसमोर येण्यास टाळाटाळ करत ते पसार झाले.
अटक केलेल्या संशयितांचा सहभाग नसल्याचे पोलिसांना स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी उलट तपासाला सुरुवात केली. यामध्ये पोलिसांना धक्कादायक माहिती समोर आली. मूळ तक्रारदार कल्पना पवार हिच्यासह तिचे कुटुंबिय यामध्ये अशोक झबझब पवार, ज्ञानेश्वर उर्फ कमांडो उर्फ किमाम अशोक पवार, गोपी अशोक पवार, विशाल अशोक पवार, रोशनी रासोट्या काळे, काजल उर्फ नेकनूर पोपट पवार, मातोश्री ज्ञानेश्वर पवार (सर्व रा.अलगुडेवाडी ता.फलटण) यांनी माहुली पवार हिचा खून केल्याचे समोर आले. या सर्व संशयितांचा व यांनी आरोप केलेल्यांचा यांच्यामध्ये जमिनीवर वाद सुरु आहेे. या वादातून पुढच्या पार्टीला कामाला लावण्यासाठी संशयित दहा जणांनी कट रचला. माहुली पवार हिच्या डोक्यात दगड घालून गंभीर जखमी केले. त्यानंतर संशयितांनीच झोपडी पेटवून देवून जाळले. जमिनीच्या वादातून हे कृत्य केल्यानंतर उलट चौघांवर आरोप करत त्यांच्यावर खूनाचा गुन्हा दाखल करुन सारवासारव केली.
एलसीबीच्या पथकाने याप्रकरणी तांत्रिक प्रकरणासह इतर अनेक बाबींचा तपास केला व पुरावे मिळवले. त्यानुसार मूळ संशयितांना अटक करण्यास सुरुवात केली. घटनेची उकल झाल्यानंतर पत्रकार परिषद घेवून पोलिसांनी ही माहिती दिली. पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलिस अधीक्षक धिरज पाटील, पोनि किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि रमेश गर्जे, सपोनि आनंदसिंग साबळे, सहाय्यक फौजदार उत्तम दबडे, ज्योतीराम बर्गे, तानाजी माने, पोलिस हवालदार संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, साबीर मुल्ला, मंगेश महाडीक, प्रवीण फडतरे, रवि वाघमारे, निलेश काटकर, प्रमोद सावंत, अमित सपकाळ, विक्रम पिसाळ, वैभव सावंत, मोहसिन मोमीन, पंकज बेसके, गणेश कचरे यांनी कारवाईत सहभाग घेतला.
संशयितांवर गंभीर गुन्ह्यांची मालिका…
पोलिसांनी दुसर्या टप्प्यात संशयित आरोपींना अटक केल्यानंतर त्यांचे रेकॉर्ड पाहिले असता धक्कादायक असल्याचे समोर आले आहे. यापूर्वी या संशयितांवर खून, खूनाचा प्रयत्न, अपहरण, खंडणी, जबरी चोरी, मारामारी, गर्दी मारामारी, दुखापत यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. अशातच खून करुन तो जाळल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, दहा जणांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यातील 8 जणांना अटक करण्यात आली असून पोलिस पुढील तपास करत आहेत.