हिवरखेड (धीरज बजाज)– तेल्हारा चे तहसीलदार राजेश गुरव आणि त्यांची टीम हे रेती माफियांसाठी कर्दनकाळ ठरत असून दोनच दिवसात वेगवेगळ्या घटनांमध्ये अवैधरित्या रेतीची वाहतूक करणारे चार ट्रॅक्टर ट्रॉली त्यांनी आपल्या टीमच्या सहकार्याने धाडसी कार्यवाही करीत हिवरखेड, तेल्हारा पोलीस ठाण्यांमध्ये जमा केले आहेत.
अडगाव बु. येथे दि 8 फेब्रुवारी रोजी रात्री 1 ब्रास रेती घेऊन जात असताना विना नंबरचा ट्रॅक्टर ट्रॉली सह तलाठी किशोर गायकी, रोशन देशमुख, महेश राठोड, यांनी पकडला असता ट्रॅक्टर चालक मालक यांनी गैर कायद्याची मंडळी जमवुन अडथळा निर्माण केला होता. त्याठिकाणी तेल्हारा चे तहसीलदार श्री राजेश गुरव व तलाठी वाकपांजर यांनी पोहोचून सदर वाहन पोलीस स्टेशन हिवरखेड येथे जमा केले. आरोपींमध्ये शेख अजीम शेख जाबीर चालक वय 33 राहणार अडगाव, अब्दुल रहिम अब्दुल रकिब ट्रॅक्टर मालक राहणार अडगाव यांचा समावेश असल्याची माहिती सुत्राकडून मिळाली आहे.
दुसरीकडे मौजे चिचारी येथे तलाठी किशोर गायकी यांनी ट्रॅक्टर मालक मोहम्मद उमर मोहम्मद अनिसोद्दीन रा. दिवाणझरी यांचा ट्रॅक्टर चालक मुख्तार खा मेहबूब खा वय 35 रा.दिवानझरी हा 1 ब्रास रेती ट्रॅक्टर ट्रॉली मध्ये अवैधरित्या घेऊन जाताना पकडला. तद्नंतर तलाठी किशोर गायकी यांनी खंडाळा येथील ट्रॅक्टर ट्रॉली मालक चालक सतीश दौलत पाटोळे यांचा विना क्रमांकाचा ट्रॅक्टर ट्रॉली घेऊन जात असताना पकडला. सदर दोन्ही वाहने विनापरवाना रेतीची वाहतूक करीत होते त्यानंतर तलाठी रोशन देशमुख, महेश राठोड, यांच्या मदतीने पोलीस स्टेशन हिवरखेड येथे लावण्यात आले. तत्पूर्वी मौजे शेरी बुद्रुक तालुका तेल्हारा येथे विनापरवाना रेती वाहतूक करीत असताना टिप्पर वाहन क्रमांक एम एच 27 BB 2677 आढळल्या वरून पोलीस स्टेशन तेल्हारा येथे लावण्यात आलेला आहे. सदर कारवाई करते वेळी तेल्हारा तहसीलदार राजेश गुरव यांचे सोबत तलाठी किशोर गायकी व प्रवीण वाकपांजर होते.
एकंदरीत तहसीलदारपदी राजेश गुरव हे रुजू झाल्यापासून त्यांनी रेती माफियांवर धडाकेबाज कारवायांचा सपाटा लावला असून आजपर्यंत त्यांनी आणि त्यांच्या सहकारी तलाठ्यांनी आणि महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अवैध रेतीची वाहतूक करणारी अनेक वाहने तालुक्यातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये जमा केलेली आहेत. आणि आरोपींवर लक्षावधी रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्यांच्या धाडसी कारवायांमुळे कायदा आपल्या खिशात असल्याचा समज असलेल्या कुख्यात रेती माफियांचे धाबे चांगलेच दणाणले असून जोपर्यंत गौण खनिजे आणि रेती माफियांना पूर्णपणे आळा बसत नाही. तोपर्यंत स्वस्थ बसणार नसल्याच्या जणू चंगच तहसीलदार राजेश गुरव आणि त्यांच्या चमूने बांधलेला दिसत आहे. बेफाम झालेल्या वाळू माफियांना लगाम लावण्याचे काम तहसीलदार करीत असल्याने जनतेमध्ये त्यांचे आणि संबंधित कर्मचाऱ्यांचे कौतुक होत आहे. जप्त केलेले अनेक ट्रॅक्टर ट्रॉली विना क्रमांकाचे असून दिवसाढवळ्या विना क्रमांकाची वाहने कोणाच्या आशीर्वादाने धावतात आणि त्यावर कोणतीच कारवाई का होत नाही हा प्रश्न जनतेच्या मनात निर्माण होत आहे.