नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर परेड दरम्यान झालेल्या तोडफोड आणि हिंसाचारानंतर दिल्ली पोलिस ॲक्शन मोडमध्ये आहेत. शेतकरी नेत्यांवर गुन्हे नोंद केल्यानंतर आता त्यांना कारणे दाखवा नोटिसा जारी केल्या जात आहेत. पोलिसांनी क्रांतिकारी किसान युनियनचे प्रमुख दर्शन पाल सिंह यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यांना ३ दिवसांच्या आत उत्तर देण्यासाठी मुदत दिली आहे. प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावर झालेला हिंसाचार हा निषेधार्ह आणि देश विरोधी कृत्य असल्याचे सांगत या प्रकरणी कारवाई का करु नये, असे पोलिसांनी नोटिसीत म्हटले आहे.
प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसाचारात ज्यांचा सहभाग होता त्यांची नावे सांगावीत, अशी विचारणाही शेतकरी नेत्यांना करण्यात आली आहे. ट्रॅक्टर रॅली दरम्यान निर्धारित अटींचे उल्लंघन केल्याचा ठपका पोलिसांनी शेतकरी नेत्यांवर ठेवला आहे.
प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅली दरम्यान झालेल्या हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी २५ गुन्हे दाखल केले आहेत. तर १९ जणांना अटक केली आहे. तर ५० आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. मेधा पाटकर, योगेंद्र यादव, दर्शन पाल, गुरनाम सिंह चढुनी, राकेश टिकैत, कुलवंत सिंह संधू, सतनाम सिंग पन्नू, जोगिंदर सिंह उग्राहा, सुरजीत सिंह फूल, जगजीत सिंह डालेवाल, बलबीर सिंह राजेवाल आणि हरिंदर सिंह राजेवाल आणि हरिंदर सिंह लाखोवाल यांच्याह ३७ शेतकरी नेत्यांची नावे एफआयआरमध्ये नोंद केली आहेत.
याआधी दिल्ली पोलिस आयुक्त एस. एन. श्रीवास्तव यांनी आरोप केला होती की, दिल्लीत प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसाचारात शेतकरी नेत्यांचा सहभाग होता. दोषींना सोडले जाणार नाही. पोलिसांसमोर सर्व पर्याय होते मात्र त्यांनी संयम कायम ठेवला. आम्ही परिस्थिती योग्यरितीने हाताळली. यामुळे ट्रॅक्टर परेड दरम्यानच्या हिंसाचारावेळी पोलिसांच्या कारवाईत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
शेतकरी नेते सतनाम सिंग पन्नू, दर्शन पाल, राकेश टिकैत तसेच इतरांनी केलेल्या चिथावणीखोर भाषणामुळेच जमाव आक्रमक झाला. जमावाने पोलिसांचे सुरक्षा कडे तोडून राजधानी दिल्लीत प्रवेश केला. हिंसाचाराला शेतकरी नेतेच जवाबदार असून कट रचणाऱ्या प्रत्येकांविरोधात कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा दिल्लीचे पोलीस आयुक्त एस. एन. श्रीवास्तव यांनी दिला आहे.
शेतकरी आंदोलना दरम्यान ३९४ पोलीस कर्मचारी जखमी झाले .यातील काही कर्मचारी अतिदक्षता विभागात आहे. पोलिसांची ३० वाहने, ४२८ बॅरिकेड्स , ८ टायर किलर, ६ कंटेनर तसेच इतर मुद्देमालाचे नुकसान झाले, असा दावा देखील त्यांनी केला आहे.
२५ तारखेलाच शेतकरी नेत्यांनी दिलेले आश्वासन तोडण्यास सुरवात केली. शेतकऱ्यांच्या आंदोलनस्थळी व्यासपीठाचा ताबा आक्रमक नेत्यांनी घेतला. त्यांनी तरुणांना चिथावण्यास सुरुवात केली, असे पोलिसांचे म्हणणे आहे.