अकोला – जिल्ह्यात महिला व बालकांमध्येही रक्ताल्पतेची (ॲनिमिया) लक्षणे असणे ही वेळीच दक्ष होण्याची बाब आहे. रक्ताल्पते मुळे महिलांचे आरोग्य व बालकांच्या वाढीवर विपरित परिणाम होऊ शकतो. त्यात त्यांचा बौद्धिक विकास ही प्रभावित होऊ शकतो. तेव्हा माता व बालकांचा आहार हा पोषणयुक्त असावा याबाबत जनजागृती आरोग्य व महिला बालकल्याण विभागाने करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज येथे दिले.
रक्ताल्पता अर्थात ॲनिमियामुक्त अकोला जिल्हा याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात आरोग्य विभाग व महिला व बालविकास विभागाच्या वतीने अधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरव कटीयार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, महिला व बालविकास अधिकारी विकास मरसाळे, स्त्री रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षक डॉ. आरती कुलवाल, राष्ट्रीय ग्रामिण आरोग्य अभियानाचे होशांगस्वामी काळे उपस्थित होते.
यावेळी माहिती देण्यात आली की, बालकांच्या वाढीचे वयात त्यांचा आहार हा परिपूर्ण असावा. त्यासाठी बालकांच्या आहारात प्रथिने, लोह व कॅल्शियमच्या घटकांचा समावेश असावा. त्याच प्रमाणे महिलांमध्ये रक्ताल्पता अधिक दिसून येते त्याचे प्रमाण कमी करण्यासाठी महिलांमध्ये आहाराबाबत जनजागृती करणे आवश्यक आहे.
जिल्ह्यात शून्य ते पाच वर्षे वयापर्यंतच्या बालकांची उंची व वजन यांच्या नोंदी घेण्याचे काम अंगणवाडी सेविकांमार्फत करावे. त्याच्या नोंदी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांकडे असणे आवश्यक आहे. घरोघरी जाऊन माता व बालकांच्या आहाराबाबत माहिती देण्याचेही काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी पापळकर यांनी दिले.