अकोला : सध्याच्या काळात अनेकांचा पगार हातात न देता त्यांच्या बॅंकेच्या खात्यावर जमा केला जातो. एवढंच काय तर प्रत्येक वेळी छोटी-मोठी रक्कम काढण्याकरीता जवळच्या एटीएममध्ये किंवा बॅंकेत जावे लागते. दररोज मोठ्या प्रमाणात एटीएममधूनच पैसे काढले जातात. परंतु, एटीएममधून पैसे काढायला गेलेल्या अनेकांची फसवणूक झाल्याच्या अनेक घटना उघडकीस येत आहेत.
डाबकी रोड पोलिस स्टेशनच्या हद्दीतील रेणुकानगर परिसरातील रहिवाशी श्रीमती नीलिमा रुपेश काचकुरे (वय ४७) यांनी बँक खात्यातून रक्कम लंपास झाल्याची तक्रार दिली होती.
त्यांचे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम कार्डचे अज्ञात इसमाने संगणक तंत्रज्ञानाचा उपयोग करून क्लोन तयार केला. त्यांचे बँक खात्यातून दोन वेळा प्रत्येकी १० हजार असे एकूण २० हजार परस्पर काढून घेतले. त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पोलिस तक्रार देण्यात आली. तक्रारीच्या आधारावर कारवाई करून आरोपीला अटक करण्यात आली आहे. अशा प्रकारे फसवणूक करण्याच्या गुन्ह्यात आजपर्यंत एकूण ३ लाख २९ हाजर ५५५ रुपयांचा निष्पन्न झाले आहे.
बिहारमधून घेतले ताब्यात
एटीएमचे क्लोन तयार करणाऱ्या रणधीरकुमार सरजूसिंह (वय ३४) याला बिहारमधील गया जिल्ह्यातील फतेहपूर पोलिस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या पहाडपुरा येथून पोलिसांनी अटक केली. आरोपीने सदर गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. पुढील तपास डाबकी रोड पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विजय नाफडे करीत आहेत.
असं तुमच्या सोबत घडलं तर काय कराल?
समोरील व्यक्तीने आपल्याला फोन करून एटीएम कार्डाची माहिती आणि ओटीपी नंबर विचारला तर त्याला प्रतिसाद देऊ नका.
त्यामुळे तुमच्या खात्यावरून पैसे चोरीस जाण्याची शक्यता आहे. मात्र कोणताही फोन आला नाही आणि तुम्ही ओटीपी क्रमांकही दिला नाही आणि तरीही तुमच्या खात्यातील पैसे चोरीस गेले तर तुमचे कार्ड क्लोनिंग झाले असे समजायला हरकत नाही.
एटीएम मशिनमध्ये आपण ज्या ठिकाणी कार्ड टाकतो, त्या ठिकाणी क्लोनिंग मशिन लावली जाते. ही मशिन लावल्याचे अनेकदा समजूनही येत नाही.
तसेच एका छोट्या छुप्या कॅमेराद्वारे तुमचा पासवर्ड चित्रीत केला जातो. चोरटे याच माहितीच्या आधारे नवीन एटीएम कार्ड तयार करून तुमचा पासवर्ड वापरून बॅंकेतील पैसे परस्पर काढतात.
बॅंकेत तक्रार करा
जर तुम्ही कोणालाही ओटीपी क्रमांक दिलेला नसला आणि तरीही बॅंकेतून पैसे परस्पर काढले गेले तर त्याची त्वरित बॅंकेत डिस्पूट फॉर्म भरून तक्रार करा. तसेच पोलिसांच्या सायबर विभागाकडेही लेखी तक्रार करा. रिझर्व्ह बॅंकेच्या नियमानुसार तर खातेदाराची चूक नसल्यास त्यास ९० दिवसांच्या आत परत पैसे द्यावे लागतात.