नववर्षाच्या सुरुवातिलाच म्हणजे जानेवारी महिन्यात राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या दोन परिवर्तनाच्या अत्युच्च टोकावरील महामेरू असणाऱ्या महानायिका यांचा जयंती उत्सव सगळीकडे मोठ्या प्रमाणात उत्साहाने साजरा केला जातो. त्याला कारणही तसेच आहे. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य बहुजनांच्या उत्थानासाठी, दिन दुःखिताच्या विकासासाठी, स्त्रियांच्या स्वातंत्र्यासाठी खर्ची घातले. त्यासाठी त्यांनी आजन्म संघर्ष करत जीवन अर्पण केले.
दोन्ही कडून समृद्ध वारसा
राजमाता जिजाऊ आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना माहेर आणि सासर दोन्ही बाजूने समृद्ध वारसा लाभलेला होता. जिजाऊंचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथील पराक्रमी तथा बलाढ्य सरदार राजे लखुजीराव जाधव व आई माळसाबाई यांच्या पोटी १२ जानेवारी १५९८ रोजी झाला . राजेशाही वारसा लाभलेला असल्यामुळे विवाहसुद्धा पराक्रमी, धनसंपन्न, लढवय्या, शूरवीर असणाऱ्या वेरुळच्या भोसले घराण्यातील शहाजीराजे यांच्या सोबत झाला.
सावित्रीबाईंचा जन्म सातारा जिल्ह्यातील नायगाव येथील परंपरागत पाटीलकी लाभलेल्या खंडोजी नेवसे पाटील यांच्या समृद्ध घराण्यामध्ये सन ३ जानेवारी १८३१ रोजी झाला होता. तर विवाह फुलांचा परंपरागत व्यवसाय करणारे शेती व संपत्तीने संपन्न, तसेच मुळचे कटगुन येथील रहिवासी, परंतु पुण्यामध्ये व्यवसायाच्या निमित्ताने स्थायिक झालेले गोविंदराव फुले यांचा मुलगा ज्योतिराव यांच्यासोबत झाला. दोघींनीही आपआपल्या राजकीय, वैचारिक तथा सुसंस्कारित समृद्ध वारशाचं गाठोडं पाठीशी घेऊन सासरी प्रयाण केलं होतं.
अंधश्रद्धा लाथाडली
शहाजीराजे नेहमी लढायांच्या विजयी मोहिमांवर असल्यामुळे मिळालेल्या जहागीरीकडे त्यांना लक्ष द्यायला वेळ मिळत नव्हता. म्हणून त्यांनी तो भार जिजाऊ व बाल शिवाजी यांच्यावर सोपवला. पुण्याला वास्तव्यास गेले असता, आजचे समृद्ध पुणे त्यावेळी जगदेव मुरार कुलकर्णी या आदिलशहाच्या नोकराने बेचिराख करून त्यावर गाढवाचा नांगर फिरवत लोखंडी पहारीवर उलटे खेटर टांगुन, वस्ती करणाऱ्यांचा निर्वंश होईल अशी भीती पसरून दिलेली असल्यामुळे सर्व जनता सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यात परागंदा झालेली होती. जिजाऊंनी मनात थोडीही भीती न बाळगता खेटरासह पहार उखडण्यास सांगून, हाती सोन्याच्या फाळाचा नांगर देऊन स्वतः वास्तव्यास सुरुवात केली. पतीनिधनानंतर सती न जाता सर्व सोपस्कार नाकारून मनुस्मृतिलाही तिलांजली दिली.
सावित्रीबाईंनी समाजामध्ये पसरलेल्या सर्व अफवा तथा भ्रम ठोकरून अनेक समाज अमान्य कामं हाती घेतली. स्वतः शिक्षण घेऊन महिला तथा अस्पृश्यांना शिक्षण दिले. विधवा विवाह लावून दिले. विधवांसाठी प्रसूतिगृह काढली. विधवांच्या समाजमान्य किळसवाण्या जीवनाला विरोध केला. भटाविना विवाह पार पाडले. भाषण लेखन तथा कवितांच्या माध्यमातून समाजजागृती केली. एवढेच नव्हे तर ज्योतिराव फुले यांच्या निधनानंतर टिटवे धरण्यासाठी व चितेला अग्नि देण्यासाठी दत्तकपुत्र यशवंताला भावकीने विरोध केला. तेव्हा सावित्रीबाईंनी स्वतःच्या हातामध्ये टिटवे धरून स्मशानात जाऊन पतीच्या चितेला अग्नी दिला.
आजीवन संघर्ष
समाजातील महिलांसह दुर्बल घटकांना सुखी करण्यासाठी दोन्ही महानायीकांना सतत आजीवन, तहहयात संघर्ष करावा लागला. वास्तविक पाहता त्यांना दोन्ही बाजूंनी समृद्ध धनसंपन्न वारसा लाभलेला असताना परिस्थितीनुरुप इतरांप्रमाणे आनंददायी सुखमय जीवन व्यतीत करता आले असते. परंतु तसे न करता जिजाऊंनी रयतेच्या सुखासाठी आपणहून संघर्ष ओढवून घेतला. त्यामुळे त्यांना कधी वडील आणि पती यांच्यामधील संघर्ष पहावा लागला, तर कधी शहाजीराजे, शिवाजीराजे, संभाजीराजे यांचे प्राण पणास लावावे लागले. तरीही न डगमगता, थोडीही कच न खाता त्यांनी स्वतःपेक्षा रयतेच्या सुखाला महत्त्व दिले.
सावित्रीबाईंच्या कार्यामुळे समाजातील प्रस्थापित, मनुवादी, ब्राह्मणी लोक मोठ्या प्रमाणावर नाराज होऊन संतप्त झाले. समाजामध्ये पसरलेल्या भ्रमामुळे पती ज्योतिराव वगळता घरच्यांनी त्यांच्या हातचे बनवलेले जेवण खाणे बंद केले. तर काहींच्या फूस लावण्यामुळे सावित्रीबाईंना पतीसह घरदार सोडावे लागले. शिक्षणाचे पवित्र कार्य करत असताना लोकांच्या शिव्याशाप, दगड, शेण, माती अंगावर झेलावी लागली. एकदा तर त्यांना भाडोत्री मारेकरी सुद्धा मारण्यासाठी आले होते. परंतु त्यांचे समाजाभिमुख कार्य पाहता त्यांना मारण्यासाठी आलेले मारेकरी त्यांचे पहारेकरी बनले. लोकांना सत्य समजण्यासाठी जोतिरावांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली त्या माध्यमातून २५ डिसे.१८७३ रोजी पहिला विनाभटजी सत्यशोधकी विवाह घडवून आणला. जोतीरावांच्या निधनानंतर सत्यशोधक समाजाचे कार्य सावित्रीबाईंनी अव्याहत पुढे चालू ठेवले. त्यासाठी त्यांनी अनेक ठिकाणी सभा घेऊन भाषणे दिली.
अशीही वाताहत!
शहाजीराजांनी उघड्या डोळ्यांनी स्वराज्याचं देखणं स्वप्न पाहिलं. जिजाऊंनी ते आपल्या डोळ्यांमध्ये समर्थपणे पेलत दोन छत्रपतींना आकार देऊन कुळवाडीभूषण रयतेचं राज्य निर्माण केलं. परंतु जिजाऊंच्या मृत्यूनंतर काही वर्षातच शिवाजीराजांचा कटकारस्थानी अंत झाला. त्यानंतर सतत नऊ वर्ष संभाजी राजांनी स्वराज्याची धुरा समर्थपणे पेलत स्वराज्याचा दरारा निर्माण केला. परंतु फंदफितुरीमुळे त्यांचाही दुर्दैवी करुण अंत झाला. संभाजीराजांच्या नंतर राजाराम महाराज व त्यांची पत्नी महाराणी ताराबाई यांनी स्वराज्याची वाताहात टाळण्याचा प्रयत्न केला. परंतु औरंगजेबाच्या मृत्यूनंतर महाराणी ताराबाईंच्या काळात वारसा हक्काचा वाद निर्माण होऊन स्वराज्याची दोन शकले निर्माण झाली. तेंव्हाच स्वराज्यामध्ये पेशवेपद उदयास आले. त्यामुळे छत्रपती पदाची प्रतिष्ठा कमी होऊन ते नाममात्र उरले. पेशवाई मध्ये शिवाजी महाराजांच्या विचारांना हरताळ फासण्यात येऊन रयत हितापेक्षा पेशव्यांनी समाजहितास प्राधान्य दिले. जातीयता, अस्पृश्यता, स्त्रियांची गुलामी, अन्याय, अत्याचार, अनाचाराने पेशवाईमध्ये परिसीमा गाठली. त्यामुळे १ जाने. १८१८ साली पेशवाईचा अंत होऊन सर्व सत्ता ब्रिटिशांच्या हातामध्ये एकवटली.
ज्योतिराव फुले यांच्या निधनानंतर सावित्रीबाईंच्या जीवनाला उतरती कळा सुरू झाली. तेवढ्यात बडोदा नरेश श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी त्यांना पेन्शन सुरू केली. पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्लेगची साथ आली. बाधितांना इलाज करण्यासाठी पुत्र डॉ. यशवंताला विदेशातून बोलावून ससाण्याच्या माळराणावर दवाखाना टाकण्यास सांगितले. त्यामध्ये प्लेगग्रस्तांना त्या स्वतः घेऊन जात होत्या. पांडुरंग बाबाची गायकवाड या अस्पृश्य मुलाला आपल्या कडेवर दवाखान्यात नेताना सावित्रीबाईंना प्लेगची लागण होऊन त्यातच त्यांचा १० मार्च १८९७ रोजी अंत झाला. पुढे डॉ. यशवंताचेही १३ ऑक्टोबर १९०६ रोजी प्लेगमुळेच निधन झाले. नंतर सावित्रीबाईंची सून व नात यांच्या वाटेला अतिशय दुर्दैवी दिवस आले. खायला अन्न मिळत नाही म्हणून प्रथम ज्योतिराव फुलेंची पुस्तके व नंतर शंभर रुपयांना घर विकले. बेघर झाल्यानंतर सुनेचा रामेश्वराच्या मंदिरात बेवारस मृत्यू होऊन, त्यांचा अंत्यविधी नगरपालिकेने केला.
दीनांच्या सख्यत्वासाठी,पडाव्या जिवलगाशी तुटीl*
सर्व अर्पावे शेवटी, प्राण तोही वेचावाl
या तुकाराम महाराजांच्या अभंग प्रमाणे जिजाऊ सावित्री या दोन्ही महानायिकांनी आपले सर्वस्वच नव्हे, तर जीवनही अर्पण केले. म्हणून त्यांचा त्याग, समर्पण, कष्ट आठवून त्यांच्याप्रती आम्ही कृतज्ञ असलो पाहिजे. त्यांच्या विचाराभिमुख समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी, संविधानाला अपेक्षित मानवी मूल्याधिष्ठित समाज निर्माणासाठी कार्य केले पाहिजे. तरच त्यांची खरी जयंती, तरच त्यांना खरे अभिवादन!…….
भिमराव परघरमोल
व्याख्याता तथा अभ्यासक
फुले शाहू आंबेडकरी विचारधारा
तेल्हारा जि. अकोला
मो.९६०४०५६१०४