अकोला – महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी सुरु असुन या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील १९८६ खातेदारांचे अद्यापही आधार प्रमाणिकरण झालेले नाही. अशा पात्र लाभार्थ्यांना अखेरची संधी म्हणून सोमवार दि.४ रोजी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे सहाय्यक निबंधक एस. डब्ल्यू. खाडे यांनी दिली आहे.
यासंदर्भात दिलेल्या माहिती पत्रकात म्हटले आहे की, महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने अंतर्गत दि. १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीमध्ये कर्ज घेतलेल्या व दि. ३० सप्टेंबर २०१९ पर्यत व्याजासह दोन लाखापर्यंत थकित कर्जाची रक्कम संबधीत पात्र शेतकऱ्याच्या कर्जखात्यावर शासनामार्फत वर्ग करण्यात येते.
त्यासाठी जिल्ह्यात दि.२४ डिसेंबर २०२० अखेर एक लाख १५ हजार ६७६ खाती अपलोड करण्यात आली आहेत. त्यापैकी एक लाख एक हजार २९४ खातेदारांना विशिष्ट क्रमांक देण्यात आला आहे. त्यापैकी ९९ हजार ३०८ पात्र खातेदारांचे आधार प्रमाणिकरण करण्यात आले आहे. अद्याप १९८६ पात्र खातेदारांचे प्रमाणिकरण शिल्लक आहे.
या योजनेअंतर्गत संबधीत बॅंकांनी कर्जमुक्ती योजनेच्या पोर्टलवर शेतकऱ्यांचा डाटा भरलेला असून त्यांची छाननी करुन पात्र शेतकऱ्याच्या याद्या पोर्टलवर उपलब्ध आहेत. ज्या शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करणे शिल्लक आहे अशा पात्र लाभार्थ्यांसाठी सोमवार दि. ४ रोजी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. आधार प्रमाणीकरण न झालेल्या शेतकऱ्यांनी या शिबीराचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थाचे सहाय्यक निबंधक(प्रशासन) एस. डब्ल्यू. खाडे यांनी केले आहे.
महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थी यादीतील शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करणे बंधनकारक आहे. आधार प्रमाणीकरण झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात रक्कम जमा होण्याची कार्यवाही सुरु होते. आधार प्रमाणीकरण करताना पोर्टलवरील माहितीचे काळजीपूर्वक अवलोकन करुन आधार क्रमांक व लाभाची रक्कम याची तपासणी करावी. बॅंकेने भरलेल्या पोर्टलवरील माहितीत आधार क्रमांक किंवा रक्कम चुकीची असल्यास केंद्र चालकास सांगून अनुक्रमे आधार क्रमांक अमान्य् किवा रक्कम अमान्य् असा पर्याय निवडावा. असा पर्याय निवडल्यानंतर त्यांची ऑनलाईन तक्रार निर्माण होऊन जिल्हास्तरीय समितीकडे वर्ग केली जाते. त्यांची शेतकऱ्यांना पावती मिळते. आधार क्रमांक व रक्कम योग्य असल्यास आधार प्रमाणिकरण यशस्वीपणे पूर्ण झाल्याची पावती मिळते. आधार प्रमाणीकरण करतांना बोटांचे ठसे जुळत नसल्यास त्यांचीही ऑनलाईन तक्रार निर्माण होऊन आपल्या तालुक्याच्या तहसिलदारांकडे वर्ग केली जाते.
जिल्ह्यात अकोला तालुक्यातील ४३०, अकोट- २६९, बाळापूर- ४५९, बार्शिटाकळी-१३७, मुर्तिजापूर-२७१, पातूर-१५० व तेल्हारा तालुक्यातील २७० असे एकूण १९८६ पात्र खातेदारांचे आधार प्रमाणीकरण करणे शिल्लक आहे. जिल्ह्यातील लाभार्थी यादीतील आधार प्रमाणिकरण न झालेल्या या सर्व पात्र शेतकऱ्यांनी जवळच्या सी.एस.सी. किंवा आपले सरकार सेवा केंद्र येथे जाऊन आधार प्रमाणिकरण करुन घ्यावे. आधार प्रमाणिकरण संदर्भात काही अडचणी असल्यास आपल्या बॅंकेचे शाखा व्यवस्थापक, सेवा सहकारी संस्थेचे सचिव, तालुका उपसहाय्यक निबंधक, सहकारी संस्था कार्यालय, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था अकोला कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.