इतिहासाच्या अनुषंगाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर तथा काही इतिहास तज्ज्ञांनी आपली मते व्यक्त करताना म्हटले की, जो समाज, जे राष्ट्र, जी पिढी आपला इतिहास विसरते ते इतिहास घडवू शकत नाहीत. तसेच ते इतिहास विसरल्यास एकतर काळाच्या ओघात लूप्त होतात किंवा कुणाचेतरी गुलाम बनतात. जे इतिहासापासून धडा घेत नाहीत त्यांना इतिहास धडा शिकवल्याशिवाय राहत नाही. जेवढा ज्यांचा इतिहास उज्ज्वल असतो तेवढेच त्यांचे भविष्यही.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातील मनुवादी, विषमतावादी, ब्राह्मणी व्यवस्थेविरुद्ध दंड थोपटण्याचा साठी सन १९१६ पासून सुरुवात केली. ते विविध प्रकारे अस्पृश्यांच्या मनाचं बौद्धिक सिंचन करीत होते. त्यासाठी वर्तमानपत्र तथा ठिकठिकाणी परिषदा घेऊन लोकजागृतीचे कार्य मोठ्या जोमाने सुरु होते. पिढ्यानपिढ्या अस्पृश्यांच्या अंगवळणी पडलेली गुलामी, व्यवस्थेविरुद्धची भीती कमी करून आम्हीही नैसर्गिक हक्काचे अधिकारी आहोत हे व्यवस्थेला बजावण्याचे आटोकाट प्रयत्न चालू होते. परंतु जातीयवादी निगरगट्ट झालेली मानसिकता बदलण्यास तयार होत नव्हती. हजारो वर्षापासून क्रमिक असमान जातिव्यवस्थेने प्रदान केलेले वरिष्ठ स्थान स्वतःहून सोडून, समता स्विकारण्याजोगा मनाचा मोठेपणा त्यांच्याकडे नसल्याचे प्रतीत होत होते. म्हणून रस्त्यावर उतरून जातीश्रेष्ठ मानसिकतेला आव्हान देण्याचा कार्यक्रम राबवण्याचा विचार कुठेतरी अंकुरत होता. एवढ्यातच १९२६ साली ब्रिटिशांनी महार (अस्पृश्य) जातीच्या तरुणांना सैन्यात व पोलिसात प्रवेश नाकारला. जे काही होते त्यांना आर्थिक सबबीखाली खालसा करण्यात आले. म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दोन्ही पातळ्यांवर म्हणजे ब्रिटिश सत्तेसोबत ज्यांनी संपूर्ण देश काबीज करून गुलाम केला होता व दुसरे म्हणजे ज्यांनी अस्पृश्यांच्या हजारो पिढ्या आपल्या कह्यात ठेवत त्यांना विविधांगी पंगू बनवून असाहाय केले होते अशी मनूची संतान. या द्वयिंसोबत दोन हात करण्याचा निर्धार केला.
सन १९२७ पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाड क्रांती संग्रामाच्या रूपाने चवदार तळ्याचा सत्याग्रह व मनुस्मृति दहन करून व्यवस्थेला अंतर्बाह्य हादरून सोडले. तर ब्रिटिशांच्या स्टार्ट कमिशन, सायमन कमिशन व इंग्लंड ला आयोजित वर्तुळ परिषद (राउंड टेबल कॉन्फरन्स) समोर आपल्या सुधारणा विषयक मागण्यांची प्रभावी मांडणी करून त्यांना मान्य करण्यास भाग पाडले. ह्या ऐतिहासिक परिवर्तन क्रांती लढ्याला सुरुवात करण्यापूर्वी त्यांनी कुठेतरी आपल्या पूर्वजांचा १ जानेवारी १८१८ चा जाज्वल्य प्रेरणादायी इतिहास वाचला होता. त्या इतिहासापासून समाज प्रेरित करण्यासाठी त्यांनी १ जानेवारी १९२७ रोजी हजारो कार्यकर्त्यांसह भीमा कोरेगावला जाऊन शौर्यस्तंभाला मानवंदना दिली. तिथे त्यांच्या ऐतिहासिक भाषणही झाले. त्या भाषणांन्वये कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी त्यांची राष्ट्रभक्ती प्रतीत होते. भाषण करताना एकीकडे ते म्हणतात की, ‘ स्वकीयांच्या म्हणजे पेशव्यांच्या विरोधात लढण्याचा आमच्या पूर्वजांचा पराक्रम फारसा भूषणावह नसला, तरी तो तत्कालीन सामाजिक परिस्थितीचा परिपाक होता.’ तर कार्यकर्त्यांना पेटवण्यासाठी ते म्हणतात की, ‘ आजचे अस्पृश्य लोक जरी कोंबड्या-बकऱ्या सारखे बळी देण्यालायक मेष राशीचे दिसत असले, तरी त्यांचे पूर्वज मात्र सिंह राशीचेच होते. याचा पुरावा म्हणजे पेशवाई मातीत घालताना जे सैनिक लढले. लढाई करताना जे धारातीर्थी पडले व ज्यांची नावे भीमा कोरेगाव विजय स्तंभावर कोरले आहे ते ५०० महार सैनिक.’
तत्कालीन सामाजिक परिस्थितीच्या परिपाकाचा आढावा घेताना असे लक्षात येते की, वर्णव्यवस्था, जातीव्यवस्था व अस्पृश्यता यामुळे काही लोकांना समाजव्यवस्थेने डोके वर काढूच दिले नाही. त्यामुळे त्यांच्या गुणांचा फायदा परकीय सत्तांनी घेतल्याचे दिसून येते. मुस्लिम शासक हत्यारबंद सैनिकांसह आले, तर डच, फ्रेंच, पोर्तुगीज, इंग्रज हे हातात तागडी घेऊन. यामध्ये प्रथम फ्रेंच व नंतर इंग्रजांना सत्तेची स्वप्नं पडू लागली. पाच-सात हजार किलोमीटरवरून हवे तेवढे सैन्य उभारणे शक्य नसल्यामुळे त्यांनी भारतातील वंचित घटकांमधील गुणांना हेरून त्याचा फायदा घेत एतद्देशियांचे सैन्य उभारले. अन्यथा त्याच वेळी नेपोलियन बोनापार्टने इंग्लंडला सळो कि पळो तथा हवालदिल करुन सोडले होते. ते कुठे इथे सत्ता स्थापन करू शकले असते?
एकदा महार सरदारांचा सेनापती सिद्धनाक महार आपल्या काही निवडक साथीदारांसह श्रीमंत बाजीराव पेशवे यांना भेटून म्हणतात की, ‘ स्वकियांविरुद्ध लढणे आम्हाला पसंत नाही. आम्ही आपल्या बाजूने लढून इंग्रजांना भारतातून कायमचे परागंदा करू इच्छितो. परंतु स्वतंत्र, निरंकुश, सार्वभौम सत्तेमध्ये आमचे स्थान काय असणार? ‘ तर बाजीराव म्हणतात की, ‘ आमच्या राज्यांमध्ये सुईच्या अग्रावर थरथरणाऱ्या कणाएवढेही आपले स्थान असणार नाही.’ त्यापुढे ते मनुस्मृती व इतर धर्मग्रंथांचे दाखले देऊन त्यांचा मनसोक्त अपमान करतात. आता आपली भेट रणांगणावर होईल असे म्हणत सिद्धनाक महार आपल्या साथीदारांसह निघून जातात.
महार सैनिकांची व पेशव्यांची निर्णायक भेट होते, ती भीमा नदीच्या तीरावर कोरेगावच्या रणमैदानी. नोव्हेंबर १८१७ ची खडकीची लढाई पेशवे हरल्यानंतर ६ नोव्हेंबर १८१७ रोजी बाळाजी नातू हा फितूर सरदार पुण्याचा ताबा घेऊन शनिवारवाड्यावर युनियन जॅक फडकवतो. तर पेशवा बाजीराव आपले निवडक सरदार बापू गोखले, विंचुरकर, डेंगळे यांच्या मदतीने पुन्हा पुण्याचा ताबा घेण्यासाठी २८ हजार सैनिक घेऊन पुण्या पासून काही अंतरावर थांबतात. तर तोकड्या सैन्यानिशी पुण्याच्या कर्तव्यावर असणारा ब्रिटिश अधिकारी कर्नल बर्ट हा शिरूरला लेफ्टनंट कर्नल फिल्समन यांना मदतीसाठी लखोटा पाठवतो. तेव्हा शिरूरवरून कॅप्टन स्टाँटन यांच्या नेतृत्वात ५०० महार सैनिक,२७० घोडेस्वार व दोन अत्याधुनिक तोफांसह ३१ डिसेंबर १८१७ च्या रात्री साडेआठ वाजता सैन्य रवाना झाले. कडाक्याच्या थंडीत रात्रभर २५ मैलांचा सतत १२ तास प्रवास करून १ जानेवारी १८१८ रोजी सकाळी आठ वाजता भीमा नदीच्या तीरावर कोरेगावी प्रत्यक्ष लढाईला सुरुवात झाली. त्या घनघोर युद्धामध्ये ५०० महार सैनिकांनी पोटात अन्नाचा कण आणि पाण्याचा थेंब नसतांनाही बारा तास शर्थीची लढाई लढून विजयश्री मिळवली. पेशव्यांची शेवटची घरघर संपवून तिला कायमची मूठमाती दिली.या निर्णायक लढाईमध्ये बहुजन समाज, महिला, शेतकरी, अस्पृश्य यांच्यावर घोर अन्याय अत्याचार करणारी पेशवाई कायमची संपुष्टात आली. जे महार सैनिक युद्धात कामी आले त्यांच्या स्मरणार्थ १८२२ मध्ये ब्रिटिशांनी ७५ फूट उंचीचा विजयस्तंभ उभारून त्यावर त्यांची नावे कोरली. त्यावर त्यांच्या गौरवार्थ लिहिलं one of the proudest triumphs of British army in the East (पूर्वेकडील देशातील ब्रिटिश सैनिकांचा सर्वात गौरवशाली विजय) तसेच प्रत्येक वर्षी एक जानेवारीला ब्रिटिशांच्या सैन्याची एक तुकडी तिथे येवून त्यांना मानवंदना देत होती.
दोनशे वर्षांपूर्वी नेस्तनाबूत झालेली पेशवाई आजही अधूनमधून डोके वर काढण्याचा प्रयत्न करू पाहते आहे. त्यांच्या विषमतावादी वंशजांना मानवी मूल्याधारित समतावादी भारतीय संविधान नको आहे. म्हणून नववर्षाच्या निमित्ताने बहुजन समाज, समस्त महिला तथा कालचे महार आजचे बौद्ध यांनी आपल्या पूर्वजांच्या लढ्यापासून निरंतर प्रेरणा घेत, पुन्हा कालानुरूप शस्त्ररहित लढाई लढण्यासाठी संकल्प केला पाहिजे. कारण त्या संदर्भात डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात.
“You do not fight with weapons
you should fight with brain and pen”
-भिमराव परघरमोल
व्याख्याता तथा अभ्यासक
फुले शाहू आंबेडकरी विचारधारा
तेल्हारा जि. अकोला
मो. ९६०४०५६१०४