अकोला- फुलोंके रंगसे… दिल की कलम से…! साहित्यिक, कविंपासून ते सामान्य नागरिकांना भुरळ घालणारी फुलं, ही निसर्गाची एक सुंदर रचना. नयनरम्य,सुंदर, सुवासिक, रंगीत फुलांचे साऱ्यांनाच आकर्षण. म्हणूनच की काय फुलं ही सदिच्छा, शुभेच्छा, आशिर्वाद, भक्ती या भावनांचे ‘टोकन’ झाले आहेत. डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोला यांच्या पुष्पशास्त्र व प्रांगण विकास विभागाच्या फुलशेतीच्या विविध प्रक्षेत्रातली बहरुन आलेली फुलशेती सध्या सर्वांनाच आकर्षित करीत आहे.
सदिच्छा आणि शुभेच्छांचे ‘टोकन’ असलेल्या फुलांची शेती आणि त्यातून मिळणारे आर्थिक उत्पादन या व्यतिरिक्त फुलांची सजावट, विक्री, फुलमाळा बनवणे यातून एक मोठी चलनवलनाची ‘माळ’ गुंफली जाते. शेवंती, गुलाब, निशिगंध, मोगरा, दहेलिया, गॅलार्डिया, ग्लॅडीओलस अशा अनेक देशी विदेशी फुलांनी येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाच्या पुष्पशास्त्र व प्रांगण विकास विभागाची फुलशेती सध्या बहरुन आली आहे. या विभागातून मिळणारे प्रशिक्षण, सेवा या जिल्ह्यात फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरत आहे.
सध्या शेवंती बहराला आहे. त्यामुळे शेवंतीचे विविध रंगी, आकारांचे ताटवे ओळीने बहरुन आले आहेत. हे दृष्य नयनरम्य ठरतंय. सोबतच गुलाब, बिजली, एस्टर, निशिगंध असे विविध प्रकारच्या फुल पिकांची लागवड करुन त्यांच्या विविध जाती विकसित करण्याचे काम येथे केले जाते. त्यावर संशोधन केले जाते. या केंद्रात शेवंतीचे पाच रंगांमध्ये १०० हून अधिक प्रकार उपलब्ध आहेत. रागिणी नावाचं स्वतंत्र वाणही विकसित केलंय. गुलाबाच्या १५० हून अधिक प्रकार, जाती आहेत. ग्लॅडीओलसचे ५० प्रकार आहेत. निशिगंध च्या १२ जाती आहेत. मोगऱ्याच्या आठ, कुंदाच्या सहा, अबोलीच्या पाच, झेंडूचे तीन, दहेलियाच्या १३० प्रकार आहेत. या शिवाय विविध प्रकारचे सावलीत लावता येणारी शोभेची रोपे, शोभेचे निवडूंग, कमी जागेत विकसित करण्यासाठी व्हर्टिकल गार्डनसाठी लागणारे रोपे, प्रांगणे सुशोभित करण्यासाठी लागवड करावयाच्या हिरवळीचे सात प्रकार येथे उपलब्ध आहेत.
पुष्पगुच्छ, माळा तयार करण्यापासून ते विविध प्रयोजनांना फुलांची सजावट ही कार्यक्रमाची शोभा वाढवते. केवळ फुल शेतीच नव्हे तर या प्रक्रियेत समाविष्ट असलेल्या सर्व घटकांना त्यातून रोजगार उपलब्ध होत असतो. या केंद्रात साडेबारा एकर हून अधिक क्षेत्रात विविध फुलांची लागवड करण्यात आली आहे. त्यांवर संशोधन होते, त्यांच्या विविध प्रजाती विकसित करुन शेतकऱ्यांना किफायतशिर ठरणारे वाण तयार केले जातात. फुलशेती, बाग विकसित करण्यासाठी प्रशिक्षित माळी तयार करणे असे विविध अभ्यासक्रमही येथे चालवले जातात. त्यातून फुलांची शेती, हरितगृहात फुलशेती, निर्यातक्षम फुलांचा विकास इत्यादीबाबी शिकविल्या जातात. अकोला जिल्ह्यातील तसेच संलग्न जिल्ह्यातील शेतकरी येथे येऊन मार्गदर्शन घेत असतात. येथील रोप वाटीकेतून रोपांची विक्रीही केली जाते, अशी माहिती या विभागातून देण्यात आली.
फुलशेती पारंपारिक शेतीसोबत फायदेशीर आहे. कारण ही शेती पारंपारिक शेतीला पुरक व्यवसाय तर देतच शिवाय सुत्रकृमी व किडींना आकर्षित करुन मुख्य पिक सुरक्षित ठेवण्यासाठीही त्याचा फायदा होतो. शिवाय किटक, मधमाश्याम फुलपाखरे हे ही आकर्षित होत असल्याने परागिभवनास चालना मिळून त्याचाही फायदा मुख्य पिकाला होतो.
फुलांचे केवळ असणेही सुंदर असते. सरत्या वर्षाला निरोप देतांना आणि नव्या वर्षाचे स्वागत करतांना फुलशेतीच्या विकासाठी होत असलेले प्रयत्न वाखाणण्या जोगे आहेत