नवी दिल्ली : कोरोना संसर्गाच्या नवीन ‘स्ट्रेन’मुळे संपूर्ण जगात चिंतेचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना विषाणुच्या स्वरुपात होणारे नवनवीन बदलांचा शोध घेण्यासाठी देशात ‘जीनोम सिक्वेंसिंग’ (Genome Sequencing) केले जात आहे. पंरतू, पहिल्यांदाच या सिक्वेंसिंगमध्ये आढळलेल्या विषाणूच्या बदलत्या स्वरुपावरील माहिती समोर आली आहे.
उपलब्ध माहितीनूसार भारतात आतापर्यंत कोरोना विषाणूच्या जनुकांमध्ये १९ प्रकारचे अनुवांशिक बदल दिसून आले आहेत. सर्व स्वरूपांपैकी S:N440K जीनोममध्ये इतरांच्या तुलनेत २.१ टक्क्यांहून अधिक वेगाने पसरण्याची क्षमता आहे. दिल्ली, नोएडा, गाझियाबादमध्ये कोरोनातून बरे झालेल्यांना पुन्हा कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यांच्यामध्ये हा जीनोम आढळल्याची माहिती समोर आली आहे.
५ हजारांच्या घरात जीनोम सिक्वेंसिंग
देशात आतापर्यंत साडेचार हजारांहून अधिक नमुन्यांचे जीनोम सिक्वेंसिंग करण्यात आले आहे. यातून १९ प्रकारच्या अनुवांशिक बदलांची माहिती समोर आली आहे. भारत, ब्रिटनसह अनेक देशातील वैज्ञानिक जीनोम सिक्वेंसिंगच्या माध्यमातून एकत्रित करण्यात आलेल्या माहितीवर अभ्यास करीत आहे. नवी दिल्लीतील इन्स्टिट्यूट ऑफ जेनोमिक अँड इंटेगेटीव्ह बायोलॉजी (आयजीआयबी) तसेच आंध्र प्रदेश येथील कुरनूल वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांकडून यासंबंधी अभ्यास केला जात आहे.
जगात कोरोनाच्या स्वरुपात ८६ प्रकारचे अनुवांशिक बदल
जगभरात कोरोनाच्या जीनोम सिक्वेंसिंगची माहिती संकेतस्थळावर एकत्रित केली जाते. प्रत्येक देशाकडून यावर माहिती उपलब्ध करवून दिली जात आहे. १७ डिसेंबरपर्यंत २ लाख ६५ हजार ७९ नमुन्यांची माहिती एकत्रित करण्यात आली आहे. १३३ देशात एकत्रित करण्यात आलेल्या जीनोम सिक्वेंसिंगच्या माहितीवर अभ्यास सुरु आहे. यातून जागतिक पातळीवर ८६ प्रकारचे अनुवांशिक बदलन दिसून आले आहेत. आंध्र प्रदेशात २७७ जीनोम सिक्वेंसिंगमध्ये सर्वाधिक वेगाने पसरणारा जीनोम ३३ टक्के आढळून आला, अशी माहिती आयजीआयबीचे वैज्ञानिक डॉ. विनोद स्कारिया म्हणाले.