डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २५ डिसेंबर १९२७ ला रत्नागिरी जिल्ह्यातील महाड येथे किल्ले रायगडाच्या पायथ्याशी मनुस्मृतीचे दहन करून भारत देशातील मनुवादी तथा विषमतावादी व्यवस्थेच्या विकृत समर्थकांना पहिला हादरा दिला होता. त्यामुळे,त्यावेळी आणि आजही अनेकांच्या अंगाचा तीळपापड होताना दिसतो.
आज मनुस्मृती दहन दिवसाच्या निमित्ताने या देशातील प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये काही प्रश्न निर्माण होऊन त्याची उत्तरमीमांसा करण्याची आतुरता निर्माण झाली पाहिजे. ती म्हणजे की, पुस्तकप्रेमी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन का केले? त्यांनी १९२७ हे वर्ष का निवडले? रायगडाच्याच पायथ्याशी तिचे दहन का केले? त्यामध्ये कोणते तत्वज्ञान आहे? कि, तीला जाळणे भाग पडले. आजही काही ठराविक लोक तिचं समर्थन का करतात?
वरीलपैकी प्रथम प्रश्नाकडे थोडा जरी कटाक्ष टाकला तरी, आपल्या असे लक्षात येईल की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पुस्तकांवर प्रचंड प्रेम होते. त्यांनी आपल्या हयातीत ८५००० पुस्तकांचे वाचन करून २२००० पुस्तकांचा त्यांचा वैयक्तिक ग्रंथसंग्रह होता. राहण्यासाठी अनेक लोक करोडो रुपयांची घरं बांधतात. परंतु पुस्तकांसाठी घर बांधणारे ते जगातील एकमेवाद्वितीय होते. त्यामुळे त्यांच्या पुस्तक प्रेमाविषयी जगातील विद्वानानांच नव्हे तर लेखक, प्रकाशक आणि विक्रेत्यांनाही कुतूहल आणि आश्चर्य वाटत होते. तरीही त्यांनी मनुस्मृतीचे दहन का केलं होतं? कारण त्यांचे गुरु राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले एके ठिकाणी असे म्हणतात की, ज्या दिवशी या देशातील बहुजन समाज धर्मग्रंथांची मखलाशी समजून घेईल, त्यादिवशी ते त्यांना जाळल्याशिवाय राहणार नाहीत? म्हणून सन १९२७ ला त्यांच्या शतकीय जयंती सुवर्णमहोत्सवी वर्षात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी रायगडाच्या पायथ्याशी मनुस्मृतीचे दहन केले.
रायगडाचा पायथा निवडण्याचे कारण सुद्धा इतिहासामध्ये दडलेले आहे. इतिहास साक्ष देतो की, छत्रपती शिवाजी महाराजांनी भारतातील बलाढ्य शाह्यांशी लढा देत, आपले शीर तळहातावर घेऊन, आपल्या घरादारावर तुळशीपत्र ठेवून, आपल्या राण्यांचं कुंकू पुसून, अनेक जिवाभावाचे मित्र गमावत बहुजन समाजासाठी समतावादी साम्राज्य निर्माण केलं होतं. सहाजिकच महत्प्रयासाने निर्माण केलेल्या साम्राज्याचे आपण अनभिषिक्त राजे असावे, अशी महत्त्वाकांक्षा निर्माण होताच एकजात मनुस्मृतीच्या समर्थकांनी त्यांना शूद्र संबोधत, आपणास राज्याभिषेकाचा अधिकार नाही, असे म्हणत त्यांना जाहीर विरोध केला. त्या रायगडी झालेल्याअपमानाचाही बदला घ्यायचा होता म्हणून त्यांनी एकदाच नाही तर आणखी दोन वेळा मनुस्मृतीचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रतीकात्मक दहन करून संपूर्ण स्त्रियांसह बहुजन समाजाला विषमतावादी गुलामीच्या जोखडातून मुक्त केले.
प्राचीन भारतातील क्रांती आणि प्रतिक्रांती(revolution and counter revolution in ancient India) या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या ग्रंथानुसार मनुस्मृति ही इ. स. पूर्व १८५ मध्ये लिहिली गेली. त्यामध्ये १२ अध्याय व २६८४ श्लोक आहेत. मनू हे लेखकाने धारण केलेले टोपण नाव असून सुमती भार्गव असे त्याचे नाव असल्याचे ते उल्लेख करतात.
अनेक लेखकांच्या मते मनुस्मृती मधील बरेच नियम याआधीही समाजामध्ये प्रचलित होते. परंतु त्यांचे संकलन व त्यामध्ये भर घालून नियमबद्ध करण्याचे प्रथम कार्य पुष्यमित्र शुंगाच्या प्रतीक्रांतीनंतर सुमती भार्गव यांनी केल्याचे ते म्हणतात. त्यामध्ये वर्णाश्रमधर्म व वर्णव्यवस्था यांचे पुरजोर समर्थन केले असून चार वर्णापैकी तीन वर्णांच्या पुरुषांनाच फक्त ते हक्क अधिकार बहाल करते. तर चारही वर्णातील स्त्रिया व शूद्र वर्णातील पुरुषांना ते संपूर्ण मानवी तथा नैसर्गिक हक्क अधिकार नाकारते.
अशा विषमतेने ओतप्रोत भरलेल्या मनुस्मृतीमध्ये अनेक विसंगती पूर्ण नियम सांगितले आहेत. शूद्रांनी संपत्ती बाळगू नये. त्यांनी शिक्षण घेऊच नये, तर देण्याचा प्रश्नच नाही. त्यांचे नाव सुद्धा घृणास्पद असावे (उदा. दगड्या धोंड्या) याउलट ब्राह्मणांचे नाव मंगलसूचक, क्षत्रियांचे बलसूचक, वैशांचे धनसूचक असावे असा स्पष्ट उल्लेख आढळतो. शूद्रांनी दही, दूध, तूप यासारखे पदार्थ खाऊ नये. त्यांनी फक्त तीन वर्ण (ब्राह्मण क्षत्रिय वैश्य) यांची सेवाच करावी. ती का करावी? तर पूर्वजन्मीच्या काही पापामुळे शूद्र म्हणून जन्म मिळाला आहे. पुढील जन्मी जर वरच्या वर्णात जन्म घ्यायचा असेल तर ठरवून दिलेली सेवा फळाची अपेक्षा न करता मनोभावे करावी.
स्त्रियांना शुद्रांपेक्षाही नव्हे तर पशूहुनही खालच्या दर्जाची वागणूक मनुस्मृतीने सांगितलेली आहे. अध्याय क्र. चार मधील श्लोक १४८, अध्याय क्र. पाच मधील श्लोक १४८,१४९,१५१,१४५,१५५,१५६,१६३ त्याचप्रमाणे अध्याय क्र. नऊ मधील श्लोक ८,१४,१६,२७,४५,५१ आणि इतरही काही लोकांचा समाचार घेतला तर स्त्रियां संदर्भात अतिशय नीच भावना व्यक्त केलेली दिसून येईल. मनुस्मृतीमध्ये स्त्रीला शिक्षण पूर्णपणे नाकारण्यात आलेले आहे. तिने बालपणी वडिलांच्या, तारुण्यात पतीच्या, वृद्धापकाळी मुलांच्या आज्ञेत राहावे, कोणत्याही प्रकारच्या स्वातंत्र्याची अपेक्षा धरू नये.ती लग्नामध्ये दान दिलेली असल्यामुळे पतीच तिचा मालक असतो, तो कितीही वेसणी, अवगुनी, दुराचारी असला, तरीही त्याची तिने देवाप्रमाणे पूजा करावी. त्याने तिला सोडले, विकले तरी त्याची मालकी कायम राहते. व्याभीचार हा तिचा स्वभावधर्म असल्यामुळे ती आवड-निवड न ठेवता पुरुष दिसला की त्याच्यावर आसक्त होते. माता बहिण मुलगी यांच्या सोबत पुरुषांनी एकांतात बसू नये. ज्यांना फक्त मुलीच आहेत किंवा ज्या मुलीला भाऊ नाही तिच्या सोबत लग्न करू नये. पती-पत्नीने एका ताटात जेवण करू नये. तिला पुरुषाने जेवण करतेवेळी जांभई देताना किंवा शिंकताना पाहू नये. तिला पुनर्विवाहाचा अधिकार नाही, तर पुरुषाने पत्नीनिधनानंतर लगेच दुसरे लग्न करावे.
एवढी घृणास्पद मानवता विरोधी मांडणी असूनही काही लोक तिचे चुकीचे समर्थन करताना दिसतात. गेल्या आठवड्यामध्ये एका स्त्री सांसदने वादग्रस्त विधान केले. त्यांनी म्हटले की, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांना त्यांच्या वर्णाप्रमाणे संबोधले असता वाईट वाटत नाही. परंतु शूद्रांना शूद्र म्हटल्यास का वाईट वाटावे? हे त्यांचं दुटप्पी वक्तव्य असल्याचे दिसून येते. स्वतः एक स्त्री असूनही मनुस्मृती नाकारून संविधानाप्रमाणे सांसद होताना, स्वार्थासाठी सविधान चालते. अन्यथा वर्णव्यवस्था हवी असते. कारण त्यानुसार स्वतः उच्च पदी विराजमान होऊन सेवा करण्यासाठी गुलामांची व्यवस्था होते. अशी अल्पजनांच हीत जोपासून बहुजनांच्या व स्त्रियांच्या जीवनाचं मातेरं करणारी मनुस्मृति डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या अनुच्छेद १३ नुसार दुसऱ्या वेळेला जाळली. तर जगातील एकमेव समाजवादी, मानवजातीचे हित जोपासणारा, समतामूलक, मानवी मुल्याधारीत बुद्धाचा धम्म स्वीकारून त्यांनी तिसऱ्या वेळेलाही तिचं प्रतीकात्मक दहन केलं.
आजही राष्ट्रीय एकीकरणाच्या, सद्भावनेच्या तथा समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुत्व या संविधानिक मूल्यांवर आधारित राष्ट्रनिर्माणाच्या आड येणाऱ्या मनुस्मृतीचे दहन कितीही वेळा दहन केले, तरी थोडेच!…..
भिमराव परघरमोल
व्याख्याता तथा अभ्यासक
फुले शाहू आंबेडकरी विचारधारा
तेल्हारा जि. अकोला
मो. ९६०४०५६१०४