तेल्हारा(विलास बेलाडकर)– नगर विकास आराखडा अंतर्गत आरक्षित केलेल्या तसेच रिंग रोड व इतर रस्ते आरक्षित केल्यामुळे अनेकांच्या जमिनी अधिग्रहित झालेल्या आहेत.परंतु या आधी सुद्धा 1976मध्ये झालेल्या विकास आराखड्याचा कोणत्याच प्रकारचा विकास झालेला नाही.त्यामुळे आधी त्याचा विचार करा नंतर पुढचा विचार करा अशा आशयाने प्रेरित होऊन अनेक नागरिकांनी तशा प्रकारचे निवेदन तेल्हारा नियोजन समितीला दि.15 डिसेंबर रोजी दिले.
नवीन विकास आराखडा तयार करीत असताना कोणतीही पूर्व सूचना न देता तसेच स्थळ निश्चित न करता नवीन आराखडा तयार करण्यात आला.यापूर्वी नगर परिषद ने आरक्षित केलेल्या जागेवर कोणत्याही प्रकारची विकास कामे न करता जमिनी तशाच पडून आहेत. नवीन विकास आराखड्यामध्ये ज्यांच्या शेत जमिनी जात आहेत त्यामधील अनेक शेतकरी भूमिहीन होत असून ज्यांच्याकडे केवळ एकच प्लॉट किंवा खुली जागा आहे अशा जमिनी आरक्षित होत असल्याने अनेकांना राहण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच रस्त्याचे रुंदीकरण एका विशिष्ट भागापासून होत असल्याने ज्या ठिकाणावरून रस्ता सुरू झाला तेथून रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येत नसल्यामुळे काही विशिष्ट लोकांवरच रस्ता रुंदीकरण याबाबत अन्याय होत आहे .अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी आरक्षित करून विशिष्ट लोकांना यामधून वगळण्यात आले असल्याने ज्यांच्या शेती आरक्षित होत आहेत त्यांच्यावर सुद्धा हा एक अन्याय होत आहे. त्यामुळे यापूर्वी नगरपरिषदेने आरक्षित केलेल्या जागेवर विकासात्मक पावले उचलून विकास करावा ;नंतरच नवीन आराखडाला मंजुरात द्यावी अशा आशयाचे निवेदन नगर विकास आराखड्यावर हरकती घेतलेल्या नागरिकांनी नियोजन समितीचे अध्यक्ष, तसेच तसेच नगर विकास मंत्री, जिल्हाधिकारी नगर आयुक्त अमरावती,संचालक नगर रचना मुबंई यांच्याकडे60 नागरिकांनी आपल्या स्वाक्षरी निशी निवेदन पाठविले आहे.