मुंबई : देश-विदेशातील पर्यटकांचे आकर्षणाचे ठिकाण असलेले लोणार सरोवर आता राज्यातील दुसरे तर देशातील एक्केचाळीसावे रामसर स्थळ म्हणून जाहीर करण्यात आले आहे. यापूर्वी नांदूर मधमेश्वर राज्यातील पहिले रामसर पाणथळ स्थळ म्हणून घोषित झाली आहे.
स्वित्झर्लंडच्या कन्वेंशन ऑन वेटलँड सेक्रेटरिएट या आंतरराष्ट्रीय संस्थेने याबाबतची घोषणा केली असल्याची माहिती वनमंत्री संजय राठोड यांनी दिली. गेल्या दहा वर्षापासून या संदर्भात आंतरराष्ट्रीय संस्थेकडे पाठपुरावा चालू होता. जुलै 2020 मध्ये याबाबत अंतिम कागदपत्रे सादर करण्यात आली होती. या कागदपत्रांच्या आधारे लोणार सरोवर हे जागतिक रामसर स्थळ म्हणून घोषित झाले असून याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वन विभागाचे अभिनंदन केले आहे, असे राठोड यांनी सांगितले.
इराणमधील रामसर या शहरात 1971 मध्ये आंतराष्ट्रीय परिषद पार पडली होती. या परिषदेमध्ये जागतिक स्तरावरील महत्त्वाच्या पाणथळ स्थळ घोषित करून या साईटचे संरक्षण व संवर्धन करण्यात यावे, असा करार करण्यात आला होता. जैवविविधता व परिस्थितिच्या दृष्टीने जागतिक स्तरावरील महत्त्वाच्या साइट या रामसर साइट म्हणून घोषित केल्या जातात.