अकोला – राष्ट्रीय हरीत लवाद नवी दिल्ली यांच्या निदेशानुसार महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ मुंबई यांनी कोविड-१९ च्या प्रतिबंधात्मक उपाययोजना अंतर्गत फटाका प्रदुषण नियंत्रण करण्यासाठी NCR (शहरीत क्षेत्राकरिता) भागातील ज्या शहरामंध्ये मागील वर्षीचे माहे ऑक्टोंबर व नोव्हेंबर महिन्यामध्ये हवेची सरासरी गुणवत्ता Poor किंवा त्यावर असेल अशा शहरामध्ये फटाका विक्री व वापर पूर्णतः प्रतिबंधीत करण्यात आलेले आहेत. ज्या शहराची हवेची गुणवत्ता Moderateकिंवा त्याखाली असेल अशा शहरांमध्ये आवाजकरणारे फटाके ऐवजी हरीत फटाके( Green Crackers) वापरण्यात यावेअसे सूचित करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील विविध शहराचा हवेची गुणवत्ता निर्देशांक नमूद केला असून त्यानुसार अकोला ची हवेची गुणवत्ता निर्देशांक हा माहे ऑक्टोंबर करिता ६६ व माहे नोव्हेंबर करिता ६६ या समाधानकारक क्षेणीमध्ये असल्याने या शहरामध्ये संपूर्ण अकोला जिल्हयामध्ये दिवाळी,छट,नवीन वर्ष / ख्रिसमसच्या पूर्वसंध्या इत्यादी उत्सवांच्या वेळेत हरीत फटाके ( Green Crackers) यांची विक्री वापर अनुज्ञेय असल्याचे नमूद केले आहे. त्या प्रमाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंन्द्र पापळकर यांनी महानगर पालिका व पोलीस विभागाला निर्देश दिले आहे.
दिवाळी,छट,नवीन वर्ष / ख्रिसमस या करिता निर्देशांचे काटेकोरपणे पालन करुन अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने आपल्या स्तरावरुन उचित कार्यवाही करावी. दिलेल्या निर्देशांचा भंग होत असल्याचे आढळून आल्यास कायदेशिर कारवाई करण्यात यावी. जिल्हादंडाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी कळविले आहे.
सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी दिवाळी सणाच्या वेळी फटाक्यांचा शक्यतोवर वापर टाळावा. फटाक्याच्या वापरामुळे इतरात्रा त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी. धुराच्या फटाक्यामुळे वायू प्रदुषणाचा थेट परिणाम होवून कोविड बाधीत रुगांना तसेच इतर नागरीकांना त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या करिता धुर होणारे फटाके व मोठया आवाजाचे फटाके वाजवण्यावर बंदी राहील. दिवाळी,छट,नवीन वर्ष / ख्रिसमसच्या पूर्वसंध्या इत्यादी उत्सवांच्या वेळी फटाके वापरण्याचे व फटाके फोडण्याची वेळ दोन तास मर्यादित राहील. दिवाळी व गुरुपर्ब – रात्री ८ ते १०,छट- सकाळी ६ ते ८ आणि ख्रिसमस व नवीन वर्ष – रात्री ११.५५ ते १२.३० यावेळेस संपूर्ण अकोला जिल्हयामध्ये हरीत फटाके ( Green Crackers) फटाक्यांचा वापर अनुज्ञेय राहील.
हे आदेश दिवाळी सणाकरिता दिनांक १३.११.२०२० ते दिनांक १६.११.२०२० पर्यंत संपूर्ण अकोला जिल्हयाकरिता लागू राहतील. जिल्हा पोलीस अधिक्षक, अकोला व आयुक्त अकोला महानगर पालिका व संबंधीत मुख्याधिकारी तसेच प्रादेशिक व्यवस्थापक प्रदुषण नियंत्रण मंडळ अकोला यांनी आपले अधिनस्त पथकामार्फत आवश्यक त्या तपासण्या करुन नियमानुसार कार्यवाही करावी.
आदेशाचा भंग करणा-याकोणत्याही व्यक्तीने भारतीय दंड संहिता- १८६० च्या कलम १८८ अन्वये शिक्षापात्र असलेला अपराध केला आहे असे मानण्यात येईल व संबंधितावर सदर कलमानुसार कारवाई करण्यात यावी.