मूर्तिजापूर (सुमित सोनोने)-दिवाळीत खमंग फराळ खाण्याची मजा काही ओरच असते.परंतु यंदा तेलाचे दर वाढल्यामुळे फराळाचे बजेट बिघडले आहे. चिवडा,चकली,शेव,शंकरपाडे अश्या एकापेक्षा एक पदार्थ बनवितांना गृहिणींना चिंता पडली आहे.
गरीब कुटूंबीय आपल्या पद्धतीने कमी खर्चात फराळाचे पदार्थ बनवून सण साजरा करतात.परंतु यंदा गरीब नागरिकांना पैश्याची चणचण,तर त्यातच तेलाचे दर वाढल्याचा फटका सहन करावा लागत आहे.खाद्य तेलाचे वाढलेले दर घराघरात चर्चेचा विषय बनला आहे.गेल्या आठ दिवसांत तेलाच्या दरात १० ते १५ रुपयांनी वाढले असून,शेव तयार करण्यासाठी लागणारी चणाडाळ सुद्धा १५ रुपयांनी महागली आहे.त्यामुळे यंदाच्या दिवाळीत गृहिणीचे बजेट बिघडले आहे.गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेली खाद्य तेलाची दरवाढ कायम आहे.दिवाळीच्या तोंडावर होत असलेली ही वाढ सर्वसामान्य आवाक्याबाहेर जात आहे.एकीकडे कोरोनाच्या संकटानंतर आता अनलॉक झाल्याने बाजापेठा फुलल्या आहेत तर दुसरीकडे वाढलेल्या दरांमुळे ग्राहकांचा खिसाही रिकामा होत आहे.खाण्याचे पदार्थ बनविण्यासाठी सोयाबीन आणि शेंगदाणा तेलाचे सर्वाधिक उपयोग केला जाते.सोयाबीन वापरणाऱ्याची संख्या अधिक आहे.ऐन दिवाळीच्या तोंडावर या दोन्ही खाद्यतेलांच्या किमती वाढल्यामुळे नागरिकांची चिंता आणखी वाढली आहे.याकडे शासनाने लक्ष दिल्यास नागरिकांचा मोठा भार कमी होणार आहे.
____________
तेलाचे दर वाढल्यामुळे यंदा फराळ बनवितांना विचार पडत आहे.फराळाला सर्वाधिक तेल लागते.त्यामुळे यंदा फराळाचे साहित्य कमी बनविणार आहे.तसेच दिवाळीत दिव्यामध्ये तेल टाकतानाही विचार करावा लागेल.एकीकडे कोरोनाचे संकट टळले नाही.तर दुसरीकडे दरवाढीचे संकट उभे टाकले आहे.काय करावे आणि काय नाही.अशी स्थिती निर्माण झाली आहे.
सौ.अर्चना विलास वनस्कार,गृहिणी
____________
असे आहेत तेलाचे दर
सोयाबीन:- १०७ ते ११० रुपये किलो
शेंगदाणे:- १४० ते १६० रुपये किलो
सूर्यफूल:- ११८ ते १२० रुपये किलो