पुणे :
शारदीय नवरात्रोत्सव शनिवारपासून (दि.17) मोठ्या उत्साहात सुरू होत असून घटस्थापनेसाठी ब—ाह्म मुहूर्तापासून म्हणजे पहाटे पाचपासून दुपारी एक वाजून 45 मिनिटांपर्यंत सुमुहूर्त आहे, अशी माहिती पंचांगकर्ते मोहन दाते यांनी दिली.
यंदा नवरात्र दि. 17 ते 25 ऑक्टोबर कालावधीत असून शनिवारी घटस्थापना आहे. 20 ऑक्टोबर रोजी ललिता पंचमी असून, 23 ऑक्टोबर रोजी महालक्ष्मी पूजन (घागरी फुंकणे) आहे. 24 ऑक्टोबर रोजी महाअष्टमीचा उपवास असून, 25 ऑक्टोबर रोजी रविवारी नवरात्रोत्थापन (नवरात्र समाप्ती) आहे. याच दिवशी दसरा आहे.
सर्वसाधारणपणे नवरात्रोत्थापन व दसरा एका दिवशी किंवा वेगवेगळ्या दिवशी आले तरी घटस्थापनेपासून दसर्यापर्यंत 9 किंवा 10 दिवसांचे अंतर असते. तिथीच्या क्षयवृद्धीमुळे असा फरक असतो. या वर्षी घटस्थापनेपासून नवव्या दिवशी दसरा आहे. या पूर्वी अनेक वेळेस असे झालेले आहे, असे मोहन दाते यांनी सांगितले.
महालक्ष्मी पूजनाच्या (घागरी फुंकणे) दिवशी मध्यरात्री अष्टमी तिथीवर देवीचे पूजन करण्याची प्रथा आहे, अशी अष्टमी 23 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री मिळते. त्यामुळे त्या दिवशी महालक्ष्मी पूजन आहे. मात्र, दुर्गाष्टमी 24 ऑक्टोबर रोजी आहे. विजयादशमी, दसरा, सीमोल्लंघन हे 25 ऑक्टोबर रोजी असून, साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला दसरा अत्यंत शुभ मानला जातो.यादिवशी मुहूर्तावर अनेक लोक नवीन उपक्रमाचा आरंभ करतात. हा मुहूर्त महाराष्ट्रामध्ये दुपारी 2 वाजून 18 मिनिटे ते 3 वाजून 4 मिनिटांच्या दरम्यान आहे.
ज्यांना 17 ऑक्टोबर रोजी घटस्थापना करणे शक्य नाही, त्यांनी 19, 21 , 22 किंवा 24 ऑक्टोबर यापैकी कोणत्याही दिवशी करावी आणि 25 रोजी नवरात्रोत्थापन (नवरात्र समाप्ती) करावे. या वर्षी महाराष्ट्रात मुंबई, ठाणे भागामध्ये 23 ऑक्टोबर रोजी महाअष्टमीचा उपवास असून, उर्वरित महाराष्ट्रामध्ये 24 ऑक्टोबर रोजी महाअष्टमी उपवास करावा, अशी माहिती मोहन दाते यांनी दिली.