हिवरखेड(प्रतिनिधी)- जनावरांसाठी चारा आणण्यासाठी गेलेल्या ५५ वर्षीय इसमाचा शेतात लावलेल्या कुंपणाचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना हिवरखेड येथे घडली.
येथील पशुपालक राजीक खा रशीद खा (वय अंदाजे 55) रा. आठवडी बाजार वेस हिवरखेड हे पहाटे आपल्या गुरांसाठी चारा आणण्यासाठी गेले होते. हिवरखेड अकोट रोडवरून एका नाल्याच्या दक्षिणेकडील रस्त्याने कराळे यांच्या शेतात विद्युत प्रवाहित केलेल्या तारांनी कुंपण केलेले होते. त्या विद्युत प्रवाहित तारांचा त्यांच्या पायाला स्पर्श होऊन विजेचा जबर धक्का लागून त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मृतकाच्या नातेवाईकांनी दिली. घटनास्थळावर हिवरखेड पोलीसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी तेल्हारा येथे रवाना केला. अकोटच्या उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांनी सुद्धा हिवरखेड गाठले आणि घटनेची माहिती घेतली.
मृतक राजीक खा हे घरातील एकमात्र कमावते व्यक्ती होते. त्यांना एकही मुलगा नव्हता. त्यांना सात मुली असून दोन मुलींचे लग्न अजून बाकी असल्याचेही नातेवाइकांनी सांगितले. त्यांच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या कुटुंबियांना तात्काळ आर्थिक मदत मिळावी अशी मागणी होत आहे.