पातूर : (सुनिल गाडगे) महाराष्ट्रात अकोला जिल्ह्यात पातुर तालुका हा निसर्गाच्या कुशीत वसलेला तालुका आहे या ठिकाणी विविध प्रकारची निसर्गरम्य प्रेक्षणीय व ऐतिहासिक स्थळे आहेत. शहराला लागुनच नाना साहेब महाराजांचे पुरातन मंदिर आहे कि ज्याच्या नावाने आज शहराची ओळख निर्माण झालेली आहे.नाना साहेब पातुर या प्रमाणे..
आजच्या परिस्थीतीत त्या वास्तुचा विकास होणे अत्यंत गरजेचे आहे.साडेतीन शक्ती पिठांपैकी एक असलेले रेणुका मातेचे स्वयंभू मंदिर उंच अशा डोंगरावर वसलेले आहे.नवरात्राचे नऊ दिवस व दस-याला डोंगराच्या पायथ्याशी गावातील खडकेश्वर येथील अंबादेवीचे जागृत देवस्थानात विराजमान असलेली अंबा माता या देविच्या भेटीला येते तो क्षण अनुभवतांना महाराष्ट्रातील कानाकोप-यातून आलेल्या भक्तांचे डोळ्यांचे पारने फिटतात.इ.स.सातशेच्या दशकातील ऐतिहासिक कोरीव लेणी , माळराजुरा पक्षी , वन्यप्राणी पर्यटन केंद्र , घाट माथा , तलाव , धोदानी धबधबा , बालाजी मंदिर , तुळजाभवानी मंदिर , सिदाजी बुआ महाराज मंदिर , महानुभाव पंथाचे चक्रधर स्वामी मंदिर , मुस्लिम धर्माचे नावाजलेले शाहबाबू दर्गा इत्यादी धार्मिक स्थळे शहरात आणी तालुक्यात आहेत.इत्यादी स्थळांचा विकास झालेला नाही व तो होणे अति महत्वाचे आहे कारण येथील राहणारे नागरिक अत्यंत गरीब असून बेरोजगार आहेत.यामुळे येथील बेरोजगारांना व्यवसाय उभा करून स्वत:च्या पायावर उभं राहाता येईल आणी स्वत:ची व कुटूंबातील सदस्यांची भुक भागविता येईल त्यांच्या मुलांना हवं असलेलं शिक्षण मिळवून देण्यास मदत होईल.
पातुर शहरात नगरपरिषद स्थापन आहे.पातुर शहराला लागून शिर्ला ग्रामपंचायत आहे.पातुर शहर हे पुर्वी मोठी बाजारपेठ असल्याने या ठिकाणी तालुक्याची निर्मिती करण्यात आली परंतु शहराला लागून असलेली बरीचशी वस्ती शिर्ला ग्रामपंचायतीच्या हद्दीत वाढत गेली.त्यानंतर त्यांनी महसुली रेकाॅर्ड न बघता नगरपरिषदेने सदर वाड्यावस्त्यांमधे अंदाजे गेल्या चाळीस वर्षापासून सेवा पुरविल्या तसेच हा भाग पातुर नगरपरिषदेचाच आहे,असे समजण्यात येवून येथे तशी प्रशासकीय यंत्रणा निर्माण केली.
परंतु सन २०१९ मध्ये न्यायालयाच्या एका प्रकरणात निकाल लागून सदर भाग शिर्ला ग्रामपंचायचा असल्याचा न्यायालयाने निर्वाळा दिला.
या भागात गेल्या चाळीस वर्षापासून पातुर नगरपरीषदने नागरीकांना आवश्यक असलेल्या मुलभुत सुख सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.आताची परिस्थिती बघता हा भाग नगरपरीषद हद्दीमध्ये जोडणेच योग्य होईल व या भागाला आणखी सुविधा उपलब्ध करून देता येतील शिवाय यामुळे नगरपरीषदचे उत्पन्नही वाढेल.
पातुर तालुक्यातून मुंबई ते हैदराबाद हा राष्ट्रीय महामार्ग आणी अकोला-वाशिम-नांदेड हा राज्य मार्ग हे दोन महत्वाचे मार्ग जातात.लहानात लहान आणी मोठ्यात मोठे जड वाहन या मार्गावर चालतात.परंतु आता या ठिकाणी सर्वत्र रस्ते खड्ड्यात आहेत की खड्डे रस्त्यात आहेत हे समजने अत्यंत कठीन आहे.यामुळे मोठी मोठी वाहने रस्त्यांत नादुरूस्त होऊन पडतात,काही ठिकाणी अपघातातून जिवीत हानी होत आहे यासाठी हे रस्ते दुरूस्त करने अत्यंत गरजेचे आहे करीता आपण संबंधित विभागाला तसे आदेश तातडीने द्यावे.
तालुक्यात भरपुर प्रमाणात सुपिक जमिन आहे यात कांदा , फुल शेती , सोयाबीन , कापुस , मुंग , उळीद , तुर , ज्वारी , तिळ लिंबू , संत्रा , आंबा आदींचं मोठ्या प्रमाणात उत्पादन होते.यापुर्वी शहरात सहकारी जिनिंग चालू होती परंतु आता ती बंद झाली आहे.याकरीता जर शेती उत्पादनावर आधारीत उद्योगांना शासनाच्या माध्यमातुन चालना दिली तर येथील गरीब कष्टकरी शेतकरी वर्गाचे हित जोपासले जाईल.शेतीसाठी वीज आवश्यक असल्याने तालुक्यातील शेतक-यांना दिवसा वीज उपलब्ध करून दिल्यास त्यांच्या उत्पन्नात वाढ होईल,तसेच तालुक्यातील शेतकरी बांधवांना ब-याच ठिकाणी शेतात जाण्यासाठी व्यवस्थीत रस्तेच उपलब्ध नसल्याने त्यांना रस्त्यांची सोय उपलब्ध करून द्यावी,तालुक्यात ज्या सिंचन प्रकल्पातून शेती साठी पाणी पुरवठा करता येईल त्या हवे इतके प्रकल्पातून पाणी उपलब्ध करून द्यावे.
शहर व तालुक्यात मोठ्या प्रमाणात जलसाठे आहेत परंतु पिण्याच्या पाण्याची समस्या अजुनही अनेक गावांना आहे तरी अशा पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून द्यावी.
शहरात मोर्णा प्रकल्पातून पाणी पुरवठा करण्यात येतो, परंतु या ठिकाणी असलेले जलशुध्दीकरण केंद्र हे ३०/४० वर्षापुर्वीचे असून या जलशुद्धीकरण केंद्रातून अनेक गावांना पाणी पुरवठा केल्या जातो.त्यामुळे आता पुर्वी असलेल्या लोकसंख्येवर आधारित क्षमता आता नव्याने वाढविणे अति आवश्यक आहे.पुर्वी शहरात दिवसभर पाणी पुरवठा केल्या जात होता आता तो आठ-दहा दिवसातून एकदा होतो यावर कायम स्वरूपी उपाय योजना करून जलशुद्धीकरण प्रकल्पाची क्षमता वाढवून शहराला नियमित पाणी पुरवठा करण्यात यावा.
तालुका शैक्षणिक दृष्ट्या अत्यंत मागासलेला असल्याने तालुक्यात इंजिनियरिंग कॉलेज , शासकीय वसतीगृह , पोलीस भरती प्रशिक्षण केंद्र उपलब्ध करण्यात यावे , जिल्हा परिषद , पंचायत समिती , नगरपरिषद च्या शाळांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे अनेक ठिकाणी चार चार वर्ग खोल्यांसाठी एकच शिक्षक आहे यामुळे अशा शाळांमध्ये विद्यार्थी प्रवेश घेत नसल्याचे चित्र असल्याने काॅन्व्हेन्ट संस्कृतीला चालना मिळत आहे त्यामुळे गरीब विद्यार्थांचे नुकसान होत आहे तसेच विद्यार्थ्यांसाठी क्रिडांगणे मैदाने उपलब्ध करून द्यावे.
शिक्षकांची तातडीने भर्ती प्रक्रिया राबवावी.
शासनाच्या नदी सुधार प्रकल्प अंतर्गत नमामी गंगेच्या धर्तीवर पातुर शहरातील बोर्डी नदीचे खोलीकरन व सिमा सुरक्षा भिंत आणी सुशोभिकरण करण्यास नगरपरीषदेस शंभर कोटी रूपयांचा विषेश निधी उपलब्ध करून देण्यात यावा.
पातुर हे तालुक्याचे ठिकाण असुनही याठिकाणी शासकीय वैद्यकीय उप जिल्हा रूग्णालयाची सुविधा नाही येथे प्रार्थमिक आरोग्य केंद्र आहे परंतु शहराची व तालुक्याची लोकसंख्या पाहाता हे आरोग्य केंद्र सोई सुविधा पुरविण्यात अपुर्ण पडत आहे.त्यामुळे या ठिकाणी उपजिल्हा रूग्णालय उभारून नागरिकांना आरोग्य सेवा पुरविण्यात याव्या.
या आरोग्य केंद्रात एम आर आय , एक्सरे , सोनोग्राफी आदी सुविधा पुरविण्यात याव्या तसेच शहरातील सामान्य नागरीकांचे आरोग्य नेहमी निरोगी रहावे यासाठी सुसज्य अशा पुरूष व महिला व्यायामशाळा उभाराव्या या वरील मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल मा.भगतसिंह कोश्यारी यांना पातुर विकास मंच च्या माध्यमातून देण्यात आले याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते गणेश गाडगे , रामभाऊ जाधव , अजयसिंह सेंगर , गजानन गोसावी आदी मान्यवर उपस्थीत होते.