अकोला(प्रतिनिधी)- देशात लागू केलेल्या कांदा निर्यातबंदीच्या निषेधार्थ खासदारांच्या घरा समोर राख रांगोळी आंदोलन करणार असल्यची घोषणा शेतकरी संघटनेने केली आहे. शेतकर्यांचे प्रतिनिधी असलेल्या खासदारांनी लोकसभेत आवाज उठवून निर्यातबंदीचा आदेश मागे घेण्यास सरकारला भाग पाडवे यासाठी हे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे ललितदादा बाहाळे,सतीश देशमुख, विलास ताथोड, धनंजय मिश्रा,डॉ निलेश पाटील, सुरेश जोगळे लक्ष्मीकांत कौंटकर यांनी प्रसिद्धीस दिली आहे.
सहा महिने शेतकर्यांनी कांदा मातीमोल भावाने विकला. आता कुठे किमान खर्च भरुन निघेल असे भाव मिळू लागले तर केंद्र शासनाने अचानक निर्यातबंदी करुन कांद्याचे भाव पाडण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकरी संकटात असताना शेतकर्यांना वार्यावर सोडणार्या सरकारला अशा पद्धतीने शेतकर्यांचे आर्थिक नुकसान करण्याचा कोणताही अधिकार नाही. या निर्यातबंदीमुळे शेतकर्यांचेच नव्हे तर देशाचेही मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. निर्यातबंदी घालुन शेतकर्यांच्या प्रपंचाची राख रांगोळी केली आहे.
शेतकर्यांनी निवडुन दिलेल्या लोकप्रतिनिधींनी शेतकर्यांची बाजू मांडण्याचे काम लोकसभेत करायचे असते. परंतू शेतकर्यांनी निवडुन दिलेले खासदार आपले कर्तव्य विसरले आहेत. त्यांच्या कर्तव्याची त्यांना जाणीव करुन देण्यासाठी व कांदा निर्यातबंदी करुन शेतकर्यांच्या प्रपंचाची राख रांगोळी होत असल्याची कल्पना देण्यासाठी, २३ सप्टेंबर रोजी, महाराष्ट्रातील सर्व पक्षांच्या खासदारांच्या घरा समोर, १४ सप्टेंबर रोजी केंद्र शासनाने काढलेला निर्यातबंदी आदेश जाळून राख करून कांद्याची रांगोळी काढण्याचे आंदोलन शेतकरी संघटनेने जाहीर केले आहे.
जुन महिन्यात केंद्र शासनाने शेती माल व्य़ापार कायद्यात दुरुस्ती करुन शेतीमाल व्यापार खुला करुन कुठेही विकण्याची परवानगी दिली, कांदा आवश्यक वस्तू कायद्यातुन वगळला आहे. शेतकरी संघटनेने शासनाच्या या निर्णयाला पाठिंब ही दिला होता पण तिनच महिन्यात पुन्हा निर्यातबंदी लादुन शेतकर्यांचा विश्वास घात केला आहे. देशांतर्गत तसेच विदेशातही कांद्याला चांगली मागणी असताना केलेली निर्यातबंदी ही शेतकर्यां बरोबर निर्यातदारांचे ही मोठे नुकसान करणारी आहे. अंतरराष्ट्रीय बाजारात भारताची विश्वासहार्यता संपत चालली आहे. निर्याती बाबत भारताच्या धरसोड भुमिकेमुळे भारताकडुन कांदा आयात करणारे देश इतर देशांकडे वळत आहेत.जागतिक कांदा बाजार एकेकाळी ८०% असलेला भारताचा वाटा आता ४०% वर आला आहे.
एकुनच देशाच्या व शेतकर्यांच्या हिताचा विचार करुन केंद्र शासनाने त्वरित निर्यातबंदीचा आदेश मागे घ्यावा अन्यथा बुधवार दिनांक २३ सप्टेंबर रोजी राज्यातील खासदारांच्या घरा समोर आदेशाची राख करून कांद्याची रांगोळी काढण्याचे आंदोलन करण्यात येणार आहे. कांदा उत्पादक शेतकर्यांनी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, अनिल घनवट यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.