अकोल्यात कोरोनाचा उद्रेक , रुग्ण संख्या सहा हजारा कडे !
असल्या सनसनाटी आशयाखाली दररोज बातम्या प्रसारित होत आहेत.परिणामी जनमानसात कोरोनाच्या नावावर प्रचंड दहशत निर्माण केली जात आहे.समूह संसर्ग सुरू झाला असून आता अकोलकरांनी ठरवायला हवं की कोरोनाच्या सोबत जगायचे कसे ? अश्या बातम्या मुळे ही भिती अधिकच गडद केली जात आहे. खरोखरच अकोल्यात सहा हजार रुग्ण आहेत का ? तर त्याचे उत्तर येते अजिबात नाही.मग हा मोठा आकडा येतो कुठून ? हा प्रश्न सामान्य माणसाला पडणे स्वाभाविक आहे.
चला वस्तुस्थिती जाणून घेऊया.
नेमके एक्टीव्ह रुग्ण किती ?
कोरोनाच्या सद्यस्थिती पहा एकूण पॉझिटीव्ह अहवाल आहेत ५८९५ म्हणजे अकोल्यात कोरोनाचा पहिला पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्या पासून आजवर ५८९५ लोक बाधित होऊन तपासणीत पॉझिटिव्ह आलेत.त्यांचेवर उपचार झाले.अर्थातच १६ सप्टेंबर २०२० ह्या तारखेपर्यंत ४७६६ + ९७४ + १५५ = ५८९५ असे एकूण बाधित व तपासणी मध्ये पॉसिटीव्ह रुग्ण आहेत.हा आकडा एक्टीव्ह रुग्णाचा नाही तर सहा महिन्यांत बाधित व तपासणी मध्ये पॉसिटीव्ह आलेल्या एकूण रुग्णांचा आहे.त्या मधील कोरोना मुक्त ४४१३ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. अर्थात दाखल (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह) तसेच उपचार सुरू असलेली रुग्ण संख्या केवळ – १२९३ इतकी आहे.पाच हजार आठशे पंचानव नाही.एकूण बाधित संख्या पैकी ४४१३ जनांना डिस्चार्ज मिळाला असताना कोरोना उद्रेक, रुग्णसंख्या सहा हजारा कडे …ह्या सारख्या सनसनाटी टायटल मुळे अकोल्यात साडेपाच हजार पेक्षा जास्त रुग्ण असल्याचा भास निर्माण होतो.
दरम्यान कोरोना कालावधी मध्ये मयत झालेले रुग्ण आहेत १८९ आहेत.ह्या १८९ मृत्यूचे विश्लेषण जिल्हा वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय आणि जिल्हा प्रशासन निटपणे केले जात नाही.मृत्यू झालेले सर्व रुग्ण हे कोरोना मुळे दगावले की अन्य आजाराने ? ह्याची माहिती सादर केली जात नाही.त्यामुळे देखील गोंधळ आहे.बरं अकोल्यातील सामान्य परिस्थिती मध्ये जिल्ह्यात अपघात, आजार व नैसर्गिक कारणांमुळे किती मृत्यू होत होते ? हे तपासून पहिल्यास तो आकडा कमी होता की कोरोनामुळे मृत्यू अधिक झाले हे देखील स्पष्टपणे जाहीर केले जात नाही.
भिती कोरोनाची नाही तर …..
आता कम्युनिटी स्प्रेड अर्थात समुह संसर्ग सुरु झाला आहे.लोकांमध्ये भिती काय निर्माण झाली आहे ? तर ती आहे, वेळेवर उपचार न मिळण्याची,बेड / हाॅस्पीटल न मिळण्याची,
ऍब्युलन्स न मिळण्याची,ऑक्सीजन/ व्हेन्टीलेटटर वेळेवर न मिळण्याची,शासकीय रुग्णालयात रुग्णाची योग्य देखभाल नसल्याची, जेवण अयोग्य असल्याची, खाजगी रुग्णालयात सुरू असलेल्या आर्थिक लुटीची ! ही भिती निराधार आहे का ? तर अजिबात नाही.औषधे,ऑक्सिजन, पीपीई किट, मास्क चा तुटवडा ह्या नित्याच्या बातम्या.त्यात जिल्हा रुग्णालयात खाटेवरून पडून कोरोना पोजिटिव्ह रुग्णाचा मृत्यू.अकोल्यात बेड उपलब्ध होत नसल्याने मित्राच्या वडिलांना नागपुरात हलवून देखील प्रचंड त्रास झाल्याचा अनुभव राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधान परिषद सदस्य अमोल मिटकरी ह्यांनी फेसबुकवर मांडलाय.त्यावर जिल्हाधिकारी ह्यांनी कालच्या अर्थात १६ तारखेला प्रकाशित लोकमत मध्ये खुलासा केला आहे.हॅलो, अकोला जिल्हा पानावर जिल्हाधिकारी ह्यांचा खुलासा असून ” जीएमसी मध्ये पुरेसे बेड उपलब्ध असल्याचे” वृत्त आहे.बातमीनुसार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मध्ये ९०, आयकॉन मध्ये २४, ओझोन मध्ये २८, बाबन हॉस्पिटल मूर्तिजापूर येथे आवश्यकते नुसार बेड, अवधाते हॉस्पिटलमध्ये २०, युनिक हॉस्पिटलमध्ये १८, अकोला ऍकसिडेंट हॉस्पिटलमध्ये १६ असे एकूण १९६ आणि बाबन हॉस्पिटलमध्ये आवश्यकतेनुसार उपलब्ध होणार बेड पाहता २०० पेक्षा अधिक खाटा उपलब्ध असल्याचे जिल्हा प्रशासन जाहीर करते ! मग प्रश्न पडतो तो असा की नेमकं खोटं काय आहे? खाटा उपलब्ध नसणे की अधिक काही तरी ?
जर एवढ्या मोठ्या संख्येने खाटा उपलब्ध असतील तर त्याची माहिती सामान्य जनतेला देणारी हेल्पलाईन जिल्हा प्रशासन गेली सहा महिने विकसित करू शकली का ? तर त्याचे उत्तर नकारार्थी येते.
खाजगी रुग्णालयात ठराविक रक्कम जमा केल्या शिवाय रुग्ण दाखल केला जाणार नाही असे बोर्ड खाजगी रुग्णालयात लावण्यात आले.त्यावर उपचारासाठी जास्त दराने पैसे घेतल्यास कार्यवाही करण्याचा जिल्हा प्रशासनाने दिलेला हवाई इशारा सुद्धा आलाय.परंतु त्यावर काही होणार नाही हे जिल्ह्यातील नागरिकांनी अनुभवले आहे.खाजगी डॉक्टर सेवा आणि खाजगी रुग्णालये अधिग्रहित करण्याचा शासन निर्णय आला.नोटीस निघाल्या परंतु लुटुपुटूच्या लढाई पलीकडे कार्यवाही गेली नाही.
आजारा पेक्षा सुविधा आणि अंमलबजावणी चा केमिकल लोचा झाला आहे. त्यात अश्या मोठया आकडेवारी मुळे जनमानस ढवळून निघाले नाही तर नवलच आहे.