नवी दिल्ली :
वर्ष 2024 पूर्वी जगातील प्रत्येकासाठी कोरोना व्हायरसची लस उपलब्ध होऊ शकणार नाही. सर्वांपर्यंत ही लस पोहोचण्यासाठी 4 ते 5 वर्षांचा कालावधी लागेल, असे मत सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना व्यक्त केले आहे.
ऑक्सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीचे उत्पादन अॅस्ट्राजेनेका या कंपनीमार्फत केले जाणार आहे. या लसीच्या उत्पादन आणि पुरवठ्यासंबंधी ‘सिरम’ने या कंपनीशी भागीदारी केली आहे. पूनावाला म्हणाले, कोरोना व्हायरसच्या लसीचा तुटवडा किमान 2024 च्या अखेरपर्यंत जाणवेल. औषधनिर्मिती करणार्या कंपन्यांचे उत्पादन आवश्यकतेनुसार वेगाने होत नाही. त्यामुळे प्रत्येकाला ही लस मिळण्यासाठी 4 ते 5 वर्षांचा कालावधी लागेल. कोरोनाच्या लसीचे दोन डोस द्यावे लागल्यास, संपूर्ण जगासाठी सुमारे 15 अब्ज डोसची आवश्यकता भासेल.
‘सिरम’ने जगातील पाच औषध कंपन्यांशी करार केला आहे. यामध्ये अॅस्ट्राजेनेका आणि नोवावॅक्सचाही समावेश आहे. अॅस्ट्राजेनेकाच्या लस चाचणीला स्थगिती देण्यात आली होती. मात्र, आता पुन्हा एकदा चाचण्या सुरू झाल्या आहेत.