तेल्हारा (विशाल नांदोकार): तेल्हारा शहरातील मुख्य वस्ती हनुमान वाटिकेत अनेक समस्या निर्माण झाल्या असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा निर्माण झालेला प्रश्न, पिण्याच्या दूषित पाण्याचा पुरवठा, खराब रस्त्यांमुळे शहरातील हनुमान वाटिकेतील नागरिकांचे होणारे हाल… असे मूलभूत प्रश्न प्रश्न घेऊन स्थानिक नागरिकांनी घातला नगर पालिकेला घेराव. नगरसेवकाच्या उपस्थितीत ठोस आश्वासन पालिकेच्या वरिष्ठ लिपिक इंगळे नागरिकांना देवून काम मार्गी लावण्याचे सांगितले.
तेल्हारा शहरातील मुख्य वस्तीतील हनुमान वाटिके मधील नागरिकांचे हाल होत आहेत. हनुमान वाटिकेतील मुख्य रस्ता पावसाळ्यात पूर्णतः चिखलमय होऊन नागरिकांना मरणयातना सहन कराव्या लागत आहेत. या भागातील नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यास पालिका प्रशासन अपयशी ठरले आहे. या भागामध्ये नवीन पाईप लाईनचे अर्धवट काम असून बहुतेक घरांसमोरून ही लाइन गेली आहे. तसेच जुनी पाईप लाईन जागोजागी तुटलेली असून त्यामुळे डासांचा प्रार्दूभाव वाढला असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मागील एक वर्षापासून ‘पालिके’चे कर्मचारी या भागात फिरकले नसल्यामुळे दिवसेंदिवस परिसरातील परिस्थिती बिकट होत चालली असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत ‘पालिकेला’ला यासंदर्भात अनेक निवेदन देऊन कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आली नाही. परिणामी या परिसरातील नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत. तसेच पाईप लाईन लिकेज असल्याने गटारातील पाणी पाईप लैन्मध्ये शिरत असल्याने नागरिकांच्या जीवाला धोका असून यावर पालिका प्रशासन कोणती भूमिका घेते यावर सर्वांचे लक्ष लागले आहे.
रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करावी
वाटिकेतील मुख्य रस्त्यांसह इतर रस्त्यांची पावसाळ्यात बिकट अवस्था असून त्यामुळे नागरिकांना मणक्यांचे आजार उद्भवण्याची शक्यता आहे. तसेच नवीन पाइप्लाइन लवकरात लवकर सुरु करावी व घंटागाडी वेळेवर प्रभागात येते का, या गोष्टींवर प्रकाश टाकणे गरजेचे आहे. आरोग्य विभागाने कचराकुंड्यांचे योग्य नियोजन करण्याची आवश्यकता आहे. – नंदकिशोर नासने, नागरिक