नवी दिल्ली :
कोरोना महारोगराईच्या संकटामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला कमालीची फटका बसला आहे. कोरोनावर नियंत्रण मिळण्यासाठी करण्यात आलेल्या देशव्यापी लॉकडाऊनमुळे देशांतर्गत पर्यटन तसेच प्रवासी वाहतूक क्षेत्राचे कंबरडे मोडले आहे.
इंडस्ट्री चेंबर सीआयआय आणि हॉस्पिटॅलिटी कन्सल्टिंग फर्म हॉटेलिवेट यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलेल्या पाहणी अहवालात कोरोना संकटामुळे पर्यटन, प्रवास क्षेत्राचे तब्बल ५ लाख कोटी रुपयांचे (६५.५७ अब्ज डॉलर्स) नुकसान होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. केवळ संघटीत पर्यटन क्षेत्राचेच २५ अब्ज डॉलर्सचे नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
ही आकडेवारी चिंतेत भर टाकणारी आहे. संकटकाळात मजबुतीने उभे राहून अस्तित्व टिकवण्यासाठी उद्योगांना तातडीने मदत देवू करण्यात यावी, असे मागणी यानिमित्ताने केली जात आहे. अहवालानुसार, सध्याचे संकट हे भारतीय पर्यटन क्षेत्रासमोरील मोठ्या संकटांपैकी एक आहे. याचा स्थानिक, देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय अशा सर्व पर्यटनाच्या प्रकारांवर परिणाम झाला आहे. सध्याच्या ट्रेंडनुसार पुढील वर्षाच्या सुरूवातीस, हॉटेल्समधील सुमारे ३० टक्के रूम्स साठीचे बुकिंग होईल. यामुळे हॉटेल्सचे उत्पन्न ८० ते ८५ टक्क्यांनी कमी होईल.
या अहवालानुसार, कोरोना विषाणूच्या साथीने भारतीय प्रवास आणि पर्यटन उद्योगाचे फार मोठे नुकसान केले आहे. याचा परिणाम संपूर्ण पुरवठा साखळीवर झाला आहे. यामुळे या उद्योगात सुमारे पाच लाख कोटी रुपये नुकसान होण्याचा अंदाज आहे. अभ्यासानुसार, जानेवारीतल्या सर्वात व्यस्त काळात हॉटेल्समधील ८० टक्के खोल्या भरल्या गेल्या. हे प्रमाण फेब्रुवारीत ७० टक्के, मार्चमध्ये ४५ टक्के आणि एप्रिलमध्ये सात टक्के झाले. मे, जून, जुलै आणि ऑगस्टमध्ये हे प्रमाण अनुक्रमे १० टक्के, १२ टक्के, १५ टक्के आणि २२ टक्के होते. ते वाढून सप्टेंबरमध्ये २५ टक्के, ऑक्टोबरमध्ये २८ टक्के, नोव्हेंबरमध्ये ३० टक्के आणि डिसेंबरमध्ये ३५ टक्के इतके वाढेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.