नवी दिल्ली :
संपूर्ण देशात कोरोना महारोगराईमुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा नागरिकांना चांगलाच आर्थिक फटका बसला आहे. अनेकांच्या नोकऱ्यांवर गदा आली आहे. काम, उद्योगधंदे काही प्रमाणात ठप्प झाले आहेत. या सर्वांमध्ये पिचून गेलेल्या सामान्य नागरिकांसमोर घर चालवायचे कसे? असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. बेरोजगारीचे प्रमाण वाढल्याचीही ओरड सर्वत्र केली जात आहे. अशात स्टेट बॅंक ऑफ इंडियाने यंदा १४ हजार पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार असल्याचे जाहीर केले आहे. बॅंकेकडून यासाठी खास योजना आखली जात असल्याची माहिती समोर आली आहे.
वेगवेगळ्या राज्यात विविध पदांसाठी ही नोकरभरती केली जाईल. बॅंक सेवेचा अधिकाधिक प्रमाणात विस्तार केला जात आहे. त्यासाठी जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांची गरज भासणार आहे, असे बॅंकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. एकीकडे बॅंकेकडून त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी व्हीआरएस योजना आणली जाणार आहे, तर दुसरीकडे नोकर भरतीची तयारी केली जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
एसबीआयकडून ३०,००० कर्मचाऱ्यांना वेळे आधी सेवा निवृत्ती (व्हीआरएस) घेण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. बँकेने व्हीआरएस योजना सुरू करण्याचा निर्णय त्यामुळे घेतला आहे. योजनेत ३०,१९० कर्मचाऱ्यांचा त्यात समावेश असेल. मार्च २०२० मध्ये बँकेचे एकूण २.४९ लाख कर्मचारी होते तर, मार्च २०१९ मध्ये २.५७ लाख होते.
सूत्रांच्या माहितीनुसार व्हीआरएसचा मसुदा बँकेने तयार केला असून, मंडळाच्या मंजुरीनंतर याची अंमलबजावणी होईल. बँकेने या योजनेला सेकंड इनिंग्ज टॅप व्हीआरएस-२०२० असे नाव दिले आहे. योजनेद्वारे बॅंकेच्या २५ वर्ष सेवेत असलेल्या वा ५५ वय पूर्ण झालेल्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी ही योजना खुली ठेवण्यात येईल.
कर्मचाऱ्यांना योजनेचा अधिक फायदा होईल. योजनेच्या माध्यमातून बँक २००० कोटींपेक्षा जास्त बचत होईल. योजनेंतर्गत जर का ३० टक्के लोकांनी व्हीआरएस घेतला तर,जुलै २०२० च्या पगाराच्या अंदाजानुसार बँक जवळपास १,६६२.८६ कोटी रुपयांची बचत करेल, असा दावा बॅंकेकडून करण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांच्या व्हीआरएस नंतर नवीन कर्मचाऱ्यांच्या पदभरतीचा मार्ग ही मोकळा होणार आहे.