हिवरखेड (प्रतिनिधी )-
हिवरखेड च्या तत्कालिन सरपंच शिल्पा मिलिंद भोपळे यांच्या कार्यकाळात तब्बल 54 लक्ष रुपयांचा अपहार चौकशीत सिद्ध झाल्यानंतरही सदर रकमेची वसुली थंड बस्त्यात पडल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. या प्रकरणी तत्काळ कारवाई करण्याचे साकडे पालकमंत्री आणि सी.ई.ओ. यांना निवेदनाद्वारे घालण्यात आले आहे.
सविस्तर असे की हिवरखेड च्या तत्कालीन सरपंच शिल्पा मिलिंद भोपळे यांच्या कार्यकाळात चौदाव्या वित्त आयोग अंतर्गत
त्यांनी आणि सचिव भीमराव गरकल यांनी कामकाजात मोठ्या प्रमाणात अनियमितता आणि अपहार केल्याच्या तक्रारीनंतर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गट विकास अधिकारी यांना चौकशीचे आदेश दिले गट विकास अधिकाऱ्यामार्फत चौकशी होऊन रेकॉर्ड तपासणी करण्यात आली त्यामध्ये तत्कालीन सरपंच शिल्पा मिलिंद भोपळे व सचिव भीमराव गरकल यांनी 42 लाख रुपयाचा अपहार केल्याचा अहवाल गट विकास अधिकारी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सुपूर्द केला त्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्हा परिषद स्तरावर एक समिती नेमून फेर चौकशीचे आदेश दिले या फेरचौकशी मध्ये अपहराची रक्कम वाढून 54 लाख रुपये असल्याचे सिद्ध झाले. या घडामोडीला दिड वर्षापेक्षा जास्त काळ झाला असूनही तत्कालीन सरपंच व सचिव यांच्यावर कोणतीही कार्यवाही जिल्हापरिषदेकडून झाली नाही व कोणतीही रक्कम वसुल करण्यात आली नाही. त्यामुळे ग्रामपंचायत सदस्य सुरेश ओंकारे, रवींद्र वाकोडे यांनी ग्रामपंचायतीचा कार्यकाळ नोव्हेंबर मध्ये समाप्त होत असून दिड वर्षाच्या वर काळ झाल्यावरही कोणतीही कार्यवाही का करण्यात आली नाही असा सवाल पत्राव्दारे मुख मुख्यकार्यकारी अधिकारी यांना विचारून तत्कालीन सरपंच शिल्पा मिलिंद भोपळे व सचिव बी. एस. गरकल यांचावर तात्काळ कार्यवाही करण्याचे पत्र दिले आहे. सोबतच पालकमंत्री यांनाही कार्यवाही बाबत साकडे घालण्यात आले आहे.
अनियमितता सिद्ध झाल्यावर तब्बल दिड वर्षाचा कालावधी झाल्यावरही मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांकडून कार्यवाही करण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. त्यामुळे तत्कालीन कर्तव्यतत्पर मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या बदलीनंतर हे प्रकरण थंड बस्त्यात ठेवण्याचे काम होत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे.
पालक मंत्र्यांकडून अपेक्षा
पालकमंत्री बच्चूभाऊ कडू हे भ्रष्टाचाराचे कर्दनकाळ म्हणून ओळखले जातात. हिवरखेड ग्रामपंचायत मधील तब्बल 54 लक्ष रुपयांच्या मोठ्या अपहार आणि अनियमितता प्रकरणी वसुली होत नसल्याने बच्चुभाऊ कडू यांनी या प्रकरणात लक्ष घालून तात्काळ वसुली आणि कारवाई साठी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
प्रतिक्रिया:-
तत्कालीन सरपंच शिल्पा भोपळे व सचिव गरकल यांचा 54 लक्ष रुपयांचा अपहार चौकशीत सिद्ध झाला आहे. अजूनही वसुली आणि कार्यवाही झाली नाही म्हणून सीईओ साहेबांनी तात्काळ वसुलीची कारवाही पूर्ण करावी.
सौ अरुणा ओंकारे सरपंच हिवरखेड