अकोला(प्रतिनिधी) – राज्यात तूर मूग उडीद पिकाचे उत्पादन घेणा-या शेतक-याना अस्मानी संकटासोबतच सुलतानी संकटाचा सामना करावा लागत आहे.विषाणूजन्य रोग पडल्याने झालेल्या नुकसानीची मदत देण्यासाठी पंचनामे करतांना अकोला जिल्ह्यात केवळ मुंग पिकाच्या पंचनाम्याचे आदेश देण्यात आले.अमरावती जिल्ह्यात मात्र मुंगासह उडीद पिकाचेही सर्वेक्षण केले जात आहे.अश्या पद्धतीने जाणीवपूर्वक शेतक-यांना नुकसानभरपाई पासून वंचित ठेवण्यात येत असून कृषी विभागाने मूग उडीद सोबतच पावसाने नुकसान झालेल्या तूरया अश्या तिन्ही पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत.अन्यथा पक्षाचे वतीने कृषि अधिका-यांना घेराव घालू असा इशारा वंचितचे राज्य प्रवक्ते राजेंद्र पातोडे ह्यांनी दिला आहे.
यंदाच्या खरीप हंगामात उडीद मुंगाचे पीक चांगले आले होते.परंतु त्यावर विषाणूजन्य रोग पडला आहे.त्यामुळे ही पिके घेणारे शेतकरी उद्ध्वस्त झाले आहेत.लागवडी नंतर विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे.शेतक-यांनी दोन ते तीन वेळ कीटकनाशकांची फवारणी केली आहे.परंतु पिकात सुधारणा झाली नाही.त्यामुळे हजारो हेक्टर मुंग उडीद पिकावर ट्रॅक्टर फिरवावा लागला आहे.जिल्हा कृषी अधिका-यांनी देखील सदर पीक उपटून फेकण्याचा सल्ला दिला होता.स्थानिक नैसर्गिक आपत्ती नुसार ३३ टक्के पेक्षा नुकसान झाल्यास नुकसान भरपाई दिली जाते.कृषी आयुक्तालयाचे आदेशा नुसार अकोला जिल्ह्यात जिल्हा कृषी अधिक्षक मोहन वाघ ह्यांनी दि.२४ ऑगस्ट रोजी नुकसानीच्या पंचनांम्याचे आदेश काढले आहेत.त्यामध्ये केवळ मुंग पिकाचा पंचनामा करण्याचे आदेश आहेत.मुंगा सोबतच उडीद पिकावर देखील विषाणूजन्य रोगाचा परिणाम झाला आहे.परंतु उडीद पिकाचा समावेश नुकसानीत केलेला नाही.
विशेष म्हणजे अमरावती जिल्हाधिकारी शैलेश नवाल ह्यांनी मुंग आणि उडीद दोन्हीच्या सर्वेक्षणाचे आदेश काढले आहेत.अमरावती जिल्हा कृषी अधिकारी विजय चवाळे ह्यांनी दोन्ही पिकाचे नुकसान झाल्याचा अहवाल जिल्हाधिका-यांना दिला होता.अमरावती जिल्ह्यात मुंगासह उडीद पिकाचे नुकसान भरपाई दिली जाणार आहे.अकोल्यात मात्र केवळ मुंग पिकाचे सर्वेक्षण केले जाणार आहे.हा प्रकार म्हणजे जाणीवपूर्वक शेतक-यांना वंचित ठेवण्याचा डाव आहे.हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही.जिल्हा कृषी अधिक्षक हे राहुरी कृषी विद्यापीठाचे प्रशासन अधिकारी असून आत्मा कार्यालयाचे प्रकल्प संचालक पदाचा प्रभार देखील त्यांचे कडे आहे.तीन पदावर एकच अधिकारी असल्याने त्यांचे जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालया कडे लक्ष नसल्याचे दिसते.सबब कृषी खात्याने त्यांचे जागेवर नियमित जिल्हा कृषी अधिक्षक नेमावा अशीही मागणी असून अकोला जिल्ह्यात मुंग पिकासोबत उडीद आणि पावसाने नुकसान झालेल्या तुरीचे देखील सर्वेक्षण करण्यात सुरु करण्यात यावे.शेतक-यांना मुंगासह उडीद आणि तुरीच्या नुकसानीची भरपाई मिळावी ह्या साठी पक्ष कटीबद्ध असून अधिका-यांनी मनमानी न करता शेतक-याना नुकसानीचा लाभ मिळवून द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.