म्हैसांग (निखिल देशमुख)- सांगळूद बु. ते बोंदरखेड महामार्गा दरम्यान असलेले महावितरणचे इलेक्ट्रिक पोल मोठ्या प्रमाणात झुकलेले असून या मार्गावरून वाहतूक करणाऱ्या दुचाकी-चारचाकी तसेच पादचारी नागरिकांच्या जीवास धोकादायक ठरत आहेत. झुकलेल्या विद्युत वाहिनीवरील जिवंत तारा अपघातास निमंत्रण देणाऱ्या ठरत असल्याने भीती व धोक्याचे वातावरण निर्माण झाले आहे.या मार्गावर इलेक्ट्रिक पोल मोठ्या प्रमाणात झुकलेले असतांना याकडे महावितरणने पूर्णतः दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. या मार्गावरून सांगळूद बु.येथील नागरिक, शेतकरी, व शेतमजूर यांना जीव मुठीत घेऊन जावे लागत असून या मार्गानेच बाभूळगाव,बोंदरखेड व महामार्ग क्रमांक 6 वरुन अकोला,बोरगाव मंजू व मुर्तिजापूर येथे जाण्यासाठी मार्ग असल्याने कोणतीही दुर्घटना होण्यापूर्वीच संबंधित महावितरणने तात्काळ गांभीर्याने लक्ष देऊन मोठ्या प्रमाणात झुकलेले इलेक्ट्रिक पोल सरळ करण्यात यावे.अशी मागणी या भागातील नागरिक तसेच वंचित बहुजन आघाडीचे सामाजिक कार्यकर्ता दिलीप शिरसाट यांनी केली आहे.