अकोला – आज दिवसभरात (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 499 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 460 अहवाल निगेटीव्ह तर 39 अहवाल पॉझिटीव्ह आले. आता अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 3168(2666+502) झाली आहे. आज दिवसभरात 60 रुग्ण बरे झाले. तर उपचार घेतांना दोघांचा मृत्यू झाला. दरम्यान जिल्हा शल्य चिकीत्सक राजकुमार चव्हाण यांनी मृतकांच्या नोंदी अद्यावतीकरणासंदर्भात दिलेल्या माहितीनुसार खाजगी रुग्णालयात मृत्यू झालेल्या आठ जणांच्या नोंदीचे अद्यावतीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे आता मृत व्यक्तीची संख्या 131 झाली असून सध्या 519 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 23354 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 22720, फेरतपासणीचे 169 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 465 नमुने होते. आजपर्यंत एकूण 23241 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 20575 आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल 3168(2666+502) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
खाजगी रुग्णालयातील मृतांच्या नोंदीचे अद्यावतीकरण
जिल्ह्यात कोविड-19 मुळे झालेल्या मृत्यूंची संख्या 131 झाले असल्याचे जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. राजकुमार चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे. खाजगी दवाखान्यात झालेल्या 17 मृत्यूच्या नोंदीपैकी आठ नोंदीचे अद्यावतीकरण करुन आता ही संख्या 131 झाली आहे. त्यात आज खाजगी रुग्णालयात मृत्यू झालेल्या दोघा मृतांचा समावेश आहे.
यासंदर्भात अद्यावत माहितीनुसार, आजपर्यंत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात 114 कोविड पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला. तर बाबन हॉस्पीटल मुर्तिजापूर येथे एक मृत्यू, आयकॉन हॉस्पीटल येथे पाच जणांचे मृत्यू तर ओझोन हॉस्पीटल येथे 11 जणांचे मृत्यू झाले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण यांनी दिली आहे. आतापर्यंत खाजगी रुग्णालयात झालेल्या एकूण 17 मृत्यूपैकी नऊ नोंदी अद्यावत झाल्या होत्या. आता सर्व नोंदीचे अद्यावतीकरण झाल्याने त्या आता 17 झाल्या आहे. तर एकूण मृत्यू संख्या 131 झाली आहे.
आज 39 पॉझिटिव्ह
आज दिवसभरात 39 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात आज सकाळी 21 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात 12 महिला व नऊ पुरुष आहेत. त्यातील मुर्तिजापूर येथील 19 जण तर उर्वरित हिवरखेड व खिनखिनी ता.मुर्तिजापूर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. तसेच आज सायंकाळी 18 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात आठ महिला व 10 पुरुष आहेत. त्यातील खांबोरा येथील 12 जण, सिव्हील लाईन येथील दोन जण तर उर्वरित एमराल्ड टॉवर, केळकर हॉस्पीटल, रिधोरा, व निमकर्दा येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
60 जणांना डिस्चार्ज
दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 30 जणांना, कोविड केअर सेंटर येथून 22 जण, हॉटेल रेजेन्सी येथून एक, कोविड केअर सेंटर हेडज, मुर्तिजापूर येथील सात जणांना अशा एकूण 60जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.
दोन मयत
दरम्यान आज दोन जणाचा खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला. त्यात पाचमोरी, अकोला येथील रहिवासी असलेल्या 52 वर्षीय महिलेचा व गंगा नगर येथील रहिवासी असलेल्या 47 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. हे दोघे रुग्ण दि.12 रोजी दाखल झाले होते. त्यांचा उपचार घेतांना आज मृत्यू झाला.
519 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु
आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 3168(2666+502) आहे. त्यातील 131 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची 2518 संख्या आहे. तर सद्यस्थितीत 519 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.