अकोला – जिल्ह्यामध्ये मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी कपाशीचे क्षेत्र कमी होऊन सुद्धा युरीया खत वापराचे प्रमाण वाढले आहे. उडीद, मुंग, सोयाबीन, तुर ही पिके डाळवर्गीय आहेत. त्यांच्या मूळांवर जिवाणुच्या गाठी असतात. हे जिवाणु हवेतील नत्राचे स्थिरिकरण करुन सदर झाडाची नत्राची गरज काही प्रमाणात भागवतात. तसेच पेरणीच्या वेळेस आपण डिएपी 10:26:26 या सारख्या खतांची मात्रा दिलेली असते. त्यामुळे या डाळवर्गीय पिकांना युरीया (नत्र) आता देण्याची गरज नाही. आपले शेतातील पिक काही कारणामुळे जसे की, शेतामध्ये पावसाचे पाणी साचल्यामुळे पिवळे पडते. अशावेळी शेतकरी बांधव युरीयाचा सर्रास, मोठया प्रमाणावर वापर करतात. जास्त पाण्यात हा जमीनीत दिलेला युरीया पिकाच्या कामी येण्याऐवजी जमीनीत खोलवर पाझरुन लीचीग होऊन वाया जातो. अशावेळी 2 टक्के युरीयाची फवारणी पिकांवर केली तर ते तुलनात्मक दृष्टया अधिक फायदेशीर ठरते.
युरीयाच्या जास्त वापरामुळे पिकाची कायिक वाढ अधिक होते. विशेष करुन सोयाबीनमध्ये आपल्याला त्याचे परिणाम स्पष्ट दिसतात. पिक अगदी मांड्यापर्यंत वाढलेले, प्लॉट छान बसलेला दिसतो परंतु त्याप्रमाणात झाडाला फुले, शेंगा लागत नाहीत. यात अधिकची भर म्हणजे युरीयाच्या अतिवापरामुळे झाडाची पाने लुसलुशीत व मऊ होतात. टनकपणा, कणखरता कमी होतो ही तर किडीसाठी पर्वणीच ठरते. त्यामुळे अशा पिकावर किडींचा विशेष करुन रसशोषक किडींचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणावर होतो. पिक रोगांनाही बळी पडण्याची शक्यता वाढते. त्यामुळे युरीयाच्या वापरानंतर 10 ते 15 दिवसांनी किटकनाशकांची फवारणी घ्यावीच लागते. परिणामी श्रम व उत्पादन खर्च विनाकारण वाढतो. कपाशी या पिकामध्ये पेरणीच्या वेळी दिलेल्या खताच्या मात्रा व्यतिरिक्त नत्राची आवशकता असते. तशी डॉ. पंजाबराव देशमुख विद्यापीठाची शिफारसही आहे. परंतु कपाशी पिकात सुध्दा युरीयाचा अवाजवी अतिरेकी वापर केला तर त्याचे दुष्परिणाम दिसुन येतात.
जिल्ह्यात अकोट व तेल्हारा तालुक्यातील काही भागांमध्ये केळीची लागवड होते. केळीसाठी नत्राची गरज आहे. तशी कृषि विद्यापिठाची शिफारसही आहे. परंतु या पिकामध्येही गरजेपेक्षा जास्त युरीयाचा वापर केला तर केळीची पाने लुसलुशीत, मऊ होऊन किड व रोगांना सहज बळी पडण्याची शक्यता असते. परिणामी उत्पादन खर्च वाढतो. नत्राची गरज युरीया व्यतिरिक्त अमोनियम सल्फेट यासारख्या खताव्दारे पुर्ण करता येऊ शकते विशेष म्हणजे अमोनियम सल्फेट या खतामध्ये नत्रा व्यतिरिक्त सल्फर हे महत्वाचे अन्नद्रव्य सुध्दा असते केळीसाठी सल्फर फायद्याचे असते. एकंदरीत युरीयाच्या अतिरिक्त वापरामुळे श्रम व उत्पादन खर्च तर वाढतोच सोबत शेतजमीनीतील गांडुळांवर त्याचा विपरीत परिणाम होतो. युरीया खताच्या सतत संपर्कामुळे डर्मटीटिस सारखे त्वचारोग दिसून येते आहे. त्यामुळे केवळ स्वस्त मिळतो म्हणुन युरीयाचा अनावश्यक, अतिरिक्त वापर टाळुन आपले श्रम व उत्पादन खर्च कमी करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी डॉ. मुरली इंगळे यांनी केले आहे.