अकोला – जिल्ह्यातील पाच हजारांहून अधिक लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये रॅपिड ॲन्टीजेन टेस्ट करण्यात आल्या आहेत. तथापि, ज्या गावात कोरोना बाधितांची संख्या व कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या अधिक आहे, तसेच ज्या गावांत रॅपिड टेस्टसाठी काही कारणाने लोकांचा प्रतिसाद मिळालेला नाही अशा गावांमध्ये पुन्हा रॅपिड टेस्ट घेण्यासाठी ग्रामपातळीवर नियोजन करा, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज सर्व उपविभागीय अधिकारी ,तहसिलदार, गटविकास अधिकारी व नगरपालिका मुख्याधिकारी यांना दिले.
कोविड १९ संदर्भात आज जिल्ह्यास्तरीय आढावा घेण्यात आला. सकाळच्या सत्रात जिल्हाधिकारी पापळकर यांनी त्यांच्या दालनात आढावा घेतला. त्यावेळी मनपा आयुक्त संजय कापडणीस, जिल्हा परिषदेचे अति मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिक्षक डॉ.मिनाक्षी गजभिये, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. फारुख शेख तसेच ओझोन व आयकॉन हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारीही उपस्थित होते.
तसेच दुपारच्या सत्रात झुम प्रणालीद्वारे सर्व सर्व उपविभागीय अधिकारी ,तहसिलदार, गटविकास अधिकारी व नगरपालिका मुख्याधिकारी यांचीही आढावा बैठक घेतली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा सुचना विज्ञान अधिकारी अनिल चिंचोले आदी उपस्थित होते.
साधनसामुग्री व औषधीसाठ्याचा आढावा
कोवीड रुग्णांचे मृत्यू रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यासाठी उपलब्ध साधनसामुग्री व औषधी साठ्याबाबत आढावा घेण्यात आला. रुग्णांना सर्व सोयी सुविधा पुरविण्यात याव्या. रुग्णालयात कोवीड वार्डात होत असलेल्या उपचार व व्यवस्थेचे सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे निरीक्षण ठेवावे, असेही निर्देश देण्यात आले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात डायलिसीस युनिट कार्यान्वित करावे, तसेच खाजगी रुग्णालयांनीही डायलिसीस सुविधा रुग्णांना उपलब्ध करुन द्याव्या, अशा सुचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
आधारकार्ड व शिधा पत्रिका आवश्यक
कोरोना पॉझिटीव्ह रुग्णास उपचारासाठी दाखल करतांना रुग्णासोबत आधार कार्ड व त्याची शिधापत्रिका सोबत अवश्य द्यावी. त्यामुळे रुग्णांना महात्मा जोतीबा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ देणे शक्य होते. रुग्णाच्या निकटवर्तीयांनी ही काळजी अवश्य घ्यावी,असे आवाहन जिल्हाधिकारी पापळकर यांनी केले.
ग्रामपातळीवर रॅपिड टेस्टचे नियोजन करा
जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये विशेषतः पाच हजारांहून अधिक लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये रॅपिड ॲन्टीजेन टेस्ट करण्यात येत आहेत. तथापि, काही गावांमध्ये नागरिकांनी प्रतिसाद दिला नाही. आता पुन्हा रॅपिड टेस्ट करण्यासाठी गावात असलेली बाधितांची संख्या,मृत्यूची संख्या व प्रतिसाद कमी असलेल्या ठिकाणी टेस्ट घेण्यात याव्या. यासाठी सरपंच,पोलीस पाटील, कोतवाल, आशा स्वयंसेविका, शिक्षक व तलाठी यांच्या ग्रामस्तरीय समितीने पुढाकार घ्यावा. ज्या दिवशी चाचण्या करावयाच्या असतील त्याआधी त्या गावास गटविकास अधिकारी, तहसिलदार इ. अधिकाऱ्यांनी भेटी देऊन ग्रामस्थांना आवाहन करावे,असे निर्देशही जिल्हाधिकारी पापळकर यांनी दिले.