अकोला : जिल्हा परिषद अंतर्गत जिल्ह्यातील बदलीपात्र प्राथमिक शिक्षकांच्या बदली प्रक्रियेचे वेळापत्रक मंगळवारी ठरविण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या (सीईओ) दालनात संबंधित पदाधिकारी व अधिकाऱ्यांची बैठक बोलविण्यात आली आहे.
शासनामार्फत देण्यात आलेल्या निर्देशानुसार जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या आॅफलाइन पद्धतीने करण्यात येणार आहेत. प्राथमिक शिक्षकांची बदली प्रक्रिया १० आॅगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन जिल्हा परिषद प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील बदलीपात्र शिक्षकांच्या बदल्या करण्यासाठी राबविण्यात येणाºया बदली प्रक्रियेचे वेळापत्रक मंगळवारी जिल्हा परिषद प्रशासनामार्फत निश्चित होण्याची शक्यता आहे.
त्यासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांच्या दालनात मंगळवारी शिक्षण सभापतींसह प्राथमिक शिक्षण विभागाचे संबंधित अधिकाºयांची बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीत जिल्ह्यातील जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदली प्रक्रियेचे वेळापत्रक निश्चित करण्यात येणार आहे.
प्रशासकीय बदलीसाठी ३०० शिक्षक पात्र?
जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदली प्रक्रियेत साडेसात टक्के प्रशासकीय व साडेसात टक्के विनंतीवरून बदल्या करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागामार्फत जिल्ह्यातील बदलीपात्र शिक्षकांच्या याद्या मागवण्यात आल्या आहेत. त्यानुसार प्रशासकीय बदल्यांसाठी जिल्ह्यातील ३०० ते ३२५ प्राथमिक शिक्षक पात्र ठरणार आहेत. तसेच विनंतीवरून बदलीसाठी जिल्ह्यातील ७५ ते ८० प्राथमिक शिक्षकांनी अर्ज केल्याची माहिती आहे.