अमरावती: कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी उपाययोजने अंतर्गत जिल्ह्यात 31 ऑगस्टपर्यंत संचारबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या सूचना पत्रानुसार निर्बंधामध्ये सुलभता व टप्प्यानिहाय लॉकडाऊन उघडण्याबाबत ‘मिशन बिगेन’ अंतर्गत दिलेल्या दिशानिर्देशानुसार आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.
त्यानुसार अमरावती शहरासह जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात 31 ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत संचारबंदी लागू राहील. बाजारपेठा, दुकाने, भाजीपाला, फळे यार्ड, पेट्रोल पंप, सलून, बँका आदी सर्व बाबतीत यापूर्वी लागू असलेले आदेश 31 ऑगस्टपर्यंत कायम राहतील. या कालावधीत आठवड्याअखेर शुक्रवार संध्याकाळी 7 वाजतापासून ते सोमवार सकाळी 7 वाजेपर्यंत कडक संचारबंदी तथा जनता कर्फ्यु पाळला जाईल.
या आदेशाचा भंग झाल्याचे आढळल्यास पोलीसांनी कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संचारबंदीच्या काळात कोविड-19 च्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांकरीता अमरावती शहर व जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागाकरीता पुढीलप्रमाणे आदेश लागू राहतील-
लॉकडाऊनच्या कालावधीत प्रतिबंधित सेवा :
सदर आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक प्रशिक्षण केंद्रे, खासगी शिकवणी वर्ग, कोचिंग क्लासेस बंद ठेवण्यात आल्या असून ऑनलाईन/ दुरस्थ शिक्षण प्रणालींना परवानगी देण्यात आली आहे. या पध्दतीला अधिक वाव देण्याचे सूचविण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व प्रकारची हॉटेल्स, रेस्टॉरेंट ही बंद राहणार असून फक्त त्यांना खाद्यगृह सुरु ठेवून घरपोच पार्सलची परवानगी आहे. सर्व प्रकारची सिनेमागृहे, शॉपींग मॉल्स, व्यायामशाळा, जलतरण, मनोरंजन उद्याने, नाट्यगृहे, मद्यगृहे, मंगल कार्यालये व इतर संबंधित ठिकाणे बंद राहतील. सर्व प्रकारची सामाजिक, राजकीय, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम व इतर स्नेहसंमेलन तसेच सर्व प्रकारची धार्मिक स्थळे, धार्मिक पुजा स्थळे सर्व नागरिकांसाठी बंद ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आले आहे.
या उपक्रमांना परवानगी :
संचारबंदीच्या कालावधीत पी-1, पी- 2 तत्वावर दुकाने सुरू ठेवण्यासाठी यापूर्वी मान्यता देण्यात आली होती. मात्र, आता पी-1, पी-2 तत्वाची अट रद्द करण्यात आली आहे. यापुढे सर्व प्रकारचे बाजार, बाजारपेठ, क्षेत्रातील दोन्ही बाजूची दुकाने ही सोमवार ते शुक्रवारपर्यंत नियमितपणे सकाळी 9 ते सायंकाळी 7 पर्यंत सुरु राहतील. तसेच आठवड्याच्या सातही दिवस दुग्धविक्रेते, डेअरीची दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 7 पर्यंत सुरु राहतील.
कृषि निविष्ठा व त्यासंबंधी असलेल्या कृषी सेवा केंद्र, कीटकनाशके विक्री केंद्र, बि-बियाणे विक्री सेवा केंद्र आठवड्यातील शुक्रवारी सायंकाळी 7 वाजता पासून ते सोमवारी सकाळी 7 पर्यंत त्यांना निर्धारित करुन दिलेल्या वेळेत नियमितपणे सुरू राहतील. तसेच राष्ट्रीयकृत, सहकारी बँक, खाजगी बँक, सहकारी संस्था पत संस्था व आर्थिक बाबीसंबंधी असलेल्या सर्व वित्तीय संस्था त्यांच्या आवश्यकतेप्रमाणे शनिवार व रविवार या संचारबंदीच्या कालावधीतही 31 ऑगस्ट 2020 पर्यंत सुरू ठेवता येईल.
सर्व प्रकारच्या अत्यावश्यक सेवा अंतर्गत असलेली दुकाने यांना यापूर्वी सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आलेली आहे ती यापुढे नियमित पणे सुरु राहतील. सर्व प्रकारची बिगर जीवनावश्यक दुकाने, आस्थापना यांना या अगोदर देण्यात आलेली सूट ही महानगरपालिका, नगर परिषद, नगरपालिका यांनी निश्चित केलेल्या धोरणाच्या अधीन राहून दिनांक 31 ऑगस्ट 2020 पर्यंत कायम ठेवण्यात येत असून सर्व बिगर जीवनावश्यक दुकाने आस्थापना या सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरू राहतील. सर्व प्रकारची मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्स त्यामधील चित्रपट गृहे, खाद्यगृह, रेस्टॉरंट, वगळता दिनांक 5 ऑगस्ट 2020 पासून सकाळी 9 ते सायंकाळी 7 सुरू राहतील. तथापि अशा मॉल्स मार्केट कॉम्प्लेक्समधील असलेली रेस्टॉरंटमधील किचन व खाद्यगृह त्यांना घरपोच सेवा देण्याकरिता परवानगी अनुज्ञेय राहील.
ई- कॉमर्स क्षेत्रातील सर्व प्रकारच्या अत्यावश्यक व बिगर अत्यावश्यक सेवा सुरु ठेवण्याकरिता परवानगी राहील. महानगरपालिका, नगर परिषद, नगरपालिका क्षेत्रातील उद्योगांना सुरु ठेवण्याकरिता परवानगी राहील. महानगरपालिका, नगर परिषद, नगरपालिका क्षेत्रातील परवानगी प्रदान केलेली सर्व प्रकारची सार्वजनिक-खाजगी बांधकामे सुरू राहतील. पावसाळ्यापूर्वी करावयाची सर्व प्रकारची सार्वजनिक खाजगी व शासकीय कामे सुरू राहतील.
सर्व प्रकारच्या शासकीय कार्यालय अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आरोग्य वैद्यकीय कोषागार आपत्ती व्यवस्थापन पोलीस एनआयसी अन्न व नागरी पुरवठा एफसीआय महानगरपालिका सेवा वगळून 15 टक्के किंवा पंधरा व्यक्ती यापैकी जी संख्या जास्त असेल ती ग्राह्य धरून सुरू राहतील. सर्व प्रकारच्या खाजगी कार्यालयात येत असतांना ह्या एकूण 10 टक्के किंवा कमीत कमी 10 कर्मचारी यापैकी जी संख्या जास्त असेल ती ग्राह्य धरून सुरू राहतील. स्वंयरोजगार उपक्रमास संबंधी असलेल्या व्यक्ती उदाहरणार्थ प्लंबर इलेक्ट्रिशियन कीड नियंत्रक तांत्रिक कामे करणाऱ्यांना त्यांची कामे करण्याकरिता परवानगी अनुज्ञेय राहील. सर्व प्रकारचे वाहन दुरुस्ती बाबत चे गॅरेज, कार्यशाळा यांनी वाहन दुरुस्ती करताना ठराविक वेळ देऊन कामे करावी. अत्यावश्यक तसेच कार्यालयीन कामाकरिता जिल्ह्यांतर्गत हालचाल करण्यास परवानगी अनुज्ञेय राहील.
ग्राहकांनी दुकानांमध्ये खरेदी करण्याकरिता जवळपास असलेल्या बाजारपेठ अतिपरिचित दुकानदारांना यांचा वापर करावा. शक्यतो दूरचा प्रवास करून खरेदी करणे टाळावे. लग्न समारंभाकरीता 25 व्यक्तींना वधू-वरास परवानगी अनुज्ञेय राहील. सर्व ठिकाणच्या सार्वजनिक हालचाली यापूर्वी दिलेल्या निर्बंधासह सुरू ठेवता येते. वृत्तपत्रांचे छपाई व वितरण घरपोच सेवा सह परवानगी अनुज्ञेय राहील. सर्व प्रकारची शैक्षणिक कार्यालय, विद्यापीठे, महाविद्यालये, शाळा येथील शैक्षणिक कर्मचारी संशोधन कर्मचारी वैज्ञानिक यांना ई-माहिती उत्तरपत्रिका तपासणे निकाल घोषित करणे इत्यादी कामाकरिता परवानगी अनुज्ञेय राहील.सर्व प्रकारची दुकाने सलून ब्युटी पार्लर ही संदर्भ क्रमांक 8 आदेशात नमूद केल्याप्रमाणे यापुढेही दिनांक 31 ऑगस्ट 2020 पर्यंत सुरू राहील.
बाह्य व सांघिक खेळ उदाहरणार्थ गोल्फ मैदानी गोळीबार जिमण्यास्तिक टेनिस बॅडमिंटन या खेळांना भौतिक व सामाजिक अंतर राखून तसेच निर्जंतुकीकरण प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा दिनांक 5 ऑगस्ट 2020 पासून सुरू ठेवण्यास परवानगी अनुज्ञेय राहील तथापि जलतरण तलाव यांना सुरू ठेवण्यास परवानगी राहणार नाही. सर्व प्रकारची सार्वजनिक व खाजगी वाहतूक करताना चारचाकी गाडीमध्ये चालका व्यतिरिक्त इतर 3 प्रवासी अनुज्ञेय राहतील. तीन चाकी गाडी उदाहरणार्थ ऑटोमध्ये चालकसह दोन प्रवासी. दुचाकीवर हेल्मेट व मास्कसह 2 प्रवासी त्यांना परवानगी राहील. या व्यतिरिक्त यापूर्वीच्या आदेशान्वये परवानगी दिलेल्या सर्व उपक्रमांना दिनांक 31 ऑगस्ट 2020 पर्यंत परवानगी अनुज्ञेय राहील.
आंतरजिल्हा बस वाहतूक करताना बस मधील असलेले एकूण प्रवेश क्षमतेच्या 50 टक्के प्रवासीसह सोशल डिस्टंसिंग निर्जंतुकीकरण करून वाहतुकीकरिता परवानगी अनुज्ञेय राहील. याकरिता विभागीय नियंत्रक महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अमरावती यांनी नियोजन करावे.
कंटेनमेंट झोनकरिता मार्गदर्शक सूचना :
कंटेनमेंट झोनकरीता या अगोदर दिलेले सर्व प्रतिबंधात्मक आदेश 31 ऑगस्ट पर्यंत पूर्वीप्रमाणेच लागू राहतील. कंटेनमेंट झोन वगळून इतर ठिकाणची सर्व जिवनावश्यक, बिगर जिवनावश्यक व इतर आस्थापना, दुकाने दररोज सकाळी 9 ते सायंकाळी 7 पर्यंत संचारबंदीच्या काळात सुरु राहतील. संचारबंदीमध्ये अमरावती शहर व जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील या आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्ती विरोधात भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 188 शिक्षापात्र असलेल्या अपराध केला आहे असे मानन्यात येऊन कारवाई करण्यात येईल. या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती, संस्था, संघटना यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी संबंधित पोलिस स्टेशनच्या अधिकारी यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. सदरचे आदेश दिनांक 31 ऑगस्ट 2020 पर्यंत कायम ठेवण्यात येत आहे. तसेच या आदेशाची मोठ्या प्रमाणात जनजागृती होण्याकरीता ध्वनीक्षेपकाव्दारे प्रसिध्दी देण्याचे आदेश स्थानिक प्रशासनाला दिले आहे.