अकोला,दि.26- जिल्ह्यात प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2020 करिता शेतकऱ्यांकडून पिक विमा अर्ज जमा केले जात आहेत. तथापि बँका बिगर कर्जदार शेतकऱ्यांचे अर्ज स्विकारत नसल्यामुळे शेतकरी/लोकप्रतिनिधींच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. या संदर्भात शासनाच्या कृषि व पदुम विभागाच्या दि. 29 जून च्या शासन निर्णयानुसार बिगर कर्जदार शेतकऱ्यांचेही पिक विमा अर्ज व हप्ते स्विकारणे बॅंकांना बंधनकारक असून बॅंकांनी हे अर्ज स्विकारावे,असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.
तसेच प्रधानमंत्री पिक विमा योजनेचे अर्ज स्विकारण्याची मुदत 31 जुलै 2020 असून शेतकऱ्यांनी आपल्या बॅंकेत हे अर्ज व हप्त्याची रक्कम जमा करावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी पापळकर यांनी केले आहे.
यासंदर्भात शासन निर्णय दि. दि.29 जून 2020 नुसार बिगर कर्जदार शेतकऱ्यांचे अर्ज स्विकारणे बँकांना बंधनकार असून त्या संदर्भात खालील प्रमाणे सुचना दिल्या आहेत.
त्यानुसार, योजनेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या बिगर कर्जदार शेतकऱ्याने आपल्या विमा प्रस्तावाची आवेदन पत्रे भरून व्यापारी बँकांच्या शाखेत/ प्रादेशिक ग्रामिण बँकेत/प्राथमिक कृषि पथपुरवठा सहकारी संस्था/विमा कंपनीच्या अधिकृत विमा प्रतिनिधी किंवा विमा मध्यस्थामार्फत विमा हप्ता रक्कमेसह सादर करावे.
योजनेत सहभागी होणारा शेतकरी विहीत प्रपत्रातील विमा प्रस्ताव भरून व्यापारी| बँकेच्या शाखेत/प्राथमिक कृषि पत पुरवठा सहकारी संस्थेत विमा हप्ता भरून सादर करेल. संबंधित शेतकऱ्यांना संबंधित बँकेत आपले बचत खाते उघडने आवश्यक राहील, बँकेतील अधिकारी शेतकऱ्यांना आवेदन पत्र भरणे व इतर बाबित सहाय्य व मार्गदर्शन करतील. शेतकऱ्यांचे विमा प्रस्ताव स्विकारतांना त्यांनी विमा संरक्षीत केलेली रक्कम व लागु होणारी विमा हप्ता रक्कम ई. बाबी तपासून पाहण्याची जबाबदारी संबंधित बँकांची राहील. बँकेची शाखा पिकवार व विहित प्रपत्रातील पिक विमा प्रस्ताव/घोषणापत्र तयार करून विमा हप्ता रक्कमेसह अंमलबजावणी करणाऱ्या विमा कंपन्यांना विहीत कालावधित पाठवेल.
बँकांना जमा विमा हप्ताचे चार टक्के सेवा शुल्क देण्यात येते. त्यासाठी बिगर कर्जदार शेतकऱ्यांना विमा प्रस्ताव सादर करण्याबाबतीत बँकांनी आवश्यक ते सर्व सहकार्य करायचे आहे. शासन निर्णयातील तरतुद लक्षात घेऊन खरीप हंगाम 2020 करिता अर्ज भरण्याची अंतिम मुदत हि 31 जुलै 2020 असल्याने पुढील दोन दिवसात सर्व बिगर कर्जदार शेतक-यांचे खरीप हंगामातील पिकांचे अर्ज स्विकारावेत. तसेच काही गावातील पिक विमा पोर्टलवर तांत्रिक अडचणी येत असल्याने शेतक-यांना पिक विमा अर्ज भरता येत नाहीत. तरी सदर गावातील कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांचे विमा प्रस्ताव प्राधान्याने स्विकारावेत व अर्ज विमा प्रस्ताव घेतांना काही शंका कुशंका असल्यास विमा प्रतिनिधी विनायक गुल्हाने (मो.नं. ७२०८०९९८६०) व सुजय निपाणे (मो.नं. ७०५७५०२८७०) एच.डि.एफ.सी. अर्गो,अकोला यांच्याशी चर्चा करून सोडवाव्या असे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सर्व बॅंकांना निर्देश दिले आहेत.
कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना विमा अर्ज व हप्ता भरण्यात अडचण येता कामा नये,याची दक्षता घेण्यात यावी,असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.