अकोला, दि.२५- कोरोना विरुद्धच्या लढ्यात समाजातिल सर्व घटकांचे सक्रिय योगदान आवश्यक असून वैद्यकीय मदत व स्वरक्षण उपाययोजनांबाबत रेड क्रॉस सोसायटी चे योगदान महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मानव संसाधन विकास, इलेक्ट्रॉनिक व सूचना आणि दूरसंचार राज्यमंत्री ना. संजय धोत्रे यांनी आज येथे केले.
रेडक्रॉसच्या अकोला शाखेतर्फे कोरोना प्रतिबंधासाठी दूरसंचार निगम व डाक विभागाच्या कर्मचाऱ्यांना मोफत रोगप्रतिकारशक्ती वाढविणाऱ्या होमिओपॅथिक औषधांचे वितरण ना. धोत्रे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अकोला बी.एस.एन.एल. चे मुख्य व्यवस्थापक पी. के. एस. बारापात्रे आणि सहाय्यक अधिकारी पोस्ट एन. एस. बावस्कर यांनी आपल्या विभागासाठी राज्यमंत्र्यांच्या हस्ते औषधांचा स्वीकार केला. ना. धोत्रे यांच्या निवासस्थानी आज सकाळी पार पडलेल्या या छोटेखानी कार्यक्रमास बी.एस.एन.एल.चे सी.आर. ढोले. पोस्टाचे विपणन अधिकारी शाकीर अहमद, रेड क्रॉस चे उपाध्यक्ष डॉ.किशोर मालोकार, ॲड. महेंद्र साहू, ॲड. सुभाष सिंग ठाकूर, डॉ.संदीप चव्हाण, सचिव प्रभजीत सिंह बछेर प्रामुख्याने उपस्थित होते. कोरोनाच्या या जागतीक संकटाचा समाजातील सर्व घटकांनी मिळून एकजुटीने मुकाबला करु, आणि कोरोनाला हरवू असा विश्वास यावेळी ना. धोत्रे यांनी व्यक्त केला.