संरक्षण संशोधन व विकास संस्था डीआरडीओ(DRDO) ने लेह मधल्या डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ हाय अल्टिट्युड रिसर्च (दिहार) येथे कोविड-19 ची चाचणी सुविधा सुरू केली आहे. लडाखच्या केंद्रशासित प्रदेशातील कोरोनाचे रुग्ण शोधण्यासाठी तसेच बाधित रुग्णांच्या देखरेखीसाठी या सुविधेचा उपयोग होईल. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेची(ICMR) सुरक्षा मानके तसेच मार्गदर्शक सूचनांप्रमाणे या चाचणी केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. या केंद्राचे उद्घाटन 22 जुलै 2020 रोजी नायब राज्यपाल आर के माथूर यांच्या हस्ते करण्यात आले.
दिहार इथले हे केंद्र प्रतिदिन 50 नमुन्यांच्या तपासण्या करण्यास सक्षम आहे. कोविड चाचण्या करणारे प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्यासाठी देखील या केंद्राचा उपयोग करता येईल. भविष्यकाळात उद्भवू शकणाऱ्या अशा प्रकारच्या साथींशी मुकाबला करण्यासाठी तसेच शेती किंवा जनावरांच्या रोगांवर संशोधन करण्यासाठीही या केंद्राचा उपयोग होऊ शकेल.
कोविडशी चाललेल्या लढ्यात बजावलेल्या भूमिकेबद्दल नायब राज्यपाल आर के माथूर यांनी डीआरडीओ ची प्रशंसा केली. डीआरडीओचे अध्यक्ष आणि संरक्षण संशोधन व विकास खात्याचे सचिव डॉक्टर सतीश रेड्डी यांनी हे सुविधा केंद्र उपलब्ध करून दिल्याबद्दल नायब राज्यपालांनी त्यांचे आभार मानले. संक्रमित रुग्णांच्या उपचाराकरता या केंद्राची मदत होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
नायब राज्यपालांनी केंद्राची पाहणी देखील केली. पर्यावरण रक्षण, आरोग्य सेवकांचे तसेच संशोधकांचे संक्रमणापासून संरक्षण करण्यासाठी या केंद्रात राबवल्या जाणाऱ्या उपाययोजना तसेच जैव सुरक्षा धोरणाबद्दल यावेळी त्यांना माहिती देण्यात आली.
याप्रसंगी ‘दिहार’चे संचालक डॉ. ओ पी चौरसिया, कमांडंट ब्रिगेडीयर जे बी सिंग, NRISR च्या संचालक डॉ पद्मा गुरमीत, एस एन एम रुग्णालयाचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मुतुम दोरजे, इतर प्रमुख सैन्याधिकारी व डीआरडीओचे शास्त्रज्ञ यावेळी उपस्थित होते.
‘दिहार’ ही डीआरडीओच्या अनेक जैवविज्ञान प्रयोगशाळांपैकी एक असून तिथे थंड व कोरड्या हवामानातल्या कृषी व पशुधन तंत्रज्ञानावर संशोधनाचे काम चालते. या प्रयोगशाळेत औषधी तसेच सुगंधी वनस्पतींचा शोध घेतला जातो व त्यांचा उपयोग संरक्षण विषयक उपकरणांमध्ये करून घेण्याविषयी संशोधन केले जाते. याशिवाय तिथे अतिउच्च पातळीवरच्या हवामानात व थंड वाळवंटी प्रदेशात वापरल्या जाणाऱ्या हरितगृह तंत्रज्ञानावरही संशोधन केले जाते.