अकोला- गस्तीवरील वाहनांसाठी अत्याधुनिक व तंत्रज्ञानाचा वापर व्हावा, घटना घडल्यास त्या क्षेत्रातील वाहन तत्काळ घटनास्थळी पाठवून मदत मिळावी, यासाठी पोलिसांच्या वाहनांना जीपीएस प्रणाली बसविण्यात आली येत आहे. पोलिस अधीक्षक जी. श्रीधर या संकल्पनेतून या प्रणालीला मूर्तरुप प्राप्त झाले असून, 30 वाहनांना ही यंत्रणा बसविण्या आली आहे.
नव्यानेच पोलिस अधीक्षक म्हणून पदभार सांभाळल्यानंतर जी. श्रीधर यांनी पोलिस विभागात नवनवीन उपक्रम राबविण्यास सुरूवात केली आहे. त्यातीलच एक भाग म्हणून आता जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांतील गस्तीवर असणाऱ्या वाहनांना जीपीएस यंत्रणा बसविण्यात येणार आहे. याची सुरूवात झाली असून, पहिल्या टप्प्यात 30 वाहनांना ही यंत्रणा बसविण्यात आली आहे. यामध्ये टु मोबाईल, वन मोबाईल, दामिनी पथक आदी वाहनांनाही जीपीएस प्रणाली बसविण्यात येणार आहे. मोबाईल ऍपद्वारे ही प्रणाली तयार करण्यात आली आहे. इनकमिंग कॉल पद्धत यात समाविष्ट आहे. वायरलेसद्वारे संदेश देण्यास अडचणी आल्या तर मोबाइलवर या वाहनातील पोलिसांना कॉल करता येणार आहे. पोलिस अधीक्षक कार्यालयातील नियंत्रण कक्षात असलेल्या स्क्रीनवर वाहनाचे लोकेशन दिसणार असून, पोलिसांच्या हालचालींची माहिती मिळणार आहे. या वाहनांसाठी नियंत्रण कक्ष तयार करण्यात आला आहे. वाहनांना त्यांचे मार्ग नेमून देण्यात आले आहेत, एखाद्या वाहनाला मार्ग बदलायचा झाल्यास, नियंत्रण कक्षाकडून परवानगी या वाहनातील चालकांना घ्यावी लागेल.