तेल्हारा : गेल्या चार पाच वर्षांपासून बोंडअळीच्या संकटाने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना पुन्हा त्याच संकटाने घेरले आहे. तेल्हारा शेतशिवारात मान्सूनपूर्व पेरलेल्या कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून आल्याने शेतकरी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
तेल्हारा तालुका हा कपाशीच्या पिकाकरिता सुपीक भाग मानल्या जातो. बीटी कपाशीचे उत्पन्न घेण्यास तालुका अग्रेसर आहे; परंतु गेल्या चार पाच वर्षांपासून कपाशीवर दरवर्षी गुलाबी बोंडअळी विळखा घालत आहे. त्यामुळे उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आहे. यावर्षीही तीच परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. ज्या शेतकºयांनी जून महिन्यात लागवड केली आहे, त्या कपाशीला फूलपाती लागली आहे; परंतु त्यावर मात्र गुलाबी बोंडअळीचे आक्रमण झाल्याचे दिसून आल्याने पिकांवरील नैसर्गिक संकटाची मालिका सुरू झाल्याने शेतकरी धास्तावले आहेत. (तालुका प्रतिनिधी)
मी माझ्या शेतामध्ये जून महिन्यात कपाशीची पेरणी केली. आज रोजी कपाशीला फुले धरली आहेत; परंतु या फुलपात्यामध्ये बोंडअळ्या दिसून आल्याने मजूर सांगून फुलपात्या तोडल्या आहेत. याबाबत कृषी विभागाला अवगत करण्यात आले असून, माझ्यावर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे.
– प्रमोद गावंडे, शेतकरी, सात्काबाद, तेल्हारा.