अकोला– इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतच्या शासकीय शाळेतील शालेय शिक्षकाच्या समग्र प्रगतीसाठी ‘निष्ठा’ या ॲप व वेब पोर्टलव्दारे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी मानव संसाधन विकास मंत्रालययाने देशात पुढाकार घेतला आहे अशी माहिती केंद्रीय मानव संसाधन राज्यमंत्री ना. संजय धोत्रे यांनी दिली. मानव संसाधन मंत्रालय तर्फे ‘निष्ठा’ या ॲप व वेब पोर्टलचे ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर माहिती देताना ना. धोत्रे बोलत होते.
ना. धोत्रे पुढे म्हणाले की, ‘निष्ठा’ हा मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या समग्र शिक्षा अभियानाच्या अंतर्गंत शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम आहे. ‘निष्ठा’व्दारे 42 लाख शालेय शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत 33 राज्य व केंद्रशासित प्रदेशातील 17 लाख 50 हजार शिक्षकांना ऑफलाईन प्रशिक्षण मागील ऑगस्ट 2019 ते मार्च 2020 पर्यंत देण्यात आले आहे. आता वेब पोर्टल व ॲपव्दारे 25 लाख शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. 23 हजार प्रशिक्षीत शिक्षकांच्या माध्यमातून हे प्रशिक्षण देण्यात येईल.
एनसीईआरटी, कैवल्य, अरविंदो सोसायटी, अजीज प्रेमजी, टाटा ट्रस्ट यांच्या मदतीने ‘निष्ठा’ पोर्टल तयार करण्यात आले. तसेच यामध्ये राज्यशासन, केन्द्रीय विद्यालय, नवोद्य विद्यालय यांचा सुद्धा सक्रीय सहभाग होता. हे प्रशिक्षण ‘निष्ठा’ पोर्टल, डिटीएच, स्वयंप्रभा चॅनेल, दिक्षा प्लॅटफॉर्म याव्दारे उपलब्ध होईल. या मुळे देशातील शिक्षक प्रशिक्षित होवून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील. यामुळे शिक्षण क्षेत्राचा सर्वागीण विकास होण्यास मदत होईल, असा आशावाद ना. धोत्रे यांनी व्यक्त केला.