हिवरखेड (प्रतिनिधी)- हिवरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत सर्व प्रकारच्या अवैध धंद्यांना आश्रय भेटत असल्याने अवैध धंदे प्रचंड प्रमाणात बोकाळले आहेत. ज्यामध्ये विना परवाना दारू विक्री, गावरान दारू विक्री, गौवंश कत्तल व गौवंश मांस विक्री, तस्करी, वरली, मटका, जुगार, गौण खनिज रेती तस्करी, इत्यादी अनेक प्रकारचे अवैध धंदे तेजीत असून त्यांना हिवरखेड पोलिसांचे अर्थपूर्ण अभयदान असल्याची चर्चा आहे.
हिवरखेड येथून जवळच असलेल्या हिंगणी येथील महिलांनी अवैध धंद्यांना कंटाळून थेट हिवरखेड पोलिस स्टेशनला धडक देत अवैध दारू विक्री तात्काळ बंद करून कार्यवाही बाबत निवेदन सादर केले. एवढेच नव्हे तर हिंगणी ग्रामपंचायत मार्फत काही दिवसांपूर्वी सर्व प्रकारचे अवैध धंदे बंद करण्याबाबत हिवरखेड पोलीस स्टेशनला निवेदन सादर करण्यात आले होते. परंतु तरीही अवैध धंदे बंद झाले नाहीत.
अकोला जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या हिवरखेड ग्रामपंचायत मार्फत लोकांनी ग्रामसभेत हिवरखेड मधील सर्व प्रकारचे अवैध धंदे बंद करण्याबाबत ठराव पास केला होता. परंतु सर्वोच्च असलेल्या ग्रामसभेच्या ठरावाला केराची टोपली दाखविण्यात आल्याचे चित्र आहे. अडगाव येथील नागरिकांनी सुद्धा अवैध धंदे बंद करण्यासाठी निवेदन दिलेले आहे. आदिवासी बहुल ग्राम पिंपरखेड येथील महिलासुद्धा पोलीस स्टेशनवर धडकल्या होत्या.
एकंदरीत हिवरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत अनेक गावांमध्ये “अग्निपथ” च्या “मांडवा” सदृश्य परिस्थिती आहे. पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने अनेक वेळा टाकलेल्या छाप्यांमधून गोवंश तस्करी, अवैध दारू, जुगार, इत्यादी अनेक प्रकारच्या कारवाया वारंवार केल्याने हिवरखेड पोलीस करतात तरी काय?? असा प्रश्न निर्माण होत आहे.
हिंगणी येथील महिलांनी दिलेल्या निवेदनात अनेक गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत. अवैध दारू विक्री मुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत असून अवैध धंदे बंद करणाऱ्यांना हटकल्यास आम्ही पोलिसांना पैसे देतो तुम्ही आमचे काय करनार? असे उद्धट उत्तर अवैध धंदेवाईक देत असल्याचे निवेदनात नमूद आहे. त्यामुळे 24 तासात कारवाई करून अवैध धंदे बंद न झाल्यास पोलिस स्टेशनमध्ये ठिय्या आंदोलन करणार असल्याचे महिलांनी सांगितले आहे. त्यामुळे पोलिस अधीक्षकांनी या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन आवश्यक ती पावले उचलण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे
नवीन पोलीस अधीक्षकांकडून महिलांना अपेक्षा
अनेक वर्षांपासून आर्थिक हितसंबंधांपोटी सुरू असलेले अवैध धंदे पाहता नवीन एस. पी. जी श्रीधर साहेब आले असल्याने त्यांनी आता हिवरखेड येथे दबंग ठाणेदाराची नियुक्ती करून कायदा व सुव्यवस्था सुधारण्यासाठी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा महिलावर्ग व्यक्त करीत आहेत.