अकोला,दि.१०- रक्ताक्षयाचे प्रमाण कमी झाल्याने बालकांचे वजन वाढून तब्येत सुधारते, बालकांचा मृत्यू दर कमी होतो. तसेच यामुळे जिल्हा कुपोषण मुक्त करण्यास चालना मिळेल, त्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करून माहे मार्च २०२१ अखेर अकोला जिल्हा रक्ताक्षय मुक्त करावा,असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार यांनी केले.
महिला बाल कल्याण विभाग, जिल्हा परिषद अकोला मार्फत ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ अंतर्गत जिल्हा कृती समितीची सभा तसेच पोषण अभियान अंतर्गत जिल्हास्तरीय अभिसरण समितीची सभा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (दि.८)त्यांचे कक्षात आयोजित करण्यात आली होती. या सभेला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार तसेच जिल्हा शल्य चिकित्सक अकोला यांचेसह प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणा अकोला, उप मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी[म.बा.वि.], जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे प्रतिनिधी, जिल्हा परिषद अकोला तसेच विधी सल्लागार, PCPNDTCELL अकोला, बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी व ग्रामिण यांची उपस्थिती होती.
मा.आयुक्त, एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या दि. १६ एप्रिल २०१८ च्या सुचनेनुसार केंद्र शासनाने ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या योजनेचा विस्तार केला असुन अकोला जिल्ह्याचा त्यामध्ये समावेश करण्यात आला आहे. या अंतर्गत Multi-Sectoral Intervention and Media Advocacy Outreach कार्यक्रम राबवायाचा आहे. त्याकरीता सन २०२०-२१ साठी सर्व विभागांचे समन्वयाने जिल्हा कृती आराखडा तयार करण्यात आला तसेच मंजूरी देण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने मुलींचे जन्मदर वाढविणे, त्यांचे शिक्षणाला प्रोत्साहन देणे तसेच मुलींचे मत्युदर कमी करणे या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. यावेळी जिल्ह्यात विविध पातळीवर राष्ट्रीय बालिका दिनी जनजागृतीपर राबविण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती देण्यात आली.
एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत पोषण अभियान कार्यक्रम हे जिल्ह्यातील विविध विभागांच्या अभिसरण व समन्वयातून राबविण्यात येत असून यामध्ये नागरी व ग्रामिण भागातील स्वच्छता, गर्भवती स्त्रिया, स्तनदा माता व बालकांची आरोग्य तपासणी, किशोरवयीन मुली व महिलांमध्ये रक्तक्षयाचे प्रमाण कमी करणे, बालकांना पोषण आहार, नियमित उंची व वजन घेणे,इ. बाबत सखोल चर्चा होऊन याबाबत संबंधित अंगणवाडी सेविका, ए.एन.एम. व आशा वर्कर यांना प्रत्यक्ष नियमित गृहभेटी करण्याबाबतच्या सूचना उपस्थितांना देण्यात आल्या. पोषण अभियान अंर्तगत बालकांचे बुटकेपणा तसेच रक्ताक्षयचे प्रमाण कमी करणे बाबत चर्चा करण्यात आली.