७ जुलै २०२० रोजी तमाम फुले-शाहू-आंबेडकरी अनुयायांची अस्मिता असणाऱ्या राजगृहावर जो हल्ला झाला आहे, तो दुसरे तिसरे काहीही नसून फक्त विकृत मानसिकतेचा विखार असल्याचे दिसून येते. राजगृह म्हणजे काय? असा जर कोणी प्रश्न विचारला, तर समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुत्व या जागतिक महान मानवी मूल्यांचे ते प्रतीक आहे. त्यामुळे देशातील समस्त बुद्ध फुले शिव शाहू आंबेडकरी विचारांचे पाईकत्व जोपासणाऱ्यांची ते अस्मिता ठरले आहे. कारण त्या राजगृहा मधूनच भारतीय संविधानाची मानवी मूल्याधारित पायाभरणी झाली. जगाला मानवी मूल्य प्रदान करणाऱ्या बुद्धाच्या धम्माची लयाला गेलेली पुनर्स्थापनाही तिथूनच झाली. एवढेच नव्हे तर जगातील बुद्ध तत्वज्ञानात ब्राह्मणी घुसखोरी झाल्याचे अभ्यास चळवळ चिंतनांती लक्षात आले, म्हणून आपल्या धम्मानुयायांना गाळीव धम्माचे तत्वज्ञान मिळावे यासाठी बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाची नीव रोवून, धम्म साहित्यामध्ये असलेली सहज, सुलभ, सोपा तथा अलंकारिक बुद्धिष्ट बायबलची उणीव भरून काढण्याचे कार्य याच राजगृहा मधून पूर्णत्वास गेले.
राजगृहाचे बांधकाम करण्याआधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर माता रमाईसह परळच्या डबक चाळीत, तर नंतर पोयाबवडीच्या चाळीत राहत होते. तेथे दोनच लहान-लहान खोल्यांमध्ये त्यांची गृहस्थी चालायची. एका खोलीत सर्व साहित्यासह स्वयंपाक, जेवण, झोपणे, तर दुसऱ्या खोलीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे ग्रंथालय तथा कार्यालय व भेटायला येणाऱ्या जाणाऱ्यांच्या बैठकीची व्यवस्था. त्यानंतर बँकेचे कर्ज घेऊन सन १९३३-३४ मध्ये राजगृहाचे बांधकाम करण्यात आले. त्या ऐतिहासिक निवासाचे नाव काय असावे? म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर व माता रमाईमध्ये चर्चा झाली. तेव्हा रमाई म्हणाल्या की, या घरांमध्ये तर, ग्रंथांचा राजा राहणार आहे. म्हणून आपल्या घराचे नाव आपण ग्रंथराजगृह ठेवूया. तेव्हा दोघांमध्ये एकमत होऊन ग्रंथ हा शब्द कमी करून ‘ राजगृह ‘ असे नामकरण करण्यात आले.
एवढेच नव्हे तर बौद्ध साहित्यामध्ये सुद्धा राजगृह या नावाला खूप प्रतिष्ठा आहे. राजगृह ही नगरी बुद्धाचे समकालीन मगध देशातील राजा बिंबिसार यांची राजधानी होती. कुमार सिद्धार्थ गौतम प्रथम परिव्रजा ग्रहण करून चारशे मैलाचं अंतर पायी चालून प्रथम राजगृहाला जातात. कारण तेथे अनेक परिव्राजक विद्वान तथा प्रचार-प्रसारकांना आश्रय मिळालेला असतो. राजा बिंबिसार प्रथम अर्धे व नंतर पूर्ण राज्य त्यांच्या पायी अर्पण करून आपण त्यांचा सहकारी मित्र म्हणून राहण्याची इच्छा प्रदर्शित करतात. तेव्हा सिद्धार्थ गौतम त्यांना ऐहिक सुखाचा त्याग केलेली व्यक्ती , पुन्हा एेहिक सुखाच्या मागे कधीच होऊ शकत नाही. आणि जर ती धावलीच तर अर्धमेला साप मारून सोडल्यास तो पुन्हा जोराने डंख मारू शकतो किंवा पेटलेली गवताची जुडी पुन्हा हातात धरणे असे होऊ शकेल. असे एक ना अनेक उदाहरणे देऊन राजा बिंबिसाराला ते विनम्र नकार देतात. बुद्धत्व प्राप्तीनंतर राजा बिंबिसारासह समस्त राजगृह नगरीने अाजन्म बुद्धाचे अनुयायित्व पत्करले होते.
इतिहासामध्ये अनेक निवासस्थानांची नोंद पाहायला मिळते. सुरूवातीचा भटकंती करणारा माणूस ऊन वारा पाऊस यापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी गुहेत राहत होता. सिद्धार्थ गौतमाचे मन संसारात रमावे म्हणून त्यांच्या वडिलांनी सर्व सुखसोयींनी युक्त तीन ऋतू साठी तीन महाल बांधले होते. तर आधुनिक काळामध्ये साडेचार ते पाच हजार कोटींचे घर बांधणारे अंबानी सर्वांनाच माहीत आहेत. अशी एक ना अनेकांची नोंद घेणे इतिहासाला क्रमप्राप्त ठरले. इतिहासाचे अस्तित्व असेपर्यंत इतिहासाला राजगृहाचे अस्तित्व विसरता येणार नाही. कारण प्राणप्रिय ग्रंथांची सर्व ऋतू सर्वकाळ ऊन वारा पाऊस यापासून संरक्षण होण्यासाठी दुर्मिळ ग्रंथांसाठी निवासस्थान म्हणजे राजगृह.
ह्याच राजगृहाचे बँकेचे हप्ते थकले म्हणून, बँकेचा बेलीफ टाळे लावण्यासाठी आला असता आपण आपल्या ग्रंथसंभारापासून फार काळ दूर राहू शकणार नाही, म्हणून त्याला गोळी घालण्याची भाषा डॉ. बाबासाहेब आंबेडकर बोलतात. इथेच रमाईचा मृत्यू झाला तेव्हा ते स्वतःला राजगृहाच्या एका खोलीमध्ये आठ दिवसापर्यंत बंद करून संन्यास घेण्याची भाषा बोलतात.
आता प्रश्न निर्माण होतो की, तमाम जनतेची अस्मिता असणाऱ्या राजगृहा वरील हल्ला हा कोणी? का? कशासाठी? कुणाच्या सांगण्यावरून? तर ह्यामागील काय षड्यंत्र असावे? याचे विश्लेषण करण्याआधी काही गोष्टी आम्हाला लक्षात घेण्यासारख्या आहेत. या आधी सुद्धा आमच्या अस्मीतांवर अनेक हल्ले झालेले आहेत. शेकडो वर्षांपूर्वी जगाला अंगणवाडी माहीत नसताना आमचा ऐतिहासिक वारसा असणारे नालंदा आणि तक्षशिला विश्वविद्यापीठे जाळण्यात आली होती. २०१३मध्ये बुद्धगया येथील महाबोधी महाविहारावर आतंकी हल्ला झाला होता. २०१८ मध्ये जंतर-मंतर याठिकाणी काही मनुवादी समाजकंटकांनी भारतीय संविधानाची प्रत फाडून त्याची चित्रफित सोशल मीडियावर प्रसारित केली होती. गेल्या काही वर्षात महाराष्ट्रासह देशभर समाजातील दुर्बल घटकांवर मोठ्या प्रमाणात प्राणांतिक हल्ले होत आहेत. अयोध्या रामाची की, बुद्धाची ही चर्वणचर्चा थांबता थांबत नाही . कारण न्यायालय म्हणते ,अयोध्या ही रामाची आहे तर समतलीकरनामध्ये पुरावे मात्र बुद्ध संस्कृती सोबत जुळणारे मिळताहेत. आरक्षण भारतीय संविधानाच्या प्रकरण-३ मध्ये समाविष्ट असून, मूलभूत अधिकाराचा भाग असल्यावरही त्यावर साधक-बाधक न्यायालयाचे निर्णय येत आहेत. खाजगीकरणामुळे बहुजन समाजाच्या नोकर्या तथा आरक्षण समाप्ती कडे वाटचाल सुरू आहे. असे एक ना अनेक उदाहरणे देता येतील.
महापुरुषांच्या नजरेतून याकडे पाहू गेलो असता असे लक्षात येईल की, काही महत्त्वाच्या चर्चांना पूर्णविराम मिळण्यासाठी. समाज निद्रीस्त आहे की जागृत, ही लिटमस टेस्ट करण्यासाठी. आंदोलन, लिखाण तथा चळवळीच्या माध्यमातून प्रस्थापितांचे अनेक षडयंत्र उघडकीस आणणार्यांचे लक्ष विचलित करण्यासाठी. हिंसक आंदोलन उभे झाले असता कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करून विशिष्ट समाजाला आरोपीच्या पिंजर्यात उभे करण्यासाठी. अथवा समाज मेंदूला एखाद्या विषयाच्या चर्चेमध्ये गुंतवून आपले साध्य सिद्ध करून घेणे. असली षड्यंत्र यामागे असू शकतात.
म्हणून समाजाने सदैव जागृत असलं पाहिजे. बुद्धाने सांगितलेल्या कार्यकारण भावाप्रमाणे प्रत्येक घटनेमागील सडक्या मेंदूच्या व असामाजिक तत्त्वांची काकनजरेने टेहाळणी करून वेळीच सावध झालं पाहिजे. तरच जीवन कलांमध्ये आपला निभाव लागू शकेल. त्यासाठी समाजातील विशिष्ट वर्गावर जबाबदारी टाकताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की, ” एखाद्या समाजाची प्रगती होण्यासाठी कोण्या महान विभूतींची गरज आहे की, नाही हा प्रश्न जरी बाजूला ठेवला, तरी ती जबाबदारी समाजातील सुशिक्षितांची आहे. ज्या समाजातील सुशिक्षित वर्ग आपली जबाबदारी पार पडतो, तोच समाज जीवनकलहात टिकाव धरू शकतो.”
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या या आवाहनापासून समाजातील सुशिक्षितांनी धडा घ्यावा हीच अपेक्षा. अन्यथा!…………
भिमराव परघरमोल
व्याख्याता तथा अभ्यासक
फुले शाहू आंबेडकरी विचारधारा तेल्हारा जि. अकोला
मो.९६०४०५६१०४