ओळख व नुकसानीचा प्रकार- सोयाबिन वरील चक्रभुग्याचा प्रौढ भुंगेरा फिक्कट तपकिरी रंगाच्या ७ ते १० मिमी लांब असतो व मादी नरापेक्षा मोठी असते. सोयाबीन पीकवाढीच्या सुरूवातीच्या काळात मादी भुंगेरा सोयाबीन पिकाचा देठ, फांदी किंवा मुख्य खोडावर अंडी घालविण्यासाठी दोन समांतर खापा करून त्यामध्ये अंडी घालतो. त्यामुळे जमिनीतील अन्नपुरवठा बंद होतो आणि खापाचा वरचा भाग वाळुन जातो. या चक्री कापात चंक्री भुंग्याचा मादी भुंगेरा आठ ते ७२ अंडी घालतो. अंडी अवस्था चार ते आठ दिवस असते. अंड्यातून बाहेर पडलेली अळी दंडगोलाकृती, पिवळसर पाढरी, गुळगुळीत असुन तिचा डोक्यावरील भाग जाड असतो व तिच्या धडाच्या खालील भागावर उभरट ग्रंथी असतात. पुर्ण वाढ झालेली अळी १९ ते २२ मि.मी लांब असते. अंड्यातून बाहेर पडलेली अळी सोयाबिनचे देठ, फांद्या व खोड पोखरून पोकळ पोकळ करते व अळी अवस्था ३२ ते ६२ दिवसाची असते. या किडीचा प्रादुर्भाव पिक दिड ते दोन महिन्याचे अवस्थेत झाल्यास किडग्रस्त झाड इतर झाडासारखेच दिसत असल्यामुळे प्रादुर्भाव लक्षात येत नाही. नंतरच्या काळात खापेवरील फांदी वाळलेली दिसते व आतुन खोड पोखरल्या गेल्यामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होवुन उत्पादनात लक्षणीय घट येते.
एकात्मीक व्यवस्थापन योजना- सोयाबिनची पेरणी जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत संपवावी, सोयाबिनची पेरणी करतांना अती दाट किंवा अती विरळ पेरणी टाळावी व सोयाबीनच्या पेरणीकरीता बियाण्याचा दर पेरणीचे अंतर शिफारशीप्रमाणेच ठेवावे, चक्रभुंग्याच्या प्रादुर्भावामुळे आढळणारी किडग्रस्त पाने, वाळलेल्या फांद्या यांचा आतील किडीसह नायनाट करावा, सोयाबीन पिकाच्या सुरूवातीच्या अवस्थेत पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी, सोयाबिन पिकात चक्रभुंगा या किडीने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली असेल म्हणजे सोयाबिन पिकात तीन ते पाच चक्रभुंगा प्रति मिटर ओळीत आढळल्यास किंवा सरासरी दहा टक्के किंवा त्यापेक्षा जास्त चक्रभुंगाग्रस्त झाडे आढळुन आल्यास खालीलपैकी कोणत्याही एका किटकनाशकाची गरजेनुसार योग्य निदान करून निर्देशित प्रमाणात फवारणी करावी.
प्रोफेनोफॉस ५० टक्के ई. सी.२० मिली अधिक दहा लिटर पाणी किंवा थायक्लोप्रीड २१.७ टक्के एस.सी. १५ मिली अधिक दहा लिटर पाणी किंवा क्लोरॅन्टीनीप्रोल १८.५ एस.सी. दोन मिली अधिक दहा लिटर पाणी किंवा इथिऑन ५० टक्के इ.सी. १५ ते ३० मिली अधिक १० लिटर पाणी किंवा ट्रायझोफॉस ४० टक्के ई.सी. १२.५ मिली अधिक दहा लिटर पाणी किंवा थायमिथोझॉम १२.६ टक्के + लॅम्बडा सायहेलाथ्रीन ९.५ टक्के (संयुक्त किटकनाशक) २.५ मिली अधिक दहा लिटर पाणी.
वर निर्देशित प्रमाणात घेवुन कोणत्याही एका किटकनाशकाची इतर एकात्मिक किड व्यवस्थापनाच्या घटकाचा वापर करून गरजेनुसार व योग्य निदान करून फवारणी करावी.
रासायनिक किटकनाशके वापरण्यापुर्वी लेबलक्लेम शिफारशीची शहनिशा करून लेबलक्लेम शिफारशीप्रमाणे आर्थिक नुकसानीची पातळी लक्षात घेवुन योग्य शिफारसीत प्रमाणात योग्य वेळीच फवारणी करावी, अनेक रसायने एकत्र करून फवारणी टाळावी, मुदतबाह्य झालेली किटकनाशके व एक्सपायरी झालेली किटकनाशके यांची फवारणी टाळावी, प्रत्यक्ष तज्ज्ञांचा सल्ला घेवुन कीडीचे योग्य निदान करून व आर्थिक नुकसानीची पातळी लक्षात घेवुन लेबलक्लेम शिफारशीप्रमाणे किटकनाशकांचा वार करणे केव्हाही हितावह व योग्य असते, निर्देशित किटकनाशके फवारतांना लेबल क्लेम शिफारशीप्रमाणे फवारणीसाठी निर्देशित पाण्याची मात्र प्रतिहेक्टर वापरावी, असे राजेश डवरे किटकशास्त्रज्ञ, कृषि विज्ञान केंद्र, करडा, वाशीम यांनी कळविले आहे.